Tarun Bharat

प्रेयसीचा खून; निष्पाप दोन मुलांनाही संपवले

Advertisements

वार्ताहर/ एकंबे

कोरेगाव तालुक्यातील वेलंग (शिरंबे) येथे ऊस तोडणी कामगार दत्ता नारायण नामदास याने आपली प्रेयसी योगिता दत्ता नामदेव उर्फ योगिता हुंडे (वय 38) हिचे परपुरुषाबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून गळा दाबून खून केला. त्यानंतर तिच्या 13 व 14 वर्षाच्या दोन्ही मुलांना मोटारसायकलवर बसवून जवळच्या शेतात नेले आणि मोठय़ा विहिरीत ढकलून देऊन त्यांचीही हत्या केली. ही घटना बुधवार दि. 15 जून रोजी रात्री 11 च्या सुमारास घडली. गुरुवारी रात्री ती उघडकीस आली. याप्रकरणी अकलूज पोलिसांच्या मदतीने दत्ता नामदास याला श्रीपूर बोरगाव (ता. माळशिरस) येथून अटक करण्यात आली. दरम्यान, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी सूचना केल्या. दोन्ही मुलांचे मृतदेह शुक्रवारी बाहेर काढण्यात आले. 

याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरुन व रहिमतपूर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, दत्ता नारायण नामदास हा उस्मानाबाद जिह्यातील राजे बोरगाव येथील रहिवासी असून ऊस तोडणी कामगार म्हणून तो गेले काही वर्ष कोरेगाव तालुक्यात एकंबे, सायगाव, शिरंबे परिसरात काम करत आहे. स्थानिक ऊस तोडणी वाहतुकदाराकडे काम करत असताना तो वेलंग-शिरंबे येथे भाडय़ाने खोली घेऊन राहत होता. कारखान्याचा गळीत हंगाम संपल्यानंतर टोळीबरोबर मूळगावी परत न जाता तो येथेच थांबला. वेलंग शिरंबे येथे राजेंद्र सपकाळ यांच्या घरामध्ये खोली भाडय़ाने घेऊन प्रेयसी योगिता, मुले समीर व तनू यांच्यासमवेत राहत होता. परिसरातील शेतकऱयांकडे पडेल ते शेतीतील काम करत होता. चारच महिन्यात तो गावकऱयांशी एकरुप झाला होता. 

योगिता ही त्याची पत्नी नव्हती, त्याची पत्नी एका युवकाबरोबर पळून गेली आहे, तर योगिता देखील पतीपासून वेगळी राहत होती. ऊस तोडणीच्या माध्यमातून एका टोळीत काम करत असताना तिचे व दत्ता यांचे सुत जमले आणि दोघांनी एकत्रित संसार करण्याचा निर्णय घेतला. योगिता हिचे परपुरुषाबरोबर अनैतिक  संबंध असल्याचा त्याला दाट संशय होता. त्यावरून दोघांमध्ये सातत्याने भांडणे होत होती. योगिताच्या वागण्यामध्ये बदल झाल्याने दत्ता याचा संशय दाट होत गेला आणि त्यातून त्याने थंड डोक्याने तिला संपविण्याचा निर्णय घेतला. 

बुधवारी तो नेहमीप्रमाणे वागत होता, त्याच्या डोक्यात नेमके काय चालले आहे, याचा थांगपत्ता योगिता हिला नव्हता. रात्री एकत्रित जेवण केल्यानंतर सर्वजण झोपी गेले. योगिता हिला गाढ झोप लागल्याचे लक्षात येताच त्याने तिचा गळा दाबून खून केला, त्यात तिचा तडफडून जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने झोपलेल्या मुले समीर व तनु यांना लघवीला बाहेर जायचे आहे, असा बहाणा करून उठवले व मोटारसायकलवरून मळ्यातील एका विहिरीवर नेले. जाताना त्याने खोलीला पध्दतशीरपणे बाहेरून कडी लावली. विहिरीजवळ आल्यानंतर अंधारात दोघांना विहिरीत ढकलून दिले. दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर दत्ता हा मूळगावी निघून गेला. 

