फुटबॉल म्हणजेच ‘पेले’..हे समीकरण मागील कित्येक दशकांपासून बनून गेलेलं. या खेळावर त्यांच्याइतकी अविट छाप कुठल्याच खेळाडूला उमटविता आलेली नाहीये…आजही प्रत्येक संघातील सर्वांत महत्त्वाचा खेळाडू परिधान करणं पसंत करतो ती त्यांनीच प्रसिद्ध केलेली ‘10’ क्रमांकाची जर्सी अन् कुणीही ‘बायसिकल किक’ फटकावल्यानंतर आठवण येते ती त्यांचीच…पेलेंनी कतारमधील विश्वचषक स्पर्धेनंतर काही दिवसांनी 82 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेला असला, तरी या खेळातील त्या सर्वकालीन महान खेळाडूच्या स्मृती अजरामर राहतील…
एडसन अरांतेस दो नासिमेंतो…म्हणजेच ब्राझीलचे महान फुटबॉलपटू ‘पेले’…त्यांचा जन्म 23 ऑक्टोबर, 1940 रोजी दक्षिण-पूर्व ब्राझीलमधील ट्रेस कोराकोस शहरात झाला. विख्यात वैज्ञानिक थॉमस अल्वा एडिसन यांच्या नावावरून त्यांचं नाव ठेवण्यात आलं. कारण पेलेच्या म्हणण्यानुसार, त्यांचा जन्म होण्यापूर्वी त्यांच्या घरी वीज थडकली…बाउरू शहरात गरिबीत वाढलेले पेले स्थानिक कॅफेमध्ये अर्धवेळ नोकरी करून कुटुंबाच्या उत्पन्नाला हातभार लावायचे…त्यांना फुटबॉलचे प्राथमिक धडे दिले ते वडिलांनी. परंतु त्यावेळी कुटुंबाला चेंडू देखील परवडत नव्हता. म्हणून तरुण पेले अनेकदा रस्त्यावर गुंडाळलेले गोणपाट किंवा मोजे यांचाच चेंडू बनवून खेळाची हौस भागवायचे…त्यांना ‘पेले’ हे टोपण नाव देण्यात आलं ते शाळेत असताना त्यांच्या मित्रांनी, पण त्याचा अर्थ काय याची कुणालाच कल्पना नव्हती…


किशोरवयात तो अनेक स्थानिक हौशी संघांसाठी खेळू लागला. त्यानं बाउरू ऍथलेटिक क्लबच्या कनिष्ठ संघाचं तीन राज्यस्तरीय युवा स्पर्धांत नेतृत्व करताना स्वतःला एक उज्ज्वल भविष्य असलेला प्रतिभावान खेळाडू म्हणून स्थापित करण्यात यश मिळविलं. 1956 मध्ये त्याचे प्रशिक्षक वाल्देमार दी ब्रिटो यांनी ‘सांतोस एफसी’ या व्यावसायिक संघात त्याला प्रवेश मिळावा याकरिता केलेले प्रयत्न फळाला येऊन एका वर्षानं त्यांची त्या क्लबच्या वरिष्ठ संघात निवड झाली. त्यांनी लगेच संघातील स्थान भक्कम केलं व पहिल्याच वर्षी ते लीगचे सर्वोच्च ‘स्कोअरर’ बनले…व्यावसायिक म्हणून करारबद्ध केल्यानंतर केवळ 10 महिन्यांनी पेलेंना ब्राझीलच्या राष्ट्रीय संघातून बोलावणं आलं…
गुडघ्याच्या दुखापतीमुळं 1958 च्या विश्वचषकात ब्राझीलकडून खेळण्याच्या पेलेंच्या आशा सुरुवातीला धुळीस मिळाल्या होत्या. पण संघ सहकाऱयांनी त्यांना निवडण्यासाठी व्यवस्थापनावर दबाव आणला आणि 17 व्या वर्षी त्यांनी विश्वचषकात पदार्पण केलं ते तत्कालीन सोविएत युनियन संघाविरुद्ध…मग जगाला प्रथमच त्यांच्या जबरदस्त क्षमतेची झलक पाहायला मिळाली. ब्राझीलच्या वेल्सविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील विजयातील एकमेव गोल केला तो पेलेंनीच. त्यानंतर फ्रान्सविरुद्ध उपांत्य फेरीत हॅट्ट्रिक आणि यजमान स्वीडनविरुद्धच्या अंतिम लढतीत विलक्षण कौशल्यानं केलेले दोन गोल….पेलेंच्या जयजयकाराला सुरुवात होण्यास एवढं पुरेसं होतं…


