आयपीएल पहिल्या क्वॉलिफायर लढतीत आज दोन्ही संघांमध्ये जोरदार जुगलबंदीची अपेक्षा,
दुबई / वृत्तसंस्था
बडय़ा सामन्यात कसा विजय खेचून आणायचा, याची कला अवगत असलेल्या चेन्नई सुपरकिंग्स आणि भल्याभल्यांना पराभवाचे धक्के देण्याची क्षमता असणाऱया दिल्ली कॅपिटल्सचे संघ आज (रविवार दि. 10) आयपीएलमधील पहिल्या क्वॉलिफायर लढतीत आमनेसामने भिडतील, त्यावेळी फायनलमध्ये धडक मारणारा पहिला संघ ठरणे, हीच त्यांची मुख्य महत्त्वाकांक्षा असणार आहे. दिग्गजांचा अनुभव आणि युवा खेळाडूंचा तडफदार बाणा, या दोन्हींचा यावेळी खऱया अर्थाने कस लागेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, ही लढत सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाणार आहे.
यापूर्वी साखळी फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा संघ 20 गुणांसह अव्वलस्थानी विराजमान राहिला. आता अंतिम फेरीतही सर्वप्रथम आपणच धडक मारण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा असेल. यंदाचा आयपीएल हंगाम दोन सत्रात विभागला गेला असला तरी या दोन्ही सत्रात वर्चस्व गाजवणारा संघ म्हणून दिल्लीने मोहोर उमटवली. दुसरीकडे, चेन्नई सुपरकिंग्सचा संघ पुन्हा एकदा प्ले-ऑफच्या सेट-अपमध्ये दाखल झाला आहे. आयपीएलमधील 12 पैकी 11 आवृत्तीत त्यांनी किमान प्ले-ऑफमध्ये धडक मारली आहे. यंदा प्ले-ऑफ स्थान निश्चितीनंतर सलग 3 सामने गमवावे लागले असले तरी पहिल्या क्वॉलिफायरमध्ये नेहमीचा सूर सापडेल, अशी त्यांची अपेक्षा असणार आहे.
यापूर्वी, शेवटच्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला आरसीबीने शेवटच्या चेंडूवर नमवण्याचा पराक्रम केला, त्यावेळी केएस भरतचा उत्तुंग षटकार निर्णायक ठरला होता. त्या पराभवाने दिल्लीच्या क्रमवारीत काहीही फरक पडला नाही. मात्र, तो पराभव त्यांच्या डोळय़ात अंजन घालणारा ठरला.
चेन्नई सुपरकिंग्सचा संघ आजवर 8 वेळा आयपीएल फायनलमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरला असून त्यात 3 वेळा त्यांनी विजेतेपद संपादन केले आहे. तोच धडाका यंदा कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. अर्थात, धोनीचे प्रस्थापित खेळाडूंना अधिक प्राधान्य राहिले असून तो नेहमी रविंद्र जडेजा, अम्बाती रायुडू, सुरेश रैना, डेव्हॉन ब्रेव्हो व फॅफ डय़ू प्लेसिस यांनाच पसंती देत आला आहे. या प्रतिकूल परिस्थितीत संधी मिळालेला ऋतुराज गायकवाड खऱया अर्थाने चेन्नई सुपरकिंग्सचे प्रोडक्ट ठरला आहे.
चेन्नई संघातील जोश हॅझलवूड, मोईन अली हे देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवी खेळाडू असून धोनीने त्यांना प्राधान्य देणे साहजिक आहे. अर्थात, स्वतः धोनीचा सध्याचा फॉर्म फारसा आश्वासक नाही, ही वस्तुस्थिती आहे. या हंगामात साखळी फेरीअखेर धोनीला 14 सामन्यात केवळ 96 धावा जमवता आल्या असून सुरेश रैना (12 सामन्यात 160) उतरतीकडे वळत असल्याचे चित्र आहे. ऋतुराज गायकवाड (533 धावा) व डय़ू प्लेसिस (546 धावा) यांनी मात्र सॉलिड स्टार्ट मिळवून दिले आहेत. या संघातर्फे जडेजाने देखील 227 धावांचे योगदान दिले आहे.
