Tarun Bharat

फक्त एकच हाती होतं, ‘देवाचा धावा’

‘सिंदबादच्या सात सफरीं’ची आठवण करून देणारा खलाशी सूर्यकांत सावंत यांनी अनुभवलेला थरार

प्रशांत वाडेकर / देवगड:

‘रविवार, 16 मे रोजी दुपारी 1.30 ची वेळ. ‘तौक्ते’ वादळाच्या वाऱयाचा वेग प्रचंड वाढला होता. मुसळधार पाऊस कोसळत होता. बोटीवर उंच लाटा आदळत होत्या. बंदरातील बोटीही एकमेकांवर आदळत होत्या. अशातच आमच्या ‘आर्ची’ बोटीचा नांगर दुसऱया बोटीच्या नांगरात फसला आणि दोन्ही बोटींना आधारच राहिला नाही. बोटी वादळामध्ये भरकटत जाऊ लागल्या. बोटी बुडणार हे लक्षात येताच एका सहकाऱयाने बचावासाठी बोटीवरील कॅन घेऊन पाण्यात उडी घेतली. मला पोहता येत नसल्याने मी तीन तास बोटीवर मागील बाजूच्या खांबाला घट्ट धरून बसलो. डोळय़ासमोर मृत्यू दिसत होता. डोळे मिटून देवाचा धावा करीत होतो. अन बोट खडकावर आदळली. भल्या मोठय़ा लाटेबरोबर मी बाहेर फेकला गेलो. यावेळीच हाताला झाडाची फांदी मिळाली. त्या फांदीला मी घट्ट पकडून राहिलो अन सुदैवाने माझे प्राण वाचले,’ जीवघेण्या प्रसंगातून वाचलेले ‘आर्ची’ बोटीवरील खलाशी सूर्यकांत साबाजी सावंत यांनी हा सारा प्रसंग कथन केला.

‘दर्यावदीं सिंदबादच्या सात सफरी’ अनेकांनी वाचल्या असतील. त्या वाचताना त्यातील रोमांचही अनुभवला असेल. सूर्यकांत सावंत जेव्हा वादळात त्यांची बोट कित्येक किलोमीटर भरकटत जात एका खडकावर जाऊन आदळली अन झाडाच्या आधाराने ते कसे जीव मुठीत घेऊन राहिले’ हा प्रसंग सांगत होते, तेव्हा सिंदबादच्या सात सफरींची आठवण झाली नसती, तर नवलच. अर्थात काल्पनिकता आणि वास्तविकता, यात फरक हा असतोच. वादळ ओसरल्यानंतर सावंत यांनी सांगितलेला सारा प्रसंग ऐकताना कदाचित ऐकणाऱयाला तो थरार तेवढय़ा तीव्रतेने जाणवणार नसेल, पण हा सारा प्रकार ज्यांनी अनुभवला, त्या सावंत यांच्या डोळय़ासमोरून मात्र पुढील कित्येक दिवस हा प्रसंग हलणार नाही, हे नक्की

वादळी वारे सुरू झाले, अन्…

बंदरामध्ये सुरक्षिततेसाठी नांगरून ठेवलेल्या बोटींपैकी आनंदवाडी येथील सौ. अक्षता नीरज कोयंडे यांची ‘आर्ची’ व रघुनाथ कोयंडे यांच्या मालकीची ‘रुक्मिणी’ या दोन बोटी चक्रीवादळात भरकटत पालये समुद्र किनाऱयावरील खडकावर आदळल्या होत्या. या चक्रीवादळाच्या संकटाचा सामना करीत बचावलेल्या कणकवली तालुक्यातील हुंबरट येथील खलाशी सूर्यकांत सावंत यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले की, देवगड समुदामध्ये रविवारी सकाळी 11 वाजल्यापासून वादळी वारे सुरू झाले. आमच्या बोटी देवगड बंदरात नांगरलेल्या होत्या. बोटीवरील तांडेल घरी गेले होते. मी आणि माझा सहकारी राजेंद्र कृष्णा कदम आम्ही दोघेच खलाशी बोटीवर होतो. मी सात महिन्यांपूर्वी खलाशी म्हणून बोटीवर काम करीत होतो. माझा यापूर्वी कधीही समुद्राशी संबंध नव्हता. मला पोहताही येत नाही. दुपारी 1.30 वा. पासून जोराचे वारे सुरू झाले. वाऱयाचा वेग प्रचंड होता. वाऱयाने बंदरातील बोटी एकमेकांवर आदळत होत्या. त्यातच आमच्या बोटीचा नांगर सुटला आणि बाजूला असलेल्या रुक्मिणी बोटीच्या नांगरामध्ये अडकला. आम्ही नांगर वर काढण्याचा प्रयत्न केला, पण नांगर वर आला नाही. नांगर एकमेकांमध्ये फसलेल्या दोन्ही बोटींना बंदरात आधार राहिला नव्हता. त्यात रुक्मिणी बोटीवर एक तांडेल व खलाशी होता. त्या तांडेलला त्याच्या बोटीचे इंजिन बिघडल्याने त्याची बोटही बाहेर काढता येत नव्हती. आमच्या बोटींवर तांडेल नसल्याने आमची बोटही चालविणे शक्य नव्हते. अशातच प्रचंड लाटा आणि वाऱयाचा वेग सुरू झाला. वारा एवढा प्रचंड होता, की बोटीवर उभे राहणे देखील अवघड होते. मी आणि माझा सहकारी बोटीला घट्ट धरून बसलो होतो. बोट वाऱयाच्या प्रवाहाने भरकटत जाऊ लागली होती. समुद्राच्या लाटा बोटीपेक्षाही उंच आदळत होत्या. वादळाने भयानक रुप धारण केले होते. उंच लाटा आणि बोट भरकटत चालल्याने आम्ही घाबरलो. बोट बुडणार याची खात्री आम्हाला झाली होती. आमच्या डोळय़ासमोर मृत्यू दिसत होता. माझा सहकारी राजेंद्र कदम याने मला सांगितले, आपली बोट बुडणार. आपण आपला जीव वाचवायला हवा. त्याने बोटीवरील पाण्याचे कॅन घेतले आणि मला सांगितले, ‘सावंतमामा मी उडी मारतो, तुम्ही माझ्या मागून उडी मारा, असे सांगत त्याने पाण्यात उडी घेतली. मला पोहता येत नसल्याने मी उडी घ्यायला घाबरलो. मी बोटीतच थांबण्याचा विचार केला. कदम यांनी उडी मारल्यानंतर ते पाण्यात गायब झाले, ते दिसलेच नाहीत. त्यामुळे मी आणखी घाबरलो.

