Tarun Bharat

प्रदूषणापासून सावध व्हा !

जीवांना अपायकारक किंवा विषारी असे पदार्थ पर्यावरणात मिसळण्याची प्रक्रिया म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण. पर्यावरणातील हवा, जल व मृदा अशा घटकांमध्ये अपायकारक पदार्थ मिसळल्याने पर्यावरण दूषित बनते. प्रदूषणाची तीव्रता वाढल्यास अशी पर्यावरण स्थिती सजीवांना अपायकारक बनते. प्रदूषण बहुतकरून मानवी कृतींमुळे घडून येते.

ज्या पदार्थामुळे किंवा अतिरिक्त ऊर्जेमुळे पर्यावरण दूषित होते अशा कारकाला ‘प्रदूषक’ म्हणतात. प्रदूषके पर्यावरणातील प्रक्रियांतून निर्माण झालेली असतात आणि ती स्थायू, वायू किंवा द्रव अवस्थेत असतात.

पर्यावरणात प्रदूषके किती प्रमाणात शोषली जाऊ शकतात यावरून त्यांचे दोन प्रकार केले जातात : (1) काही प्रदूषकांच्या बाबतीत पर्यावरणाची शोषणक्षमता खूप कमी असते किंवा मुळीच नसते. उदा., कृत्रिम रसायने, जड धातू, अजैविक अवनत-अक्षम प्रदूषके. अशी प्रदूषके पर्यावरणात खूप काळ साचून राहतात आणि त्यांच्यापासून जादा प्रदूषके निर्माण होत राहतात, त्यामुळे पर्यावरणाची हानी वाढतच राहते. या प्रदूषकांना ‘साठा प्रदूषके’ म्हणतात. (2) काही प्रदूषके पर्यावरणामध्ये शोषली जातात. अशा प्रदूषकांना ‘निधी प्रदूषके’ म्हणतात. मात्र पर्यावरणाच्या शोषणक्षमतेपलीकडे अशा प्रदूषकांचे प्रमाण वाढले तर पर्यावरणाला बाधा पोहोचते.

प्रदूषण समाजाच्या दृष्टीने खर्चिक असते, हे आता मान्य झाले आहे. उदा., एखाद्या कारखान्यात निघणाऱया उत्पादनांमुळे त्या परिसरातील नदी दूषित होऊ शकते. नदीमुळे शेतीसाठी सुपीक जमीन उपलब्ध होते. तसेच हॉटेल, वाहतूक, बोटिंग, इत्यादींद्वारा रोजगार उपलब्ध होतात. नदी प्रदूषित झाल्यास शेतीचे नुकसान होते व स्थानिक नगरपालिकांचा महसूल घटतो. याखेरीज नदी स्वच्छ करून परिसर सुशोभित करण्यासाठी खर्च करावा लागतो. अशा खर्चाला ‘बाह्य परिव्यय’ म्हणतात, कारण कारखान्याने वस्तुनिर्मिती करताना प्रदूषणाचा खर्च विचारात घेतलेला नसतो. कारखाने सामान्यपणे यंत्रे, उपकरणे, कामगार व कच्चा माल यावरील खर्च म्हणजे फक्त ‘खासगी परिव्यय’ विचारात घेतात. समाजाला पडतो तो खर्च खासगी परिव्यय आणि बाह्य परिव्यय यांनी मिळून होणारा सामाजिक परिव्यय असतो. जागतिक अर्थशास्त्रामध्ये सामाजिक परिव्यय ही महत्त्वाची कल्पना गेल्या काही वर्षांत पुढे आली आहे आणि त्यामुळे प्रदूषणाचे आर्थिक उपद्रव मूल्यही स्पष्ट झाले आहे.

प्रदूषणाचे स्रोत

हवा प्रदूषणाचे स्रोत नैसर्गिक तसेच मानवी असतात. मात्र ज्वलन, बांधकाम, खाणकाम, कृषी उद्योग आणि युद्धसाहित्य निर्मिती इ. मानवी कृतींमुळे हवेच्या प्रदूषणात भर पडत आहे. चीन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया, भारत, मेक्सिको आणि जपान हे देश हवा प्रदूषणाच्या उत्सर्जनात आघाडीवर आहेत. याखेरीज रासायनिक कारखाने, कोळशावर चालणारे विद्युत केंद्र, तेल शुद्धीकरण केंद्र, अणुकेंद्रकीय अपरिशिष्ट निर्मूलन प्रक्रिया, दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन इ. मोठे व्यवसाय, प्लॅस्टिक उद्योग, धातुनिर्मिती केंद्र व अन्य जड उद्योग, हवा प्रदूषणाचे स्थायी स्रोत आहेत. मागील 50 वर्षांत झालेल्या जागतिक तापनवाढीला मानवी कृती कारणीभूत असल्याचे लक्षात आले आहे.

नैसर्गिक आपत्तीच्या परिणामांमुळे प्रदूषण होत असते. उदा., चक्री वादळामुळे सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने पाण्याचे स्रोत दूषित होतात किंवा तेलवाहू जहाजे व मोटारी यांतून सांडलेल्या तेलामुळे पाणी दूषित होते. अणुऊर्जानिर्मिती केंद्र किंवा तेलवाहू वाघिणी यांचे अपघात झाल्यास घातक पदार्थ पर्यावरणात सोडले जातात. याशिवाय नैसर्गिक घटनांमुळे प्रदूषणात थेट वाढ होते. उदा., वणवा, ज्वालामुखीचा उदेक, वाऱयाने होणारी धूप, हवेत पसरलेले परागकण, नैसर्गिक किरणोत्सारिता इत्यादी. मात्र या घटना वारंवार घडत नाहीत.

