Tarun Bharat

फळपिक विम्याची भरपाई रक्कम जाहीर

सिंधुदुर्गला 51 कोटी 71 लाख देय : केंद्र, राज्य शासनाचा हिस्सा मिळताच प्रत्यक्ष लाभ मिळणार

आंबा पिकासाठी     46 कोटी

काजू पिकासाठी     5.71 कोटी

प्रतिनिधी / ओरोस:

फळपिक विमा योजनेंतर्गत विमा कंपनीने आंबा व काजू पिकाची मंडळनिहाय हेक्टरी नुकसान भरपाईची रक्कम जाहीर केली आहे. शेतकऱयांनी आपला विमा हप्ता भरला असला, तरी केंद्र व राज्य शासनाने हिश्शाची रक्कम अद्याप विमा कंपनीला दिलेली नाही. ती मिळताच शेतकऱयांना नुकसान भरपाईचा प्रत्यक्ष लाभ दिला जाणार आहे. विमा कंपनीने मंडळनिहाय निश्चित केलेल्या आकडेवारीनुसार सुमारे 51 कोटी 71 लाख रुपये शेतकऱयांना देय होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे कोरडवाहू क्षेत्र विकास अधिकार अरुण नातू यांनी स्पष्ट केले.

हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत जिल्हय़ातील आंबा व काजू बागायतदारांनी 2020-21 वर्षातील हंगामासाठी विमा संरक्षण घेतले होते. जिल्हय़ातील 22,857 शेतकऱयांनी 6 कोटी 97 लाख रुपयांचा विमा हप्ता भरून 10,703 हेक्टर क्षेत्र संरक्षित केले होते. विमा कवच लाभ देण्यासाठी एचडीएफसी या विमा कंपनीची शासनाने नियुक्ती केली होती.

भरपाई रक्कम निश्चित

31 मे 2021 रोजी अंाब्याचा संरक्षण कालावधी संपल्यानंतर पुढील 45 दिवसांत ही नुकसान भरपाई जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र सप्टेंबर महिना संपत आला, तरी ती जाहीर न झाल्याने याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान एचडीएफसी या विमा कंपनीने मंडळनिहाय हेक्टरी नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली गेली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला मेलद्वारे कळविली आहे.

भुईबावडा महसुलात सर्वाधिक भरपाई

योजनेत अंतर्भूत नुकसान भरपाईसाठीचे निकष पूर्ण करणाऱया मंडळात आंबा पिकासाठी 83 हजार 900 रुपये हेक्टरी एवढी सर्वाधिक रक्कम आहे. तर काजू पिकासाठी 61 हजार रुपये हेक्टरी एवढी सर्वाधिक रक्कम निश्चित झाली आहे. वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा महसूल मंडळातील शेतकऱयांना या सर्वाधिक रकमेचा लाभ होणार आहे. तर उर्वरित मंडळांमधून कमी-जास्त रक्कम निश्चित झाली आहे.

नऊ मंडळांना काजूची नुकसानी नाही

जिल्हय़ात 39 महसूल मंडळे आहेत. मंडळनिहाय स्वयंचलित हवामान केंद्राच्या नोंदीनुसार विमा कंपनीकडून ही नुकसान भरपाई दिली जाते. दरम्यान 39 पैकी नऊ महसूल मंडळांना काजू पिकाची नुकसान भरपाई मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. यामध्ये बापर्डे, देवगड, पडेल, पाटगाव, शिरगाव, भेडशी, तळकट, मसुरे, एडगाव या नऊ महसूल मंडळांचा समावेश आहे.

वेंगुर्ले, देवगड, मिठबाव, पडेल या मंडळातील आंबा बागायतदारांना 19 ते 20 हजार रुपये हेक्टरी दिले जाणार आहेत. समुद्र किनारे आणि लगतच्या भागात आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे. उकाडा जाणवतो, मात्र तापमानावर त्याचा परिणाम झालेला दिसत नाही. त्यामुळे ही रक्कम कमी झाली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

कंपनीने निश्चित केलेल्या मंडळनिहाय हेक्टरी नुकसान भरपाई रकमांच्या आकडेवारीनुसार आंबा पिकासाठी 46 कोटी, तर काजू पिकासाठी 5 कोटी 71 लाख रुपये मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भरपाईसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा

शेतकरी हप्त्याबरोबरच या योजनेत केंद्र व राज्य सरकारकडून विमा हप्त्याची रक्कम कंपनीला दिली जाते. यावर्षीची रक्कम दोन्ही सरकारांकडून अद्याप कंपनीकडे जमा झालेली नाही. त्यामुळे हिस्सा रक्कम शासनाकडून जमा होताच या रकमेचा प्रत्यक्ष लाभ संबंधित विमाधारक शेतकऱयांना दिला जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱयांना या रकमेची आणखी काही दिवस तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Related Stories

रत्नागिरीचा महिला खो-खो संघ उपउपांत्य फेरीत

Patil_p

पोलीस पाटील वासुदेव गावकर यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सन्मान

Anuja Kudatarkar

आता ड्रोन कॅमेऱयाद्वारे जमिनींचे सर्वेक्षण

NIKHIL_N

तुळस येथे 9 जानेवारीला वकृत्व स्पर्धा

NIKHIL_N

ब्रेक निकामी झालेल्या एसटी अपघातातून 45 प्रवासी बचावले

Patil_p

मंडणगड तालुका जाणार नवीन जिल्हय़ात?

Patil_p