जिल्हय़ातील सर्व अंगणवाडय़ांत राबविणार राष्ट्रीय पोषण अभियान


वार्ताहर /काकती
पोषक आहार हा आरोग्याचा पाया आहे. राष्ट्रीय पोषण महिना हे जिल्हा प्रशासनाचे महत्त्वाकांक्षी अभियान आहे. माता व बालकांना सशक्त बनविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. महिनाभर चालणारे अभियान जिल्हय़ातील सर्व अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येत आहे, असे महिला आणि बालसंगोपन खात्याचे उपसंचालक अधिकारी बसवराज वरवट्टी यांनी मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले.
येथील सिद्धेश्वर मंदिर मंगल कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी मोठय़ा उत्साहात राष्ट्रीय पोषण आहार मास अभियान पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काकती ग्रा. पं.चे अध्यक्ष सुनील सुणगार होते. या कार्यक्रमात ता. पं. सदस्य यल्लाप्पा कोळेकर, बालसंगोपन खात्याचे अधिकारी, ग्रा. पं. सदस्य आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात बालसंगोपन विकास अधिकारी कमला बसर्गी यांनी स्वागत व प्रस्तावना केली. ग्रा. पं. अध्यक्ष सुनील सुणगार, ता. पं. माजी सदस्य कल्लाप्पा कोळेकर व मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. तर ग्रा. पं. उपाध्यक्षा वर्षा मुचंडीकर व मान्यवर महिलांनी रोपटय़ांना पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
बसवराज वरवट्टी पुढे म्हणाले, गर्भवती, स्तनपान करणाऱया माता, दोन वर्षापर्यंतची मुले ते 6 वर्षे वयोगटातील मुलांचा पोषण आहारविषयक दर्जा सुधारणे, बालविकास सेवा योजनेंतर्गत मुलींचा योग्य मानसिक, शारीरिक, सामाजिक, विकासाचा पाया घालणे, बाळाच्या पहिल्या शंभर दिवसापर्यंत संपूर्ण शारीरिक वाढ आणि आईचे दूध यावर लक्ष केंद्रीत करणे, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे सहाय्यधन रुपये पाच हजार असून, लाभार्थीपर्यंत पोहचविणे, राष्ट्रीय पोषण आहार मोहिमेचे महत्त्व व आलेख यावर प्रकाशझोत टाकला. लोकसंख्या व कुपोषणामुळे आपण फार मागे आहोत. उपलब्ध वेळेत अधिक चांगले काम करूया, असा मनोदयही वरवट्टी यांनी यावेळी व्यक्त केला. ता. पं.माजी सदस्य कल्लाप्पा कोळेकर यांनी मार्गदर्शन केले. बालविकास अधिकारी चंद्रशेखर यांनी आभार मानले.
यावेळी बालविकास अधिकारी लक्ष्मण बजंत्री, अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस, लाभार्थी महिला, काकती, होनगा परिसरातील महिलावर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते.