Tarun Bharat

फुटबॉलपटू विजयनची ‘पद्मश्री’साठी शिफारस

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने माजी कर्णधार आयएम विजयनची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. पद्मश्री हा देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

51 वर्षीय माजी भारतीय स्ट्रायकर विजयनने 49 सामन्यात 40 गोल केले. 1990 च्या दशकातील प्रारंभी त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याला 2003 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले गेले. 1993, 1997 व 1999 या तीन वर्षात तो भारताचा सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरला. अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे महासचिव कुशल दास यांनी विजयनची शिफारस केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

6 भारतीय फुटबॉलपटू सेलन मन्ना (1971), चुनी गोस्वामी (1983), पी. के. बॅनर्जी (1990), बायचंग भुतिया (2008), सुनील छेत्री (2019) व बेमबेम देवी (2020) यांना यापूर्वी पद्मश्री पुरस्कार लाभला आहे.

‘पद्मश्री पुरस्कारासाठी संघटनेने शिफारस केली, याचा मला आनंद आहे. भारतीय फुटबॉल संघटनेचा मी याबद्दल आभारी आहे. पुरस्कार लाभला तर मी यापेक्षा अधिक आनंदी असेन’, असे विजयनने केरळमधील आपल्या निवासस्थानावरुन वृत्तसंस्थेशी बोलताना नमूद केले.

विजयनने 2000 ते 2003 या कालावधीत भारतीय संघाचे नेतृत्व केले. सहकारी स्ट्रायकर बायचंग भुतियाशी त्याची चांगलीच जोडी जमली. क्लब स्तरावर त्याने मोहन बगान, केरळ पोलीस व सध्या बरखास्त असलेल्या एफसी कोचिन व जेसीटी मिल्स फगवारा या संघांचे प्रतिनिधीत्व केले आहे.

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वात जलद गोल करण्याचा मान विजयनकडे आहे. 1999 सॅफ स्पर्धेतील भुतानविरुद्ध लढतीत त्याने अवघ्या 12 व्या सेकंदालाच गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला होता. 2003 मध्ये भारतात संपन्न झालेल्या आफ्रो-आशियाई गेम्समध्ये त्याने सर्वाधिक 4 गोल नोंदवण्याचा पराक्रमही गाजवला होता. याच स्पर्धेनंतर निवृत्ती जाहीर केल्याने हे त्याचे शेवटचे प्रतिनिधीत्वही ठरले.

1991 मधील नेहरु चषक स्पर्धेत त्याने वरिष्ठ स्तरावरील पहिला सामना खेळला. ही स्पर्धा त्रिवेंद्रम येथे संपन्न झाली होती. त्या स्पर्धेसाठी बहुतांशी संघांनी आपले दुय्यम दर्जाचे खेळाडू उतरवले. त्यामुळे, सामन्यांना पूर्ण आंतरराष्ट्रीय असा दर्जा होता का, याबद्दल अनिश्चितता आहे. रोमानिया ब संघाने ती स्पर्धा जिंकली होती.

जेव्हा विजयन फुटबॉल सामन्यांवेळी सोडा विकायचा!

विजयन हा मूळचा केरळमधील थ्रिसूरचा रहिवासी. थ्रिसूर महापालिका स्टेडियमवर त्या काळी फुटबॉलचे सामने व्हायचे आणि त्या सामन्यांवेळीच विजयन प्रेक्षकांना सोडा विकायचा. नंतर प्रत्यक्ष फुटबॉलकडे त्याचा ओढा वाढत गेला आणि मजल-दरमजल प्रवास करत त्याने थेट राष्ट्रीय संघापर्यंत झेप घेतली व आपली गुणवत्ताही अधोरेखित केली. वयाच्या 17 व्या वर्षी केरळ पोलीस फुटबॉल क्लबतर्फे त्याने आपल्या कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. विजयनने निवृत्ती स्वीकारल्यानंतर मायभूमीतील युवा खेळाडूंना फुटबॉलचे धडे देण्यासाठी स्वतःची अकादमी सुरु केली आहे.

Related Stories

हार्दिक पंडय़ाचा अर्धशतकी झंझावात

Amit Kulkarni

मनिका बात्राला कांस्यपदक

Patil_p

कसोटी मालिकेतून नॉर्त्जे बाहेर

Patil_p

रहाणेचे शतक म्हणजे भारत अपराजित!

Patil_p

भारत-जर्मनी हॉकी उपांत्य लढत आज

Amit Kulkarni

india-vs-australia : ‘गाबा’वर भारतीय संघाची ऐतिहासिक विजयी नोंद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!