Tarun Bharat

प्रगत तंत्रज्ञानाबरोबर भामटय़ांनीही साधलीय प्रगती!

लॉकडाऊनमध्ये सायबर क्राईमचा चढता आलेख : जोकरसह ट्रोजन ऍपच्या माध्यमातून लुबाडणूक, सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोना महामारी थोपविण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन जारी केल्यानंतर गुन्हेगारीत कमालीची घट झाली असली तरी सायबर क्राईम मात्र वाढला आहे. चोऱया, दरोडे, वाटमारीचे प्रकार कमी झाले आहेत. मात्र, ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या असून लॉकडाऊनच्या काळात बेळगाव येथील अनेकांना भामटय़ांनी वेगवेगळय़ा पद्धतीने गंडविले आहे.

पूर्वी ‘तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे, नव्या कार्डसाठी जुन्या कार्डवरील क्रमांक सांगा’, असे सांगून बँक ग्राहकांना लुबाडण्यात येत होते. या घटना नित्याच्याच झाल्या होत्या. एटीएम कार्डवरील 16 अंकी क्रमांक व पासवर्ड मिळाला की सावजाच्या बँक खात्यातील रक्कम गायब व्हायची. आता तंत्रज्ञानात बदल होईल तसे सायबर गुन्हेगारही नवे तंत्रज्ञान आत्मसात करीत आहेत.

एखाद्या बँक ग्राहकाच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी गुन्हेगारांना आता त्याच्याशी संपर्क करण्याची गरज नाही. पूर्वी ‘तुम्हाला बक्षीस लागले आहे. ती रक्कम तुमच्या खात्यात जमा करण्यासाठी कर स्वरुपात अमूक रक्कम भरा’, असे सांगून सावजाला लुबाडायचे. एखाद्या बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून खात्यातील रक्कम गायब करायचे. आता नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुन्हेगारांनी लुबाडणूक सुरू केली आहे.

आपल्या अँड्रॉईड मोबाईलमध्ये कोणत्याही प्रकारचा ऍप डाऊनलोड करण्यापूर्वी प्रत्येकाने विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कारण सायबर क्राईम विभागाच्या अधिकाऱयांच्या मते प्ले स्टोअरमधील
ऍपच्या माध्यमातून गुन्हेगार तुमची सर्व माहिती मिळवतात. केवळ तुमच्या मोबाईलमध्येच नव्हे तुमच्या बँक खात्यातही ते सहजपणे प्रवेश करतात.

अँड्रॉईड मोबाईल हॅक करून लूट

जोकर किंवा ट्रोजन हे नवे मालवेअर निर्माण करून अँड्रॉईड मोबाईल हॅक करण्यात येतो व त्या मोबाईलधारकाच्या बँक खात्यात सहजपणे त्यांना प्रवेश करता येतो. मोबाईलधारकाची आवड लक्षात घेऊन मालवेअर इन्स्टॉल करण्यास भाग पाडण्यात येते. एकदा मालवेअर इन्स्टॉल झाले की त्या मोबाईलवर येणाऱया ओटीपीसह सर्व गुप्त माहिती गुन्हेगारांपर्यंत सहजपणे पोहोचते.

मोबाईल वापरकर्त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन नव्या जाहिराती इंटरनेट ब्राऊजरमध्ये फिड केल्या जातात. ऍप, ई-मेलही पाठविले जातात. कोणता मेल आला आहे? हे पाहण्यासाठी जर मोबाईलधारकाने लिंकवर क्लिक केले की मालवेअर मोबाईलमध्ये इन्स्टॉल होणार आणि त्यानंतर मोबाईलमधील डेटा व त्यांच्या बँक खात्याविषयीची माहिती गुन्हेगारांच्या हाती लागते.

ही गोष्ट उघडकीस आल्यामुळेच गुगलने जोकर आणि ट्रोजन ही मालवेअर असणारी सतरा प्रकारची ऍप प्ले-स्टोअरमधून काढून टाकली आहेत. सध्या बेंगळूर, बेळगावसारख्या महानगरांमध्ये अशा पद्धतीने नागरिकांच्या बँक खात्यावर डल्ला मारण्याचा सपाटा सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरी पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी जाणाऱयांची संख्या नगण्य होती. सायबर क्राईम विभागाकडे तक्रारीसाठी जाणाऱयांची संख्या मात्र वाढली होती.

Related Stories

बैलूर भागात सुगी हंगाम जोरात

Patil_p

बेकिनकेरे तलाव धोकादायक स्थितीत

Amit Kulkarni

राज्यस्तरीय टेटे स्पर्धेत सान्वी, आयुषी, तनिष्का विजेते

Amit Kulkarni

चंद्रकांत बांडगी यांची अध्यक्षपदी फेरनिवड

Patil_p

बसथांब्यांवर जाहिराती लावण्यासाठी मिळाला कंत्राटदार

Omkar B

अनगोळ येथील जलवाहिनीला गळती

Amit Kulkarni