ब्राझीलमध्ये परतल्यावर पेलेंनी 1958 साली ‘सांतोस’ला साओ पावलोची सर्वोच्च लीग स्पर्धा जिंकण्यास मदत केली. त्या हंगामात ते ‘सर्वोच्च स्कोअरर’ ठरले, तर 1962 मध्ये युरोपियन चॅम्पियन ‘बेनफिका’विरुद्ध प्रसिद्ध विजयाची नोंद केली…पेलेंची मोहिनी जगभरात पडायला लागून ‘मँचेस्टर युनायटेड’ आणि ‘रिअल माद्रिद’सह अनेक श्रीमंत क्लबांनी त्यांना खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु आपला स्टार खेळाडू परदेशात जाण्याच्या विचारानं घाबरलेल्या ब्राझील सरकारनं त्यांना ‘राष्ट्रीय संपत्ती’ घोषित केलं…
ब्राझीलनं 1962 साली चिलीमध्ये पुन्हा विश्वचषक जिंकला खरा, परंतु मोहिमेच्या सुरुवातीलाच झालेल्या दुखापतीमुळे त्या स्पर्धेतील पेलेंचा प्रभाव मर्यादित राहिला. तर 1966 च्या विश्वचषकात ते त्यांच्या विजेतेपदाचं रक्षण करू शकले नाहीत. कारण यजमान इंग्लंडनं त्यावर्षी बाजी मारली…परंतु 1970 मध्ये वयाच्या तिशीत पोहोचलेल्या पेलेंनी ही कसर भरून काढताना ‘गोल्डन बॉल’सह चषकही खेचून आणला. ती त्यांची शेवटची विश्वचषक स्पर्धा. इतिहासातील सर्वांत महान मानल्या गेलेल्या त्या ब्राझिलियन संघातून त्यांनी चार गोल केले….ब्राझीलसाठी पेलेंचा शेवटचा सामना 18 जुलै, 1971 रोजी रिओ येथे युगोस्लाव्हियाविरुद्ध झाला आणि 1974 मध्ये त्याने ब्राझीलच्या क्लब फुटबॉलमधून निवृत्ती घेतली…त्यानंतर दोन वर्षांनी ‘न्यूयॉर्क कॉसमॉस’नं त्यांना खेचलं. त्यांच्या नुसत्या हजेरीनंच अमेरिकेतील फुटबॉलचं चित्र बदलण्यास मोलाचा हातभार लावला !
– राजू प्रभू
विक्रमांचा सम्राट…
n तीन वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकणाऱया संघाचा भाग राहण्याचं भाग्य लाभलेले पेले हे पहिले आणि एकमेव फुटबॉलपटू…त्यांचा समावेश असलेल्या ब्राझीलच्या चमूनं 1958, 1962 आणि 1970 मध्ये विश्वचषक उचलला…1958 मध्ये जेव्हा ब्राझीलनं विश्वचषक जिंकला तेव्हा पेले फक्त 17 वर्षे आणि 249 दिवस वयाचे. अशी कामगिरी करणारे ते सर्वांत तरुण खेळाडू…
n 1958 च्या विश्वचषक स्पर्धेत पेलेंनी उपांत्य फेरीत फ्रान्सविरुद्ध 23 मिनिटांत हॅट्ट्रिक केली. त्या तीन गोलांमुळं विश्वचषकाच्या इतिहासात हॅट्ट्रिक करणारे ते सर्वांत तरुण खेळाडू ठरले…
n 18 वर्षं पूर्ण होण्यापूर्वी फिफा विश्वचषकात गोल करणारे पेले हे एकमेव खेळाडू…शिवाय किशोरवयात 25 आंतरराष्ट्रीय गोल करणारे ते पहिलेवहिले फुटबॉलपटू…
n दक्षिण अमेरिकेतील कट्टर प्रतिस्पर्धी ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यातील 1957 च्या सामन्यात पेलेंनी गोल केला तेव्हा ते ब्राझीलच्या राष्ट्रीय फुटबॉल संघातर्फे गोल करणारे सर्वांत तरुण खेळाडू बनले. अवघ्या 16 वर्षे 9 महिने वयाचे असताना त्यांनी हे लक्ष्य गाठलं…
n विश्वचषकाच्या इतिहासात गोलांसाठी सर्वाधिक साहाय्य करण्याचा विक्रमही पेलेंच्या नावावर विसावलाय. ‘दि किंग’ म्हणून देखील ओळखल्या जाणाऱया या खेळाडूनं तीन विश्वचषक स्पर्धांत 10 गोलांसाठी साहाय्य केलं…
