Tarun Bharat

प्रचंड मोर्चाने जागवली ‘उमेद’

Advertisements

अभियान बंद न करण्यासाठी सिंधुनगरीत भव्य मूक मोर्चा : अभियान बंद न होण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही : बचतगटांसाठी 100 कोटींची बँक!

प्रतिनिधी / ओरोस:

ग्रामीण जीवनोन्नती अंतर्गतचे उमेद अभियान बंद करून कंत्राटी कर्मचाऱयांना कमी करण्याच्या शासनाच्या धोरणाविरोधात अन्यायग्रस्त महिला कर्मचाऱयांसह जिल्हय़ातील नारीशक्तीने जोरदार आवाज उठवला. या अभियानाने जोडल्या गेलेल्या स्वयंसहाय्यता समूह, ग्रामसंघ आणि प्रभाग संघ या त्रिस्तरीय साखळीतील महिलांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढत शासनाला याबाबतचा जाब विचारला.

हे अभियान यापूर्वी सुरू होते, त्याच पद्धतीने सुरू राहवे. बाहय़ यंत्रणेमार्फत हे काम करण्यात येऊ नये. तसेच सद्यस्थितीत कार्यरत कर्मचाऱयांच्या सेवांना पूर्वीप्रमाणेच फेर नियुक्त्या देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी ग्रामीण जीवनोन्नती अंतर्गत उमेद अभियान सुरू करण्यात आले होते. या अंतर्गत जर्नालिझम, आयसीडब्ल्यूए सारख्या पदव्या घेतलेल्या उमेदवारांना अकरा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीच्या नियुक्त्या देण्यात आल्या होत्या. दरम्यान कोरोना काळातच या कर्मचाऱयांच्या सेवा समाप्त करण्याबाबतचे आदेश शासनाकडून जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना देण्यात आले होते.

आंदोलनांतून वेधले होते लक्ष 

सरकारच्या या निर्णयाविरोधात संबंधित अन्यायाग्रस्त कर्मचाऱयांनी यापूर्वी धरणे व अन्य आंदोलनांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले होते. तसेच उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. न्यायालयाने काही दिवसांसाठी ही परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश सरकारला दिले होते.

बचतगटांवर होणार विपरित परिणाम

 या अभियानात महिला वर्ग मोठय़ा संख्येने जोडला गेला आहे. हे अभियान बंद झाल्यास बचतगटांचे विणले गेलेले जाळे नष्ट होण्याची भीती असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी काम करणाऱया महिला कर्मचाऱयांनी सोमवारी सरकारला जाब विचारण्यासाठी राज्यव्यापी मूक मोर्चाची हाक दिली होती. सिंधुदुर्ग जिल्हय़ातील अन्यायग्रस्त महिला कर्मचाऱयांनीही यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोदवला. या अभियानातून जोडल्या गेलेल्या बचतगट, स्वयंसहाय्यता समूह, ग्रामसंघ, प्रभाग संघ यामधील महिलांनीही सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते. जिल्हा भाजप महिला मोर्चानेही याला जोरदार पाठिंबा दिला होता. सोमवारी झालेल्या मूक मोर्चात जिल्हय़ातील नारी शक्तीची मोठी ताकद दिसून आली.

मोर्चाला मिळाला प्रचंड प्रतिसाद

लॉकडाऊननंतरच्या हा पहिलाच भव्य मोर्चा ठरला. उमेदच्या कर्मचाऱयांना तसेच या अभियानांतर्गत जोडलेल्या महिलांच्या समर्थनार्थ जिल्हाभरातील महिलांची सकाळपासून सिंधुदुर्गनगरी येथे रीघ सुरु झाली होती. ओरोस फाटा ते डॉन बॉस्को पर्यंतचा रस्ता महिलांच्या उपस्थितीने हाऊसफूल्ल झाला होता. ‘सावकारी व गरिबी हटवणारी दशसूत्री आम्हाला हवी आहे’, चा बॅनर घेऊन साधारणत: अकरा वाजता निघालेला मोर्चा दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान शिस्तबद्ध पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. वर्षा मडगावकर यांच्या नेतृत्वाखाली पाच महिलांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्याकडे निवेदन सादर केले.

