Tarun Bharat

प्रलंबित तारांकित प्रश्नावरून गदारोळ

Advertisements

ऑक्सिजन पुरवठा घोटाळाप्रकरणी विरोधक संतप्त विरोधकांनी कामकाज रोखले, सभापतींनी प्रश्नोत्तरी तास केला रद्द

प्रतिनिधी /पणजी

मागच्या अनेक विधानसभेत वारंवार पुढे ढकलण्यात आलेले 9 तारांकित प्रश्न परत याही अधिवेशनात उत्तर न देता पुढे ढकलल्याने विधानसभेत विरोधकांनी एकच गदारोळ माजवला. विधानसभेत सभापतींच्या आसनासमोर जमून कामकाज रोखल्याने सभापतीं राजेश पाटणेकर यांनी पूर्ण प्रश्नोत्तरी तास रद्द करून कामकाज साडेबारापर्यंत तहकूब केले. मोपा विमानतळ, कोमुनिदाद जमीन घोटाळा, कोल ब्लॉक, कोविड मृत्यू आणि ऑक्सिजन पुरवठा आदी प्रश्नांवर सरकार विरोधकांचा सामना करू शकत नसल्याने ही चालढकल असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

राष्ट्रगीताने विधानसभा अधिवेशनास प्रारंभ झाल्यानंतर लगेच सभापतींनी प्रश्नोत्तरी तास पुकारला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लगेच दुरुस्ती सूचना करण्याची अनुमती घेऊन 9 प्रश्न पुढच्या विधानसभा अधिवेशनात पुढे ढकलले व उत्तर पुढच्या अधिवेशनात मिळेल, असे सांगितले.

पुढे ढकललेल्या 9 प्रश्नांपैकी 5 प्रश्न रोहन खंवटे यांचे होते, हे अधिवेशन जर अंतिम अधिवेशन असेल तर पुढच्या अधिवेशनात उत्तर कोण देणार, अशी विचारणा त्यांनी केली. पुढे ढकललेल्या 9 प्रश्नांपैकी 5 प्रश्न गेल्या अनेक अधिवेशनात विचारले आहेत, ते प्रत्येक वेळी पुढे ढकलले जात आहेत. कोल ब्लॉक प्रश्नी गेल्या दोन विधानसभेत उत्तर न देता प्रश्न पुढे ढकलला. आताही ते पुढे ढकलून या कोळसा घोटाळय़ावर सरकार झाकण का घालू पहातेय, असा प्रश्न त्यांनी केला.

प्रश्न मोठा आहे, त्याचे उत्तर 5 हजार पानी असून असे मोठे प्रश्न विचारल्यावर उत्तर देणे  शक्य होत नाही, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला, तेव्हा विधानसभेत एकच गदारोळ माजला. कोळसा ब्लॉक आणि ऑक्सिजन पुरवठा यावर आरोग्यमंत्री विश्वजित राणे उत्तर देणार होते, ते विधानसभेत गैरहजर का अशी विचारणा विजय सरदेसाई यांनी केली. सकाळी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ते हजर होते, मग विधानसभेत हजर का राहू शकले नाही, असे विचारल्याने सभापतींची मान्यता घेऊनच ते गैरहजर असल्याचे सभापतींनी सांगितले, त्यावर विरोधक अधिकच खवळले. ऑक्सिजन पुरवठा घोटाळय़ाप्रकरणी वृत्तपत्रात असलेली बातमी दाखवून विजय सरदेसाई, जयेश साळगावकर, आणि विनोद पालयेकर यांनी सभापतींच्या आसनासमोर धाव घेतली. त्यानंतर विरोधीपक्षनेते दिगंबर कामत, रेजिनाल्ड आदींनी धाव घेतली. यावर आपण निवाडा देतो, असे सांगून सभापतींनी निवाडा वाचन केले, त्यात मोठे प्रश्न विचारता येणार नाहीत, असे जाहीर केले. सभापतींच्या या आदेशाने चिडलेल्या विरोधकांनी कामकाज रोखले. सभापतींनी पूर्ण प्रश्नोत्तरी तास रद्द करून विधानसभा अधिवेशन दुपारी 12.30 वा. पर्यंत तहकूब केले.

Related Stories

मॉडेल मिलिंद सोमणला कोलवा पोलीस समन्स बजावणार

Patil_p

शिक्षक हा देशप्रेमी घडविणारी शक्ती

Amit Kulkarni

अधिवेशनासाठी दोन हजारांवर प्रश्न

Patil_p

अमेरिकेत खून झालेल्या चांदर युवकाचा मृतदेह आज 2 रोजी गोव्यात

Amit Kulkarni

नावेलीतील आसरास्थळावर राखीव दलाच्या जवानांचा पहारा

Omkar B

मांद्रे येथील सिद्धांत गोवेकरला एम्स हृषिकेषमध्ये प्रवेश

Patil_p
error: Content is protected !!