Tarun Bharat

प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी उंबरठय़ावरील दिवा बनून समाजात माणसे घडवण्याचे कार्य केले, ते योध्दा शिक्षक होते

मान्यवरांच्या उपस्थितीत वेलिंगकर यांचा कर्मयोगी सन्मान

प्रतिनिधी /वास्को

अनेक माणसे जन्माला येतात आणि जगाचा निरोपही घेतात. सर्वांचीच दखल समाज काही घेत नाही. त्या तोडीचे कार्य करण्याचे भाग्यही लाभावे लागते. सर्वानाच हे भाग्य लाभत नसते. प्रा. सुभाष वेलिंगकरांना हे भाग्य लाभले. उंबरठय़ावरचा दिवा  बनून ते सर्वांसाठी जीवन जगले. त्यांनी समाजात माणसे घडवली. ते कधी थांबले नाहीत तर सतत कार्यमग्न आयुष्य जगले. वेलिंगकर सर एखादय़ा विषयाचे शिक्षक नव्हते. ते विद्यार्थ्यांचे शिक्षक होते. पर्यायाने ते एक योध्दा शिक्षक होते असे उद्गार शिक्षणतज्ञ प्राध्यापक दिलीप बेतकेकर यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे गोव्यातील माजी प्रमुख व विद्यमान भारत माता की जय संघाचे प्रमुख तसेच शिक्षणतज्ञ व समाज कार्यकर्ते प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यसन्मान सोहळय़ात काढले.

  हा कार्यसन्मान सोहळा वेर्णा जुने म्हर्दोळ येथील श्री महालसा संस्थानच्या सभागृहात रविवारी संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता. या सोहळय़ाला गोव्यातील मान्यवरांसह मोठय़ासंख्येने कार्यकर्ते, परीचित व हितचिंतक उपस्थित होते. सोहळय़ाच्या व्यासपिठावर प्रमुख वक्ते प्रा. दिलीप बेतकेकर, स्वामी दुर्गानंद गिरी महाराज, मठाधिष मुकुंदराज मडगावकर महाराज, प्रा. माधवराव कामत, कृष्णराज सुकेरकर, रामदास सराफ, उद्योजक अनिल खंवटे, म्हालसा नारायणी संस्थानचे अध्यक्ष व उद्योजक कमलाक्ष नाईक उपस्थित होते. उपस्थितांमध्ये माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह राजकीय व सामाजीक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

    या सोहळय़ात प्रमुख वक्ते प्रा. दिलीप बेतकेकर यांनी प्रा. सुभाष वेलिंगकर या व्यक्तीमत्वाचा आणि त्यांच्या जीवन कार्याचा धावता वेध घेतला. ते म्हणाले की, वेलिंगकर हे समाजासाठीच सदैव कांर्यारत राहिले. कधीच न थांबता सतत कार्यमग्न राहिले. अनेक आंदोलनामध्ये आघाडीवर राहिले. समाजाच्या पाठीशी त्यांनी आपले जीवन उभे केले. अनेक आव्हानाना सामोरे गेले. सामाजीक बांधिलकी जीवनभर जपली. आपल्या ज्ञानाचा वापर समाजासाठी आणि देशासाठी केला. कधी काळी त्यांना महाविद्यालयात ज्ञानदान करण्याची संधी लाभली होती. मात्र, अवघ्या काही महिन्यांनीच आपली खरी गरज शाळेत विद्यार्थी घडवण्यासाठीच असल्याचे उमजताच त्यांनी महाविद्यालयातील पेशाला सोडचिट्ठी दिली. सामाजात निष्ठावंत शिक्षक असतात, पंडीतही खूप असतात. मात्र, सर्वानाच माणसे घडवता येत नाहीत. वेलिंगकर सरांनी हे कार्य केले. सबंध गोव्यात त्यांनी निष्ठावान कार्यकर्ते घडवले. त्यासाठीच आपले आयुष्य वेचले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ हाच त्यांच्यासाठी श्वास होता. तळमळीने संघ कार्य केले. कार्यासाठी साधने संसाधने उभी केली. घराघरांचे उंबरठे झिजवीले. समाज कार्यासाठी पसायदान केले. वेलिंगकर सरांना गोमंतकीयांची नस माहित होती. त्यातूनच त्यांनी गोमंतकीय समाजाकडे आपले त्र5णानुबंध जोडले असे सांगताना प्रा. बेतकेकर यांनी वेलिंगकर यांचे जीवन, त्यांचे शैक्षणिक आणि सामाजीक कार्य, माणसे घडवण्याची वृत्ती, सुसंस्कृत समाज, राष्ट्रभक्त समाज घडवण्यासाठी त्यांनी आयुष्यात घेतलेले कष्ट याचाही वेध घेतला. वेलिंगकर हे उंबरठय़ावरचा दिवा बनून समाजासाठी जगल्याचे प्रा. बेतकेकर म्हणाले.

