समरजितसिंह घाटगे यांचा सवाल
कोल्हापूर/ प्रतिनिधी
राज्य शासनाने प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान त्यांनी जून अखेर भरल्यास देण्याची घोषणा केली आहे. आज सव्वा महिन्यांपेक्षा जादा कालावधी उलटून सुद्धा अद्याप शासनाकडून प्रामाणिक शेतकऱ्यांबाबत निर्णय घेतलेला नाही. हे अनुदान देण्याचा शासन मुहूर्त कधी काढणार ?असा उद्दिग्न सवाल भाजपाचे जिल्हाध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी उपस्थित केला आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली. मात्र या योजनेत दोन लाख रूपयांच्या आतील थकबाकीदार शेतकऱ्यांना पात्र धरले. मात्र या कर्ज माफीमध्ये प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार केला नव्हता. त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांच्यावर अन्याय झालेने या विरोधात श्री घाटगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता.
यामध्ये प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळावे, दोन लाख रूपयांच्या वरील थकबाकीदार शेतक-यांना सुद्धा कर्जमाफी मिळावी. अशा प्रामुख्याने मागण्या केल्या होत्या.
प्रामाणिक शेतकर्यांच्यावर अन्याय झाल्याचे शासनाने मान्य करून प्रामाणिक शेतकऱ्यांना 50 हजार रुपयापर्यंत अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी शेतक-यांनी त्यांच्या नावावरील कर्ज 30 जून अखेर भरावे. म्हणजे हे अनुदान देता येईल असे सांगितले होते. शेतकऱ्यांनी हे कर्ज भरून आता सव्वा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मात्र शासनाकडून याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. हा या शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय आहे. शासनाने हे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी श्री घाटगे यांनी केली आहे.
दोन लाखाच्या वरील व दोन लाखाच्या आतील अद्याप वंचित शेतकऱ्यांना ही न्याय द्या
दोन लाखापेक्षा जास्त कर्ज रक्कम असलेल्या शेतकऱ्यांसाठी दोन लाखाच्या वरील रक्कम भरल्यानंतर दोन लाखापर्यंतची रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, दोन लाखाच्या आत कर्ज रक्कम असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर जुलै 2020 अखेर त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे शासनाने जाहीर केले आहे. दोन महिन्यापूर्वी आधार प्रमाणीकरण करून सुद्धा कांही शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप ही रक्कम जमा झालेली नाही. यावर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी घाटगे यांनी केली आहे.


previous post