गोलंदाजीत शार्दुल ठाकुर 8.57 च्या इकॉनॉमी रेटमुळे महागडा ठरत आला असला तरी त्याने 14 सामन्यात 18 बळी घेतले आहेत. डेव्हॉन ब्रेव्होने वेगात बदल करत 12 बळी घेतले असून त्या तुलनेत हॅझलवूडला अपेक्षित यश मिळवता आलेले नाही.
संभाव्य संघ
चेन्नई सुपरकिंग्स ः महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अम्बाती रायुडू, केएम असिफ, दीपक चहर, डेव्हॉन ब्रेव्हो, फॅफ डय़ू प्लेसिस, इम्रान ताहीर, एन. जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सॅन्टनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, आर. साई किशोर, मोईन अली, के. गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, सी. हरी निशांत.
दिल्ली कॅपिटल्स ः रिषभ पंत (कर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, रिपल पटेल, शिखर धवन, शिमरॉन हेतमेयर, श्रेयस अय्यर, स्टीव्ह स्मिथ, अमित मिश्रा, ऍनरिच नोर्त्झे, अवेश खान, बेन डॉर्शुईस, इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, कुलवंत खेजरोलिया, लुकमन मेरिवाला, प्रवीण दुबे, टॉम करण, उमेश यादव, अक्षर पटेल, ललित यादव, मार्कस स्टोईनिस, रविचंद्रन अश्विन, सॅम बिलिंग्ज, विष्णू विनोद.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
10 विजय मिळवूनही दिल्लीला अद्याप फलंदाजीत चिंता!


दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात साखळी फेरीअखेर 10 विजय संपादन करत गुणतालिकेत अव्वलस्थान काबीज केले असले तरी अद्याप फलंदाजीत त्यांना बरीच चिंता कायम आहे. शिखर धवन (544), पृथ्वी शॉ (401), रिषभ पंत (362) यांनी आक्रमक प्रदर्शन साकारले असले तरी केवळ या तिघांवरच दिल्लीच्या फलंदाजीतील यश अवलंबून राहत आले आहे. शिमरॉन हेतमेयरचा अपवाद वगळला तर त्यांच्याकडे फारसे आश्वासक बिग हिटर्स नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
गोलंदाजी हे मात्र दिल्लीचे बलस्थान ठरत आले आहे. अवेश खान (22 बळी), अक्षर पटेल (15 बळी), कॅगिसो रबाडा (13 बळी), ऍनरिच नोर्त्झे (9 बळी) यांनी उत्तम मारा केला आहे. यात केवळ नोर्त्झेचा इकॉनॉमी रेट अधिक राहिला आहे. आजच्या लढतीत नोर्त्झे-रबाडा हे ऋतुराज गायकवाडला उसळत्या चेंडूंचा मारा करत जेरीस आणण्याचा प्रयत्न करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे असेल. रैना व रायुडू यांच्यासाठी चेन्नईतर्फे हा शेवटचा हंगाम ठरण्याची शक्यता चर्चेत असून या पार्श्वभूमीवर भरीव योगदान देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. अगदी धोनीला देखील अव्वल दर्जाच्या जलद गोलंदाजीला सामोरे जाताना झगडावे लागत आहे, ही वस्तुस्थिती लपून राहिलेली नाही.
साखळी फेरीअखेर कर्णधारांचे फलंदाजीतील योगदान
कर्णधार / संघ / सामने / धावा
केएल राहुल /पंजाब किंग्स/ 13 / 626
संजू सॅमसन / राजस्थान रॉयल्स / 14 / 484
रोहित शर्मा / मुंबई इंडियन्स / 13 / 381
विराट कोहली / आरसीबी / 14 / 366
रिषभ पंत / दिल्ली कॅपिटल्स / 14 / 362
केन विल्यम्सन / हैदराबाद / 10 / 266
इयॉन मॉर्गन / केकेआर / 14 / 124
महेंद्रसिंग धोनी / चेन्नई सुपरकिंग्स / 14 / 96