उमेद बंद न होण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही

जनता दरबार आणि आढावा बैठकांसाठी जिल्हा दौऱयावर असलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांचीही दहा महिलांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. जिल्हाधिकारी सभागृहात पालकमंत्र्यांनी या शिष्टमंडळांचे निवेदन स्वीकारले. तसेच याबाबतच्या सरकारच्या सध्याच्या भूमिकेची महिती दिली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चाने येऊन थांबलेल्या महिलांनाही मार्गदर्शन केले. उमेद अभियान कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही. तसेच जिल्हय़ातील 123 कर्मचाऱयांना परत घेण्यात येणार आहे. दोन्ही मागण्यांच्या पूर्ततेबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

बचत गटांसाठी 100 कोटींची बँक

उमेदच्या मागण्या मान्य करतानाच शासनाने याच अभियानामार्फत बचत गटांसाठी 100 कोटीची एक बँक मंजूर केली आहे. बचत गटांना वाऱयावर सोडलं जाणार नाही. त्यांना अजून काही देता येणं शक्य आहे का, यावरील विचार विनिमयासाठी लवकरच मुख्यमंत्री बैठक घेणार असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, संदेश पारकर, शिवसेना महिला आघाडीप्रमुख जान्हवी सावंत आदी उपस्थित होते.

भाजप महिला मोर्चाचा पाठिंबा

भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, जि. प. अध्यक्ष समिधा नाईक, शिक्षण सभापती सावी लोके यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकाऱयांनी या ठिकाणी दाखल होत या मोर्चाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. कर्मचाऱयांना वाऱयावर सोडण्याच्या शासनाच्या भूमिकेचा संध्या तेरसे यांनी निषेध केला. या अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळेपर्यंत भाजप महिला मोर्चाचा आवाज धगधगता राहणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी

दरम्यान, शिष्टमंडळासोबत जाण्यापासून रोखल्याने जि. प. अध्यक्षांसह, सावी लोके, संध्या तेरसे यांनी या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. या कर्मचाऱयांवरील अन्याय दूर व्हावा, यासाठी भाजप महिला मोर्चा पहिल्यापासूनच सक्रिय आहे. असे असताना जि. प. अध्यक्षांना रोखण्याचा प्रकार अनाकलनीय असल्याची भूमिका संध्या तेरसे आणि सावी लोके यांनी उपस्थित केली. जिल्हय़ातील पोलीस जि. प. अध्यक्षांना ओळखत नाहीत काय? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. पालकमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांनी अखेर मध्यस्थी करीत त्यांना आढावा बैठक दालनात प्रवेश दिला. त्यानंतर आंदोलक  शिष्टमंडळासोबतच प्रश्न उपस्थित करीत त्यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर आदी उपस्थित होते.

जि. प. अध्यक्षांना पोलीस रोखतात, तेव्हा..

पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी जाणाऱया महिलांच्या शिष्टमंडळासोबत भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, जि. प. अध्यक्ष समिधा नाईक, शिक्षण सभापती सावी लोके व अन्य महिला पदाधिकारी जिल्हाधिकाऱयांच्या दालनापर्यंत पोहोचल्या. पालकमंत्री आढावा बैठकीत व्यस्त असल्याने या शिष्टमंडळाला नव्याने उभारण्यात आलेल्या सभागृहात बसण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांच्यासोबतच शिवसेना महिला आघाडीप्रमुख जान्हवी सावंत याही सभागृहात पोहोचल्या. मात्र राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेल्या जि. प. अध्यक्षांना दहापेक्षा जास्त महिलांना जाता येणार नाही, असे सांगत पोलिसांकडून थांबविण्यात आले.

Related Stories

आंबा, काजू, मच्छी निर्यात वृध्दीसाठी ‘ऍक्शन प्लॅन’

Patil_p

दुकाने उघडण्याची परवानगी द्या अन्यथा उदरनिर्वाहचा प्रश्न सोडवा- व्यापारी वर्गाची आर्त विनवणी

Ganeshprasad Gogate

शिरोडा समुद्रात बुडालेल्या युवकाची पोलीसांकडून शोध मोहीम

Ganeshprasad Gogate

गणपतीपुळेत बुडून सांगलीतील तरूणाचा मृत्यू

Abhijeet Shinde

Ratnagiri; पोषण आहाराच्या धान्यात सापडली मृत पाल

Abhijeet Khandekar

रत्नागिरी : कोकणातील पाणीप्रश्नी परिपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देवून निधी द्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!