कर्मयोगीचा सन्मान व गौरवग्रथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

या सोहळय़ात उपस्थितांचे स्वागत करताना प्रा. माधवराव कामत यांनीही प्रा. वेलिंगकर यांच्याविषयी गौरोद्गार काढले. त्यांच्या कार्याविषयी माहितीही त्यांनी दिली. गोव्यात भारतीय संस्कृतीला तडाखे बसत आहेत. संस्कृती संवर्धन आणि राष्ट्रवादाच्या  प्रसारासाठी प्रा. वेलिंगकर यांना यापुढेही कार्यरत राहावे लागेल असे प्रा. कामत म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रा. सुभाष वेलिंगकर यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र व मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. वेलिंगकर यांच्या जीवनावरील 130 हून अधिक लेखांचा समावेश असलेल्या कर्मयोगी या गौरवग्रथाचेही यावेळी दुर्गानंद गिरी महाराजांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रा. गजानन मांद्रेकर यांनी गौरवग्रंथावर विवेचन केले. शितल कामत यांनी मानपत्राचे वाचन केले.

गोव्यावर कसल्याही प्रकारची आव्हाने आल्यास पेलण्यास समर्थ

सन्मानमूर्ती प्रा. सुभाष वेलिंगर यांनी मनोगत व्यक्त करताना आज जो सन्मान होत आहे तो आपला नव्हे तर लोकांचा असल्याचे ते म्हणाले. आपण केवळ एक प्रतिनिधी आहे. आपल्याला लोकांची साथ मिळाली. उपस्थित लोक देशाचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्यात राष्ट्रभक्ती आहे असे सांगून पोर्तुगीज काळापासूनच्या गोव्यातील राष्ट्रवादीवृत्तीचा इतिहास त्यांनी वर्णन केला. देशासाठी सर्वांनी एकत्र येणे आजही गरजेचे आहे असे ते म्हणाले. संघाशिवाय आपले जीवन शून्य आहे. या कार्यात आणि अनेक सांस्कृतीक, सामाजीक कार्यात आपल्याबरोबर राहिलेल्या उपस्थित मान्यवरांचाही त्यांनी गौरव केला. जेव्हा तत्वांचा प्रश्न आला. तेव्हा सत्तेची पर्वा न करता तत्वांच्या रक्षणासाठी जे पुढे आले त्यांचाही वेलिंगकर यांनी सन्मान केला. या पुढेही गोव्यात कसल्याही प्रकारची आव्हाने निर्माण झाल्यास ती पेलण्यास आम्ही समर्थ आहोत. इतर राज्यात घडणारे प्रकारे गोव्यात यशस्वी होऊ देणार नाही असे वेलिंगकर म्हणाले.

Related Stories

स्मार्ट सिटीत 350 कोटीच्या महाघोटाळ्याची शक्यता

Patil_p

‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे पोस्टर न लावल्याने मडगावात तणाव

Amit Kulkarni

पाणी बिलात 5 टक्के वाढ

Amit Kulkarni

मडगावच्या श्री हरिमंदिराची दिंडी साधेपणाने

Patil_p

फोंडय़ातील सफा मशिदच्या तटबंदीचा भाग कोसळला

Omkar B

पणजीतील पे पार्कीगमुळे मानवी हक्क भंग नाही

Amit Kulkarni