n पेले हे ब्राझिलियन क्लब ‘सांतोस’साठी सर्वाधिक गोल करणारे खेळाडू. त्यांनी 659 सामन्यांमध्ये नोंदविले ते 643 गोल…
n पेलेंच्या खात्यात आहे तो ब्राझीलचे सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरण्याचा मान. त्यांनी देशातर्फे खेळताना 92 सामन्यांतून 77 गोल केले. या विक्रमाशी नुकत्याच कतारमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत बरोबरी केलीय ती नेमारनं…
n पेले हे सर्वाधिक हॅट्ट्रिक नोंदविणारे खेळाडू…ब्राझीलच्या या महान खेळाडूनं त्यांच्या संपूर्ण व्यावसायिक कारकिर्दीत तब्बल 92 वेळा ‘हॅट्ट्रिक’ केल्या…
n ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ आणि ‘फिफा’ यांच्यानुसार पेले हे खेळाच्या इतिहासातील सर्वाधिक गोल करणारे खेळाडू…
n पेलेंनी दोन कॅलेंडर वर्षांत नोंदविले प्रत्येकी 100 हून अधिक गोल. ‘फिफा’च्या मते, त्यांनी 1959 मध्ये 127, तर 1961 साली 110 गोल केले. कोणताही खेळाडू या विक्रमाच्या अगदी जवळ देखील पोहोचू शकलेला नाही…
कारकिर्दीत हजारहून अधिक गोल…
विश्लेषकांच्या मते, पेलेंनी त्यांच्या कारकिर्दीत नेमके किती गोल केले हा वादाचा मुद्दा. याबाबतीत वेगवेगळे आकडे देण्यात येत असले, तरी त्यात 1 हजारपेक्षा जास्त गोलांची नोंद आढळते…‘फिफा’नुसार, त्यांनी 1363 लढतींत 1281 गोल नेंदविले. परंतु यात क्लबांच्या अनौपचारिक सामन्यांचाही समावेश होतो. तर ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’नुसार ही आकडेवारी 1363 सामन्यांमध्ये 1289 अशी…या महान ब्राझिलियननं बहुतेक गोल ‘सांतोस’तर्फे नोंदविले, जिथं त्यांनी त्यांच्या कारकिर्दीचा बहुतांश काळ घालवला, तर ‘न्यूयॉर्क कॉसमॉस’च्या वतीनं मैदान उतरताना त्यांनी 107 सामन्यांत केले 64 गोल…
ब्राझीलसाठी मोलाचं योगदान…
पेलेंना ब्राझीलतर्फे खेळताना 1957 मध्ये रिओ डी जानरो इथं अर्जेंटिनाविरुद्ध 2-1 असा पराभवाचा सामना करावा लागलेला असला, तरी ती लढत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण राहिली. कारण त्यांनी देशातर्फे पहिला गोल तो त्याच सामन्यांत आणि त्यानंतर 1950 च्या अखेरीस अन् 60 तसंच 70 च्या दशकांत त्यांचे फटके गोलरक्षकांना सतत भेदत राहिले…पेलेंचे 12 गोल विश्वचषकांत नोंदवले गेले. 1958 च्या विश्वचषक स्पर्धेतील यशस्वी मोहिमेच्या अंतर्गत केलेले सहा गोल ही एका विश्वचषक स्पर्धेतील त्यांची सर्वांत चांगली कामगिरी…ब्राझीलसाठी त्यांनी शेवटचा गोल केला तो 1971 मध्ये ऑस्ट्रियाविरुद्ध. साओ पावलो इथं झालेला हा मैत्रीपूर्ण सामना 1-1 असा बरोबरीत राहिला…
मिळालेले सन्मान…
1992 ः पर्यावरणासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे राजदूत म्हणून नियुक्ती…नंतर त्यांना ‘युनेस्को’चे सदिच्छा दूतही बनविण्यात आलं…
1995 ः ब्राझीलचे क्रीडामंत्री म्हणून नियुक्त…1998 पर्यंत ते या पदावर राहिले…
1997 ः ब्रिटिश नाईटहूड पुरस्कार…
1999 ः आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून ‘शतकातील सर्वोत्तम खेळाडू’ हा मान…