गुरुवारी सायंकाळी नामदास यांच्या खोलीतून कुजलेला वास येऊ लागल्याने घर मालक सपकाळ यांना संशय आला. त्यांनी पोलीस पाटील सचिन सुतार यांना माहिती दिली. त्यानंतर रहिमतपूरचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सावंत, पोलीस अंमलदार मांडवे व देशमुख हे वेलंग येथे दाखल झाले. त्यांनी खोलीचे दार उघडल्यानंतर योगिता ही मृतावस्थेत आढळून आली. तिच्या गळ्यावर ओरखडे होते. तर नाकातून रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी दत्ता नामदास याच्याबाबतीत चौकशी केली. मात्र तो दोन दिवस गावात नसल्याचे समजले. तो अकलूज नजिकच्या श्रीपुर बोरगाव येथे त्याची बहीण ज्योती बापू अहिवळे हिच्या घरी आला असल्याची माहिती मिळाली.

रहिमतपूर पोलिसांनी अकलूज पोलीस ठाण्यात खुनाच्या घटनेची माहिती देऊन दत्ता नामदास यास ताब्यात घेण्यास सांगितले. श्रीपूर बोरगावच्या पोलीस पाटलांनी प्रसंगावधान राखत ज्योती बापू अहिवळे हिचे घर गाठून दत्ता नामदास हा तेथे आल्याचे अकलूज पोलिसांना कळविले. त्यांनी तातडीने त्या त्याला ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात नेले. रहिमतपूर पोलीस ठाण्याचे हवालदार भुजबळ व मुंडे यांनी दत्ता नामदास यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यावर खुनाची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळपासून पोलिसांनी विहिरीवर तळ ठोकला व दोन्ही मृतदेह युवक व ग्रामस्थांच्या सहकार्याने बाहेर काढले. वेलंग व शिरंबे ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी भेट देत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड व उपनिरीक्षक प्रमोद सावंत यांना तपास कामी सूचना केल्या. 

प्रेमाचा त्रिकोण आणि तिहेरी हत्याकांड

दत्ता नामदास हा उस्मानाबाद जिह्यातील तर योगिता ही सुध्दा त्याच्या गावाजवळच्या गावातील. ऊस तोडणी टोळीच्या माध्यमातून दोघांचे सूत 8 ते 9 वर्षांपूर्वी उसाच्या फडातच जुळले. दत्ता याची पत्नी दुसऱया युवकाबरोबर पळून गेली तर योगिता हिचे चालचलन पाहून पती मुलांना घेऊन वेगळा राहत होता. पत्नीच्या व्यवहारावरुन गावात बदनामी होत असल्याने त्याने पुण्यात जाऊन राहणे पसंत केले होते. दत्ता हा बहिणीच्या ओळखीतून वेलंगमध्ये वास्तव्यास आला होता. योगिता देखील काही महिन्यांपूर्वी वेलंगमध्ये आली होती. दोघेही पती-पत्नी सारखेच राहत होते, वागत होते. दोघांबद्दल कोणालाही शंका नव्हती, दत्ता याला प्रेयसीचा संशय येऊ लागला आणि तिहेरी हत्याकांड घडले.

Related Stories

पोकलेनचे लोखंडी बकेट लागल्याने ऑपरेटर युवकाचा मृत्यू

Patil_p

जलशक्ती मंत्रालयतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्पर्धा

Patil_p

नागठाणे विद्यालयात चोरी

datta jadhav

‘कृष्णा’साठी पहील्या दिवशी सहा अर्ज दाखल

Patil_p

कोटींच्या चीपची अफवा; चौघांना जेलची हवा

Patil_p

वेस्ट एक्सेंज सेंटर ठरले माणुसकीचा आधार

Patil_p
error: Content is protected !!