Tarun Bharat

फातोर्डातील बंद केलेली कामे सुरू करण्यास 24 तासांची मुदत

गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांचा भाजप सरकारला इशारा : दामू नाईक यांच्या सांगण्यावरून कामे बंद पाडल्याचा आरोप

प्रतिनिधी /मडगाव

डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने दामू नाईक यांच्या सांगण्यावरून मुद्दाम बंद पाडलेली फातोर्डातील कामे 24 तासांत पुन्हा सुरू न केल्यास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राज्यात चालू असलेल्या कामांबाबत तक्रारी करण्याचा आणि निषेध करण्याचा इशारा फातोर्डाचे आमदार आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी दिला आहे. सरदेसाई यांनी बुधवारी फातोर्डा येथे नगरसेवकांसह पत्रकार परिषद घेऊन सुमारे 22 कोटींची कामे भाजपकडून रोखली जात असल्याचे सांगितले. यावेळी मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष लिंडन पेरेरा, नगरसेविका निमिषा फालेरो आदींची उपस्थिती होती.

सरदेसाई म्हणाले की, ही सर्व कामे फातोर्डातील लोकांनी ‘संडे डायलॉग’ कार्यक्रमातून सूचविलेली आहेत. रस्ता रुंदीकरण, रस्ता हॉटमिक्सिंग, गटार आणि इतर अनेक कामे त्यात आहेत. या कामांचा फायदा फातोर्डा येथील जनतेला होणार आहे. मात्र, दामू नाईक यांच्या सांगण्यावरून भाजप सरकारने ही कामे बंद पाडली आहेत, असा आरोप सरदेसाई यांनी केला. संपूर्ण दक्षिण गोव्यातील लोक एसजीडीपीए मार्केटमध्ये येतात. तिथे आम्ही रस्ता हॉटमिक्सिंगचे काम सुरू केले होते. पण हे काम सुद्धा बंद पाडले गेले आहे, असे सरदेसाई म्हणाले.

अचानक निर्देश का ?

यापूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही कामे थांबविण्याच्या सूचना पीसीईना दिल्या होत्या. मात्र त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर कामे सुरू झाली होती. आता पुन्हा ही कामे बंद केलेली आहेत आणि त्याचे असे कारण सांगितले जात आहे की, एक समिती येऊन या कामांची गरज आहे की नाही याची तपासणी करेल. या फायली मुख्यमंत्र्यांनी संमत केल्या होत्या. मग अचानक ही कामे बंद करण्याचे निर्देश का, असा सवाल सरदेसाई यांनी केला.

आम्ही तक्रारी केल्या, तर सरकार स्वीकारणार का ?

ही कामे थांबवून दामू नाईक जिंकणार नाहीत, असे सरदेसाई म्हणाले. दामू नाईक यांच्या एका व्यक्तीने कामांसंदर्भात तक्रार केली असून त्याची दखल घेऊन ही कामे थांबवली गेली आहेत. जर असे असेल, तर आमच्या कार्यकर्त्यांनी अशा तक्रारी केल्यास त्या सरकार स्वीकारेल का, असा सवाल सरदेसाई यांनी केला. कामे थांबवण्यासाठी अधिकाऱयांना दिलेले निर्देश मागे घेण्यासाठी मी भाजप सरकारला 24 तासांचा अवधी देतो. जर भाजपने कामे सुरू केली नाहीत, तर आम्ही त्यांना चांगला धडा शिकवू, असे ते म्हणाले.

फातोर्डा मॉडेलमध्ये भाजपकडून अडथळे

जनतेला चांगल्या सुविधा देण्यासाठी करदात्यांच्या पैशांचा वापर या कामांसाठी केला जात आहे. आम्ही फातोर्डा हा इतर मतदारसंघांसाठी मॉडेल बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण भाजप त्यात अडथळे निर्माण करत आहे, असे ते म्हणाले. दामू नाईक ज्या भागात घरोघरी जाऊन प्रचार करतील त्या त्या भागातील लोकांना त्यांनी फातोर्डाच्या विकासात निर्माण केलेल्या अडथळय़ांची माहिती आम्ही देऊ, असे सरदेसाई म्हणाले. यावेळी लिंडन पेरेरा यांनीही दामू नाईक यांच्यावर आरोप केले.

Related Stories

तृणमुलचा गोवा प्रवेश संशयास्पद : काँग्रेस

Amit Kulkarni

खोडये सत्तरी येथे हरणाला जीवदान

Omkar B

उसगांव अपघातात दोन, नावेलीत एक ठार

Omkar B

अकरावीच्या जागा 15 टक्के वाढवा

Amit Kulkarni

जनकल्याणासाठी कोणाचेही पाय पकडणार

Patil_p

मुरगाव पोलीस स्थानक भाजपाविरोधकांच्या तक्रारींची दखल घेत नाही, केवळ काँग्रेस कार्यकर्त्यावरच गुन्हे

Amit Kulkarni