मुंबई / ऑनलाईन टीम
ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला. हा सरकारी कामातील हस्तक्षेप असून त्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, पोलिसांना माहिती मिळाली की मुंबईत जवळपास ५० हजार रेमडेसिवीर येत आहेत. त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी ब्रुक्स फार्मा या कंपनीच्या संचालकांना पोलिसांनी काल पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं असता, त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व त्यांचे अन्य सहाकारी त्या ठिकाणी पोहचले. यानंतर त्यांनी प्रश्न उपस्थित केला की या व्यक्तीला या ठिकाणी का व कशासाठी बोलावलं गेलं आहे. जर एखाद्या प्रकरणात पोलिसांना चौकशी करावीशी वाटली तर पोलिस कोणालाही बोलावू शकतात, त्या दृष्टीने त्यांना बोलावण्यात आले होते. या ठिकाणी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. एकप्रकारे शासकीय कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी या निमित्त एवढंच सांगू इच्छितो अशाप्रकार पोलिसांवर दबाव टाकणं हे योग्य नाही. या दृष्टीकोनातून या पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत.
या संदर्भात माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असं गृहमंत्री वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं. हा साठा सरकारला देण्यात येणार नव्हता. खासगी पार्टीला हा साठा देण्यात येणार होता. एफडीएने लसीचा पुरवठा करण्याची विनंती ब्रुकच्या मालकाला केली होती. त्यावर त्याने असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे हा साठा कुणाकडे जाणार होता, याची चौकशी करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, हा साठा पोलिसांनी जप्त केलेला नाही. हा साठ कंपनीकडेच असून त्याचा वेगळा वापर करणार आहेत की नाही याची चौकशी करण्यात येईल. या कंपनीकडे अधिक साठा असण्याची शक्यताही गृहमंत्री वळसे पाटील यांनी यावेळी वर्तवली आहे.


next post