पर्यावरणीय ऱहास

जल, हवा व मृदा यांच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची गुणवत्ता घटते. वातावरणातील कार्बन डायऑक्साइडच्या अतिरिक्त वाढीमुळे धूर व धूके एकत्रित होऊन धुरके निर्माण होते. हवेची गुणवत्ता घटल्यास मनुष्याला श्वसनाचे वेगवेगळे विकार होतात. छातीत वेदना होणे, छाती भरून येणे, घसादाह होणे, हृदयविकार इ. विकार हवा प्रदूषणामुळे होतात. जल प्रदूषण व तेलगळती या कारणांमुळे अनेक सजीव मृत्युमुखी पडतात. जल प्रदूषणामुळे त्वचारोग, तसेच मृत्यूस कारणीभूत ठरणारे अनेक आजार उद्‌भवतात. ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणा येतो, ताण वाढतो आणि निद्रानाश जडतो.

प्रदूषण नियंत्रण

 प्रदूषण कमी करण्यासाठी अपरिशिष्टांचे केलेले व्यवस्थापन म्हणजे प्रदूषण नियंत्रण. मानवी आरोग्य आणि पर्यावरण यांची गुणवत्ता प्रदूषण नियंत्रणावर अवलंबून असते. प्रदूषण नियंत्रण सामान्यपणे पुढील प्रकारांनी करता येते : प्रदूषण करणारे उद्योग कमी करणे, औद्योगिक क्षेत्रांतून प्रदूषके कमीत कमी बाहेर पडतील अशा आधुनिक पद्धती वापरणे, प्रदूषकांची संहती कमी करण्यासाठी ती मोठय़ा क्षेत्रात पसरविणे, अपरिशिष्टे पर्यावरणात सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करून ती सौम्य करणे. याखेरीज वापरलेल्या वस्तूंचे पुनर्चक्रीकरण, टाकाऊ पदार्थांचा पुनर्वापर, अपरिशिष्टांची किमान ‍निर्मिती, प्रदूषण रोखणे अशा कृतींद्वारा प्रदूषण कमी करता येते. अनेक देशांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी निरनिराळे प्रयत्न केले जात आहेत. हवा व जल यांचे प्रदूषण आणि
क्लोरोफ्ल्युओरोकार्बन वायुंचा वापर कसा कमी करता येईल यांसंबंधी वैज्ञानिक संशोधन करीत आहेत. इंधन बचत करण्यासाठी विजेवर चालणारी वाहने तयार केली जात आहेत. औद्योगिक अपरिशिष्टांची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन पद्धती शोधल्या गेल्या आहेत. कृषिक्षेत्रात कमी खते व कीटकनाशके वापरून अधिक उत्पादन देणाऱया जैवतंत्रज्ञानाद्वारे वनस्पतींच्या जाती शोधून काढण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून चक्रीय पीकपद्धतीचा स्वीकार केला जात आहे.

 प्रदूषणाची तीव्रता कमी करणे व त्याचा पर्यावरणातील प्रभाव मर्यादित राखून प्रदूषकांची विल्हेवाट लावणे याला ‘प्रदूषण-उपशमन’ म्हणतात. पर्यावरणातील हवा, जल, मृदा इत्यादींचे प्रदूषण कमी करण्यासाठी भारत सरकारने 1992 मध्ये प्रदूषण-उपशमन धोरण स्वीकारले आहे. या धोरणांतर्गत प्रदूषण नियंत्रणाचे उपाय आणि धोरण प्रभावी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. वाहनांतून उत्सर्जित होणाऱया वायुंवर नियंत्रण, वायू प्रदूषण व जल प्रदूषण यावर नियंत्रण, ध्वनी प्रदूषकांचे उपशमन व निवारण इत्यादींबाबत निरनिराळे उपाय सुचविण्यात येत आहेत. स्थानिक पातळीवर प्रदूषित क्षेत्रांची यादी करणे, पर्यावरण सुधारण्यासाठी योजना आखणे इ. बाबी या धोरणामध्ये समाविष्ट आहेत. 2006 मध्ये राष्ट्रीय पर्यावरण धोरण ठरविण्यात आले असून त्याअंतर्गत राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले आहे. प्रदूषणविरहित पर्यावरणासाठी कार्यक्रम राबविण्यासाठी केंद्रीय प्रदूषण मंडळ मार्गदर्शन करते. हे मंडळ हवा प्रदूषण व जल प्रदूषण उपशमनाबाबत सरकारला सल्ला देते. सर्व राज्यांनी राज्य प्रदूषण मंडळांची स्थापना केली आहे. प्रदूषणाला प्रतिबंध कसा करावा आणि व्यवस्थापन कसे करावे यांसंबंधी काही संस्था व संघटना अभ्यास करीत आहेत. प्रत्येक नागरिकांनी देखील वैयक्तिक पातळीवर प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी प्रयत्नशील असणे महत्त्वाचे आहे.

 

Related Stories

स्वच्छतेची नवी सुरुवात

tarunbharat

राधानगरी अभयारण्यात ब्लॅक पँथरही? अर्धवट काळा बिबटय़ा कॅमेऱयात कैद

Archana Banage

नारी तु नारायणी

Patil_p

वेळापत्रक आहाराचे

Patil_p

धडा व्यक्तिमत्व विकासाचा

Patil_p

मनमोहक नृत्याविष्कार सोहळा

Patil_p