निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांचे आवाहन, राष्ट्रध्वजाचा आवमान केल्यास कायदेशीर कारवाई
प्रतिनिधी/कोल्हापूर
राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये यासाठी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी केले आहे.
स्थानिक पातळीवर नागरिकांनी तसेच जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, मंडळे, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, आरोग्य संस्था अशा शासकीय-निमशासकीय यंत्रणा तसेच सामाजिक अशासकीय संस्था व स्थानिक पोलीस यंत्रणा यांना प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. तसेच स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणानंतर रस्त्यावर किंवा इकडे तिकडे पडलेले राष्ट्रध्वज योग्य तो मान राखून ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नष्ट करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
येत्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन समारंभ जिल्हय़ातील विविध शासकीय, निमशासकीय तसेच खासगी संस्थांमार्फत ध्वजारोहणाने साजरा होणार आहे. स्थानिक पातळीवर जनतेमार्फत राष्ट्रध्वजाविषयी असलेले प्रेम, निष्ठा, अभिमान दर्शविण्याकरिता वैयक्तिकरित्या छोटय़ा राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. काही वेळा राष्ट्रीय कार्यक्रमाच्यावेळी तसेच विशेष कला क्रीडा प्रसंगी वैयक्तिकरित्या वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज रस्त्याच्या कडेला किंवा इतर ठिकाणी पडलेले, विखुरलेले आढळतात. राष्ट्रध्वजाच्या वापरानंतर त्याचा योग्य तो मान राहील या प्रमाणे ठेवण्यात यावेत. कागदी ध्वजाचा वापर करताना योग्य तो मान राखणे आवश्यक आहे. राष्ट्रध्वज रस्त्यावर व अन्य ठिकाणी फेकून देवू नये, ते खराब झाले असल्यास ते ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नष्ट करण्यात यावेत. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा या संदर्भात शासनाच्यावतीने वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. तसेच जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा 1971 कलम 2 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही निवासी उपजिल्हाधिकारी गलांडे यांनी स्पष्ट केले आहे.