Tarun Bharat

प्रभाग फेररचनेस न्यायालयात आव्हान

Advertisements

तांत्रिक मुद्यावरुन याचिका फेटाळण्याची सरकारची मागणी

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यातील 186 पंचायतींच्या निवडणुका येत्या जून महिन्यात होणार असून त्यासाठी प्रभाग फेररचना करण्यात आली आहे. दि. 25 एप्रिल 2022 रोजी या फेररचनेसंबंधी जारी केलेल्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयासमोर सादर झाली असून त्यावरील पुढील सुनावणी सुट्टीच्या काळातील एक सदस्यीय न्यायपीठासमोर होण्याची शक्यता आहे.

ही याचिका रोशन माथाईश व इतरांनी सादर केली आहे. ऍड. नायजेल दा कॉस्ता पेईश याचिकादाराच्यावतीने बाजू मांडणार आहेत. सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील सपना मोर्डेकर व गोवा राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने ऍड. एस. एन. जोशी यांनी नोटीस स्वीकारली आहे.

निवडणूक आयोगाने दिले होते आश्वासन

प्रभाग फेररचना करण्याची जबाबदारी कोणाची? सरकारची की निवडणूक आयोगाची यावर उच्च न्यायालयात प्रदीर्घ युक्तिवाद झाले होते. ही जबाबदारी घेण्याची मानसिक तयारी नसलेल्या निवडणूक आयोगाने त्यावेळी पुढील निवडणुकीवेळी प्रभाग फेररचना व राखीव प्रभाग ठेवण्यात लक्ष घालण्याचे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले होते.

मसुदा जनतेसाठी खुला करण्याची आवश्यकता

गोवा पंचायत राज कायद्याच्या कलम 7 प्रमाणे प्रभाग फेररचना करण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची असून राज्य सरकारचा सल्ला घेऊन फेररचना करायची असते. त्यात प्रामुख्याने त्या प्रभागात मतदारांची संख्या किती आहे हे पहावे लागते. प्रभागाच्या सीमा काल्पनिक नसाव्यात, अधिकतर त्या नैसर्गिक असाव्यात. मसुदा तयार झाल्यावर त्यात कोणत्याही त्रुटी राहू नये म्हणून जनतेकडून हरकती मागून घ्याव्या लागतात, तत्पूर्वी मसुदा इंटरनेटवर जनतेसाठी खुला करण्याचा आदेश यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला होता.

उच्च न्यायालयाने लक्ष घालण्याची याचना

दि. 25 एप्रिल 2022 रोजी जी प्रभाग फेररचना जाहीर झाली आहे, तिला किती जणांच्या हरकती आल्या होत्या? त्यावर सुनावणी घेण्यात आली का? समाधानकारक तोडगा काढण्यात आला का? यावर उच्च न्यायालयाने लक्ष द्यावे, अशी याचना करण्यात आली आहे.

सरकारकडून याचिकेला तांत्रिक हरकत

भारतीय संविधानाच्या कलम 243 (ओ) (ए) प्रमाणे लोकशाही मार्गाने जाहीर झालेल्या निवडणुकांमध्ये न्यायालय हस्तक्षेप करु शकत नाही. त्यामुळे तांत्रिक मुद्यावरुन याचिका विचारात घेतली जाऊ नये, अशी बाजू सरकारी वकिलांनी मांडली.

चर्चेपुर्वीच याचिका फेटाळण्याची सरकारची मागणी

प्रभाग फेररचनेची प्रक्रिया डिसेंबर 2021 पासून सुरु झाली होती. दि. 24 फेब्रुवारी ते 2 मार्च असे 7 दिवस फेररचना आराखडा राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तसेच प्रत्येक मामलेदार कार्यालयात हरकतीसाठी खुला ठेवण्यात आला होता. साधारणपणे 913 हरकती सादर झाल्या. त्यावर अभ्यास करुन योग्य तो तोडगा काढण्यात आला. आता शेवटच्या क्षणी वाद निर्माण करुन निवडणूक प्रक्रियेत खो घालणे योग्य नव्हे. त्यामुळे सदर याचिकेवर चर्चा होण्यापूर्वीच ती फेटाळण्यात यावी, अशी बाजू सरकारच्या वतीने मांडण्यात आली आहे.

याचिकेतील दुरुस्तीला दोन दिवस

या याचिकेत त्रुटी असल्याने ती दाखल करुन घेण्यापूर्वीच फेटाळण्यात यावी अशी याचना राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने ऍड. एस. एन. जोशी यांनी केली. प्रत्येक त्रुटीवर बोट ठेवून सदर याचिका ही जनहित याचिका नसून खासगी याचिका आहे. त्यात याचिकादार आपल्या प्रभागापुरताच प्रश्न उपस्थित करु शकतात, असा मुद्दा मांडला. यावेळी याचिकेत दुरुस्ती करण्यास मान्यता द्यावी अशी विनंती याचिकादाराच्या वकिलांनी केली. त्याला सरकारी वकिलांनी हरकत घेतली. अजून याचिका दाखल करुन घेण्यापूर्वीच्या स्तरावर असल्याने हरकत नसल्याचे मत न्यायपीठाने व्यक्त केले व याचिका दुरुस्तीस दोन दिवस दिले.

दोन दिवसात योग्य ती दुरुस्ती करुन सर्व प्रतिवाद्यांपर्यंत त्याच्या प्रती पोचवल्या जातील, असे याचिकादाराच्या वकिलांनी मान्य केले.

आता उच्च न्यायालयाला उन्हाळी सुट्टी आहे. द्विसदस्यीय न्यायपीठ आता जून महिन्यात भरणार आहे. त्यामुळे याचिकादाराने सदर याचिका सुट्टीच्या काळातील एक सदस्यीय न्यायपीठासमोर मांडण्यास हरकत नसल्याचे न्यायालयाने सूचवले आहे.  

लवकरच जाहीर होणार राखीवता ः पंचायतमंत्री

प्रतिनिधी

 वास्को

पंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. निवडणूक आयोग आपले काम पारदर्शकपणे बजावत आहे. आता राखीव प्रभाग जाहीर करण्यात येणार आहेत. ठरल्या वेळेत या निवडणुका होण्याची शक्यता मात्र, मावळलेली असून या निवडणुका आता आठ ते दहा दिवस उशिरा घेतल्या जाऊ शकतात असे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी म्हटले आहे. पंचायत निवडणुका 4 जूनला घेण्याचे नियोजन करण्यात येत होते. मात्र, 4 जूनला या निवडणुका घेणे आता शक्य होणार नाही. या निवडणुका आता आठ ते दहा दिवस उशिरा होतील असे मंत्री गुदिन्हो यांनी स्पष्ट केले. काल मंगळवारी चिखली येथील रस्ता डांबरीकरणाच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी त्यांनी वरील माहिती दिली.

Related Stories

राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱयांचे आझाद मैदानावर धरणे

Amit Kulkarni

कोलवा सर्कल जवळ कारने घेतला पेट

Amit Kulkarni

दोन्ही डोस घेतलेल्यांना मिळणार ‘गोवा एंट्री’!

Amit Kulkarni

वाळपई कदंब बसस्थानकावरील समांतर पुलाचे काम अंतिम टप्प्यात

Omkar B

ओल्ड गेवातील वादग्रस्त बंगल्याचे बांधकाम पाडा

Amit Kulkarni

पणजीसह पर्वरी, मडगाव, फोंडय़ातही झपाटय़ाने फैलाव

Amit Kulkarni
error: Content is protected !!