Tarun Bharat

फुटीर आमदारांची आज सभापतींसमोर सुनावणी

काँगेसच्या दहाही आमदारांचा डाव यशस्वी होण्याची शक्यता : बाबू आजगांवकर, दीपक पाऊसकर यांच्यावर टांगती तलवार

प्रतिनिधी / पणजी

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून विभक्त होऊन भारतीय जनता पक्षात विलीन झालेले दोन आमदार मनोहर आजगांवकर आणि दीपक पाऊसकर तसेच काँग्रेस पक्षातून भाजपात सामील झालेले 10 आमदार चंद्रकांत कवळेकर, आंतानासियो मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, फिलीप नेरी रॉड्रिग्स, नीळकंठ हळर्णकर, फ्रान्सिस सिल्वेरा, क्लाफासिओ डायस, इजिदोर फर्नांडिस, विल्प्रेड डिसा व टोनी फर्नांडिस यांच्या अपात्रतेच्या प्रश्नावर सभापती राजेश पाटणेकर यांच्यासमोर आज मंगळवारी दुपारी सुनावणी होणार आहे.

दि. 10 जुलै 2019 रोजी 10 काँगेस आमदार भाजपमध्ये सामील झाले होते. काँग्रेस पक्षात उभी फूट पडली असून 15 पैकी 10 आमदार तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी आणि बूथ पातळीवरील, गट पातळीवरील कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये रितसर प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचे नेते यात विरोधी पक्ष नेता, विधीमंडळ नेता, व्हीप सर्वजण आधी काँग्रेस पक्षातून विभक्त झाले. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी आपल्यापदाचा राजीनामा दिला होता. त्यांना भाजपात घेण्यात आले नाही म्हणून ते तक्रारदार बनले, असा युक्तिवाद सभापतींसमोर मांडण्यात आला होता.

काँग्रेसचे फुटीर 10 आमदार वाचणार

पक्षांतर बंदी कायद्यात जानेवारी 2004 मध्ये दुरुस्ती करण्यात आली त्यात एक तृतियांश फूट सिद्ध झाल्यास व त्यात पक्षाच्या पदाधिकाऱयांचाही समावेश असल्यास ती उभी फूट मानली जाऊ शकते व तसे झाल्यास पक्षांतर केलेले आमदार अपात्र होऊ शकत नाहीत. काँग्रेसमधून पदाधिकारी, पक्षनेते व विरोधी पक्षनेत्यासह 10 आमदार वेगळे झाले. त्यासाठी त्यांनी सभापतींची मान्यता घेतली व नंतर भाजपमध्ये प्रवेश केला.

सभापती व राज्यपालांना कोणतीच कल्पना न देता परस्पर पक्षांतर केले असते तर ते अपात्र होऊ शकले असते पण पक्षांतर बंदी कायद्याच्या 10 व्या परिशिष्टात ज्याप्रमाणे पात्रतेचे नियम सांगितले आहेत त्याचे पूर्ण पालन करण्यात आल्याचा युक्तिवाद सभापतींसमोर सादर करण्यात आला होता. त्यामुळे पक्षांतर केलेल्या 10 आमदारांना जीवदान मिळण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे.

मगोतील फूट संशयास्पद?

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून दोन आमदार मनोहर उर्फ बाबू आजगांवकर आणि दीपक पाऊसकर यांनी दि. 27 मार्च 2019 रोजी पावणेदोन वाजता भाजपमध्ये प्रवेश केला. सभापतींनी रात्री 1.45 वा. मान्यता दिली. सभापतींनी लिहिलेल्या पत्रात त्यांनी आम्ही दोघे भाजपमध्ये विलीन व्हायला तयार आहोत असे म्हटले होते. पण सभापतींसमोर युक्तिवाद सादर करताना या दोघा आमदारांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष पूर्णपणे भाजपमध्ये विलीन केल्याचा दावा केला आहे. पक्षात उभी फूट पडल्याचा त्यांचा दावा नाही मात्र 2/3 सदस्य मगोतून वेगळे झाले आहेत असे म्हटले आहे. पूर्ण मगो पक्ष भाजपमध्ये विलीन केला असला तरी आमदार सुदिन ढवळीकर यांना अपक्ष आमदार म्हणून जाहीर न करता सभापतींनी त्यांची गणती मगोचे आमदार अशीच गृहीत धरली आहे.

त्यामुळे मगो पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्याचा दावा सिद्ध होऊ शकत नाही व त्यासाठी बाबू आजगांवकर आणि दीपक पाऊसकर यांच्यावर अपात्रतेची टांकती तलवार राहू शकते, असे तज्ञाचे म्हणणे आहे. हे दोन आमदार सहा वर्षांसाठी अपात्र होण्याची दाट शक्यता आहे मात्र काँग्रेसमधील 10 फुटीर आमदार पात्र ठरण्याची शक्यता असून त्यांचे कायदेशीर डावपेच योग्य पडल्याचे तज्ञाचे म्हणणे आहे.

काँग्रेस पक्षातील उभी फूट सिद्ध होऊ शकते मात्र मगो पक्षातील उभी फूट सिद्ध होऊ शकत नाही. पक्षांतर्गत कुठलाही कलह न होता मध्यरात्री पक्ष सोडून त्याच रात्री दुसऱया पक्षात विलीन होऊन मंत्रीपदाची शपथही घेणे हा घाईगडबडीचा निर्णय ठरु शकतो. त्यातून पक्षातील उभी फूट किंवा पूर्ण मगो पक्ष विलीन केल्याचे  सिद्ध होऊ शकत नाही. सभापतींनी त्याची गंभीर दखल घेतल्यास हे दोघे अपात्र ठरु शकतात मात्र काँग्रेस पक्षातील 10 फुटीर पात्र ठरण्याची शक्यता अधिक गणली जाते.

Related Stories

फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळ आजपासून सर्व रूग्णांसाठी खुले

Patil_p

सांकवाळच्या पडिक शेतजमिनीत मगरीचा वावर

Amit Kulkarni

वेळेत कामे होत नसल्यास बांधकाम खाते सोडायला तयार !

Amit Kulkarni

शाळा विलिनीकरणचा प्रस्ताव तूर्त बारगळला

Amit Kulkarni

चित्रपट निर्मितीसाठी गोवा सर्वाधिक पसंतीचे स्थळ बनविणार

tarunbharat

डिचोलीतील दिनदयाळ नागरी सहकारी पतसंस्थेत चोरी

Omkar B