मुंबई / ऑनलाईन टीम
एका मतदारसंघाच्या निवडणुकीने काय फरक पडणार आहे, त्याने काय सरकार बदलणार आहे का, असे अनेकांना वाटत असेल. पण, सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, सरकारला जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. फडणवीसांच्या या वक्तव्याला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देताना, सरकार पाडल्यानंतर आम्ही तुमचं अभिनंदन करू, असे म्हटलंय.
खासदार संजय राऊत म्हणाले की, सत्ता बदलाचं आम्ही त्यांच्यावरच सोडलंय आम्ही. पण, त्यांनी पंढरपूरात जाऊन हे विधान केल्यामुळे प्रत्यक्ष विठोबा-माऊलीसुद्धा अत्यंत सावध झाली असेल. पण, विठु-माऊलीचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे. विरोधी पक्षाला अशी भाषणं करावीच लागतात. यापूर्वी आम्हीही अशी भाषणं केलेली आहेत, लोकांमध्ये उत्साह आणण्यासाठी, त्यांचे आमदार एकत्र ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस तसे भाषण करत असतील. या काळात सरकार पडणार, सरकार पाडणार, सरकार अस्थिर करणार हे, जेव्हा ते पाडतील तेव्हा त्यांचं अभिनंदन करू, असेही राऊत यांनी म्हटलंय.
सरकारचं काऊंटडाऊन म्हणता येणार नाही. राजकारणात मंत्र्यांचे राजीनामे, सरकारवर आरोप-प्रत्यारोप होणं हे नवीन नाही. फडणवीस सरकार होतं तेव्हासुद्धा अशाप्रकारचे आरोप, मंत्र्यांचे राजीनाम्याच्या घटना घडल्या होत्या. काही मंत्र्यांनी राजीनामे देणं गरजेचं असतानाही राजीनामा देण्यात आला नव्हता. या राजकारणाच्या चालिरिती किंवा परंपरा आहेत. विरोधी पक्ष जे काही ओरडत फिरतोय त्यामुळे सरकारला धोका आहे, असं मला वाटत नाही, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.


previous post
next post