ऑनलाईन टीम / मुंबई :
अँटिलिया स्फोटकं आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. प्रदीप शर्मा यांना आज 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यासोबत संतोष शेलार, आनंद जाधवलाही 12 जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.


गेल्या काही दिवसांआधी प्रदीप शर्मा यांची एनआयए कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या अनुषंगाने शर्मा यांनी वकिलास भेटण्याची परवानगी मागितली असता त्यांना कोर्टाकडून दिलासा देण्यात आला होता. पण त्यांनतर आता कोर्टाकडून 12 जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरन हत्या प्रकरणी प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती. यानंतर एनआयए कोर्टाने त्यांना 28 जूनपर्यंत कोठडी दिली होती. यामध्ये आज पुन्हा वाढ करण्यात आली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवास्थानाजवळ सुमारे अडीच किलो जिलेटीन ठेवलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. त्यात स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरनची हत्या झाल्यानंतर हे प्रकरण अधिकच गंभीर बनले. सचिन वाझे यांच्यासह गुन्हे शाखेतील त्यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक झाल्यानंतर तपासाचा वेग वाढला आणि 18 जून रोजी याप्रकरणी प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती.