Tarun Bharat

फिशमार्केट गाळय़ांच्या लिलाव प्रक्रियेवेळी गोंधळ

प्रतिनिधी/ बेळगाव

महापालिकेच्या मालकीच्या फिशमार्केटमधील गाळे भाडेतत्वावर देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेवेळी 20 गाळय़ांसाठी 13 व्यावसायिकांना सहभाग घेतला होता. मात्र सध्या वापरत असलेला गाळा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. नियमानुसार तसे करता येत नसल्याचे अधिकाऱयांनी सांगितल्याने लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न व्यावसायिकांना केला. यामुळे लिलाव प्रक्रियेवेळी गोंधळ झाला.

कसाई गल्ली येथील महापालिकेच्या फिशमार्केटची इमारत नव्याने बांधण्यात आली आहे. पण भाडेतत्वावर देण्यात आली नसल्याने तीन वर्षांपासून महापालिकेला महसूल मिळाला नाही. परिणामी मनपाचा लाखो रुपये महसूल बुडाला आहे. त्यामुळे 20 गाळे भाडेतत्वावर देण्यासाठी शुक्रवारी लिलाव आयोजित करून बोली लावण्यात आली. पण गाळय़ाचे भाडे जास्त असल्याचा मुद्दा उपस्थित करून भाडे कमी करण्याची मागणी व्यावसायिकांनी केले. कोरोनामुळे व्यवसाय थंडावले असल्याने भाडे कमी आकारण्याची विनंती करण्यात आली. गाळय़ाचे भाडे महापालिकेत निश्चित करण्यात येत नसून शासनाच्या नियमानुसार प्रशासकाच्या आदेशानुसार निश्चित करण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त जगदीश के.एच. यांनी दिली. त्यानंतर लिलाव प्रक्रियेला प्रारंभ झाला.

लिलाव प्रक्रियेला 11 वाजता प्रारंभ झाला. दुपारी एक वाजेपर्यत अनामत रक्कम जमा करून घेण्यात आली. यावेळी 13 व्यावसायिकांनी प्रत्येकी पन्नास हजार रुपये अनामत रक्कम भरून लिलाव प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी नोंदणी केली. लिलाव प्रक्रियेला प्रारंभ होण्यापूर्वी महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर यांनी लिलाव प्रकियेत भाग घेण्याबाबतच्या नियमावलीची माहिती दिले. प्रत्येक गाळय़ाला महापालिकेने तीन हजार रुपये प्रतिमहिना भाडे निश्चित केले असून यापुढे प्रत्येकाने किमान शंभर रुपयाच्या पटीत वाढ करून बोली लावणे बंधनकारक असल्याचे सांगितले. तसेच एकाटय़ानेच बोली लावल्यास लिलाव रद्द होईल. त्यामुळे किमान तीन वेळा बोली लावणे आवश्यक असल्याचे सांगितले. 20 पैकी 4 गाळे मागासवर्गियांसाठी राखीव असल्याने मागासवर्गियांनी बोली लावावी, अशी सूचना केली. त्यानंतर लिलाव प्रक्रियेस प्रारंभ झाला.

फिश मार्केटची इमारत नव्याने बांधून सुविधा उपलब्ध केल्याबद्दल मनपा अधिकाऱयांचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच व्यावसायिक आणि महापालिकेच्या सहकार्यामुळे कामकाज चालले आहे. त्यामुळे यापुढेही महापालिकेच्या अधिकाऱयांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा माजी नगरसेवक बाबुलाल मुजावर यांनी व्यावसायिकांच्यावतीने व्यक्त केली.

यानंतर लिलाव प्रक्रियेला प्रारंभ झाल्यानंतर पाच व सहा क्रमांकाच्या गाळय़ांसाठी कोणी प्रतिसाद दिला नाही. सात क्रमांकाच्या गाळय़ासाठी बोली सुरू  झाल्यानंतर व्यावसायिकांनी बोली लावण्यास प्रारंभ झाला. यावेळी प्रत्येकाने शंभर रुपयाने वाढ करून बोली लावण्याची सूचना करण्यात आल्याने गोंधळ झाला. महापालिकेने निश्चित केलेले भाडे जास्त असून बोलीवेळी प्रत्येकवेळी शंभर रुपये वाढविणे व्यावसायिकांना परवणारे नसल्याचे सांगून लिलाव प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेवून ते उठून जावु लागले. संतापलेल्या व्यावसायिकांना शांत बसण्याची सूचना करून निश्चित केलेल्या रकमेवर प्रत्येकाने शंभर ऐवजी किमान पन्नास रुपये वाढ करण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे लिलाव प्रक्रियेला प्रारंभ झाला. पण यापूर्वी वापरत असलेले गाळे आपल्यालाच मिळावे असा अट्टाहास व्यापाऱयांनी धरला. मात्र वापरत असलेलेच गाळे देण्याची तरतूद कायद्यात नसल्याचे मनपा अधिकाऱयांनी सांगितल्यामुळे लिलावावेळी व्यावसायिकांमध्ये वादावादी झाल्याने गोंधळ निर्माण झाला. तसेच लिलावात भाग घेणार नसल्याचे सांगून ते पुन्हा बाहेर पडू लागले. पण यावेळी महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर व्यावसायिकावर भडकले. नियम काय असतात, याची माहिती घ्या सर्व प्रक्रिया पारदर्शी आणि नियमानुसार करावी लागते असे त्यांनी व्यावसायिकांना सांगितले. त्यानंतर लिलाव प्रक्रियेस प्रारंभ झाला. याप्रसंगी मागासवर्गियांसाठी राखीव असलेल्या चार आणि अन्य 9 गाळय़ांसाठी बोली लावण्यात आली. पण महापालिकेने  प्रत्येक गाळय़ासाठी तीन हजार रुपये निश्चित केले होते, त्यावर प्रत्येकी दीडशे रुपये वाढ करण्यात आल्याने गाळय़ाचे भाडे 3150 रुपये निश्चित झाले आहे. प्रत्येक महिन्याला 3150 रुपयेप्रमाणे महापालिकेला वर्षाकाठी साडेसात लाखाचा महसूल मिळणार आहे.

लिलाव प्रक्रियेवेळी महापालिका महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर, प्रभारी लेखाधिकारी आनंद होंगळ, मार्केट महसूल निरीक्षक नंदु बांदिवडेकर, शिवा जाधव, अशोक गुदली व अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

मजगावमधील सांडपाणी समस्येची आयुक्तांकडून पाहणी

Amit Kulkarni

सीआयडी प्रमुखांनी घेतली अधिकाऱयांची बैठक

Omkar B

शुभम लाड यांच्याकडून एक लाखाची मदत

Patil_p

आम्हाला नोकरीत कायमस्वरुपी सामावून घ्या

Amit Kulkarni

स्टेशनरोडच्या विकासाकडे रेल्वे खात्याचे दुर्लक्ष

Amit Kulkarni

यल्लम्मा डोंगराच्या विकासासाठी काम करा

Amit Kulkarni