अन् फांदीचा आधार मिळाला

मी समुद्राच्या अनुभवामध्ये नवखा असल्याने बोटीच्या मागील बाजूला घट्ट धरून बसून राहिलो. मी ग्रामदेवतेचा धावा करू लागलो. माझा डोळय़ासमोर माझे कुटुंब मला दिसत होते. आपण आता संपणार हे मनाशी ठरवून घेतले होते. सतत देवाचा धावा करीत होतो. आमच्या बोटीच्या पुढे रुक्मिणी ही बोट वाहत जात होती. त्या बोटीवरील तांडेल व खलाशी देखील घाबरले होते. तेही बोटीवरच थांबले होते. तीन तासाहून अधिक वेळ वादळामध्ये बोट भरकटत जात होती. बोट कुठे जात होती हे वादळ आणि पावसामुळे किनाराही दिसत नव्हता. सुरुवातीला रुक्मिणी ही बोट जाऊन किनाऱयावरील खडकावर फेकली गेली. तेव्हा त्या बोटीवरील खलाशी त्या बोटीतून सुखरुपपणे किनाऱयावर पोहोचले. रुक्मिणी बोटीच्या पाठोपाठ आमची आर्ची ही बोट जाऊन खडकावर आदळली. मी बोटीच्या मागील बाजूला काठावरच असल्याने समुद्राच्या लाटेबरोबर बाहेर फेकला गेलो त्यावेळी मला एका झाडाच्या फांदीचा आधार मिळाला. त्यामुळे माझा जीव वाचला अन्यथा खडकावर पडून मृत्यूही झाला असता.

पालये किनाऱयावर जाऊन पोहोचलो

रुक्मिणी बोटीवरील तांडेल आणि खलाशाने मला झाडाच्या फांदीवर असल्याचे पाहिल्यानंतर त्यांनी मला आधार देऊन किनाऱयावर आणले. तेथून आणि डोंगरातून वस्तीमध्ये गेलो, तेव्हा समजले की हा पालये किनारा आहे. ती साधारण सायंकाळी 4.30 वा. ची वेळ होती. तेथील एका घरात गेल्यानंतर त्यांना आम्ही सर्व वस्तुस्थिती सांगितली. तेथून देवगडला येण्यासाठी गाडीची व्यवस्था विचारली तर रस्त्यावर झाडे व विजेचे खांब व तारा तुटल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला आता जाता येणार नाही. पालये येथील त्या ग्रामस्थाने आम्हाला कपडे, पांघरूण व जेवण, चहा, नाष्टा दिला. दुसऱया दिवशी सकाळी एका टेम्पोतून आम्ही देवगड गाठले. देवगडमध्ये आल्यावर बोट मालक व पोलिसांना माहिती दिली, असे सावंत यांनी सांगितले. सावंत म्हणतात, वादळाचे तो दिवस आठवला की अंगावर शहारे येतात. या वादळात माझा एक सहकारी गमावल्याचे दु:ख आहे. देव माझ्या पाठिशी होता म्हणूनच मी या मोठय़ा संकटातून वाचलो.

Related Stories

चिपळूणकरांच्या डोक्यावर वाढीव कराचा बोजा

Patil_p

बेस्टमधील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीचे पत्र

Archana Banage

कोरोनामुळे उद्याच्या दहिकाल्याचा माहोलही शमला

Patil_p

बांदा येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला

NIKHIL_N

आझादी अमृत महोत्सवात सिंधुकन्येचा नृत्याविष्कार

Anuja Kudatarkar

एकात्मिक बालविकास योजनाच्यावतीने महिला दिन साजरा

Anuja Kudatarkar