Tarun Bharat

प्रो हॉकी लीग मोसम वाढविण्याचा निर्णय

उर्वरित सामने जून 2021 पर्यंत खेळविण्यास एफआयएच-राष्ट्रीय फेडरेशन्सची मान्यता

वृत्तसंस्था/ लॉसेन

कोरोना व्हायरसच्या साथीने निर्माण झालेल्या अनिश्चित परिस्थितीमुळे अकरा सहभागी देशांच्या राष्ट्रीय फेडरेशन्सच्या संमतीने एफआयएच प्रो हॉकी लीगच्या दुसऱया आवृत्तीचा कालावधी जून 2021 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने शुक्रवारी जाहीर केले.

आधीच्या नियोजनानुसार हॉकी प्रो लीगचा दुसरा मोसम जानेवारी ते जून 2020 पर्यंत घेतला जाणार होता. जानेवारीला त्याची सुरुवातही झाली आणि मार्चच्या सुरुवातीपर्यंत स्पर्धेतील एक-तृतीयांश सामने पूर्णही झाले आहेत. पण कोव्हिड 19 च्या साथीनंतर या स्पर्धेबरोबरच जगभरातील अनेक लहानमोठय़ा स्पर्धांना ब्रेक लागला. एफआयएचने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात सांगितले की, ‘कोव्हिड 19 च्या साथीमुळे परिस्थितीत सारखा बदल होत आहे. त्यामुळे आम्ही सहभागी देशांच्या राष्ट्रीय फेडरेशन्सशी सतत संपर्कात असून पूर्ण सुरक्षिततेची खात्री झाल्यानंतरच उर्वरित सामन्यांना सुरुवात करण्याबाबत आम्ही विचार करीत आहोत. कोणताही निर्णय घेताना खेळाडूंची सुरक्षितता आणि स्वास्थ्य याला प्राधान्य देण्याचे आमचे ध्येय असेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशी आणि टोकियो ऑलिम्पिक लांबणीवर टाकण्याचा घेण्यात आलेला निर्णय विचारात घेऊन 2021 च्या मध्यापर्यंत हॉकी लीगचा मोसम वाढविण्यास आम्ही मान्यता दिली आहे. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी हाच सर्वोत्तम उपलब्ध मार्ग आहे,’ असेही त्यांनी म्हटले आहे.

जगभरातील कोव्हिड 19 साथीच्या स्थितीवर एफआयएचने बारकाईने लक्ष ठेवले असून खेळाडूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत स्पर्धेचा उर्वरित भाग सुरू करण्याचे निश्चित झाल्यास त्याच्या तारखा योग्य वेळी जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘संपूर्ण विश्व सध्या अभूतपूर्व अशा आरोग्य समस्येशी मुकाबला करीत असून अशावेळी स्पर्धा पुन्हा केव्हा सुरू होणार याचे निश्चित भाकीत करणे अशक्य आहे. अडचणीची परिस्थिती असली तरी एफआयएच आणि राष्ट्रीय संघटना यांच्यात झालेली चर्चा सकारात्मक आणि रचनात्मक झाली. सध्याच्या परिस्थितीत हॉकी प्रो लीग पुढे सुरू करण्याबाबत आम्ही योग्य मार्ग काढलेला आहे, असा आम्हाला विश्वास वाटतो. या निर्णयामुळे उर्वरित सामने पूर्ण करण्यासाठी जादा अवधी मिळाला असून खेळाडू आणि स्पर्धेच्या कॅलेंडरवरील दडपणही कमी होणार आहे,’ असे एफआयएचचे सीईओ थिएरी वेइल म्हणाले.

Related Stories

टी-20 मालिकेत बांगलादेशची विजयी सलामी

Patil_p

वनडे, कसोटीचे नेतृत्व विराटकडेच हवे – सेहवाग

Patil_p

न्यूझीलंडचा पहिल्या डावात 449 धावांचा डोंगर

Patil_p

अल्टिमेट खो खो स्पर्धेत ओडिशा जगरनट्स संघाला विजेतेपद

Patil_p

भारतीय तिरंदाजांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Patil_p

मराठमोळे मल्ल निघाले जग जिंकायला!

datta jadhav