Tarun Bharat

प्रशिक्षकाच्या भूमिकेत झळकणार राहुल द्रविड!

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व माजी कर्णधार राहुल द्रविड लवकरच भारतीय वरिष्ठ संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी विराजमान झाल्याचे दिसून येणार आहे. जुलैमध्ये आयोजित आगामी श्रीलंका दौऱयापुरती ही निवड मर्यादित असेल. भारताचे दोन संघ एकाच वेळी विभिन्न दौऱयावर असल्याने द्रविड यांच्याकडे ही जबाबदारी तात्पुरत्या स्वरुपात सोपवली गेली आहे.

एकीकडे, विराटच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ भारतीय संघ इंग्लंड दौऱयावर जाणार असून दुसरीकडे, दुसऱया फळीतील भारतीय खेळाडूंचा संघ लंका दौऱयावर असणार आहे. इंग्लंडमधील संघाचे प्रशिक्षकपद रवी शास्त्री यांच्याकडे तर लंका दौऱयावरील संघाचे प्रशिक्षकपद राहुल द्रविड यांच्याकडे असेल.

यापूर्वी, बेंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राहुल द्रविड यांनी भारत अ व 19 वर्षाखालील संघासमवेत दौऱयावर जाणे थांबवले होते. आता लंका दौऱयात दविड प्रशिक्षक असेल, असे बीसीसीआयमधील वरिष्ठ सूत्राने गुरुवारी नमूद केले. द्रविडकडे ही जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे, असे वृत्त वृत्तसंस्थेने दि. 17 मे रोजी दिले होते. भारतीय संघ जुलैमध्ये आयोजित लंका दौऱयात 3 वनडे व 3 टी-20 सामने खेळणार असून अद्याप या दौऱयाची अंतिम रुपरेषा जाहीर होणे बाकी आहे. साहायक पथकात पारस म्हांबरे गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत असणार आहेत. या दौऱयात भारतीय संघात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील काही अव्वल खेळाडूंसह अनेक युवा खेळाडू समाविष्ट असतील. संघाचे नेतृत्व भूषवण्यासाठी शिखर धवन, हार्दिक पंडय़ा व श्रेयस अय्यर यांच्यात रस्सीखेच असेल, असे संकेत आहेत. अय्यर खांद्याच्या दुखापतीतून पूर्ण सावरलेला असेल का, हे पहावे लागेल. अलीकडेच त्याला शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली होती.

Related Stories

संयुक्त अरब अमिरातकडून मलेशिया पराभूत

Patil_p

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी

Patil_p

दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी आजपासून

Patil_p

भारतीय भालाफेकपटू अन्नू राणीला सातवे स्थान

Patil_p

युनायटेड चषक टेनिस ः इटली अंतिम फेरीत

Patil_p

ओस्टापेंको उपांत्य फेरीत

Patil_p