Tarun Bharat

फेडरर, मेदवेदेव्ह, केर्बर, कॉर्नेट दुसऱया फेरीत

Advertisements

विम्बल्डन टेनिस – व्हेरेव्ह, गॉफ यांचीही आगेकूच, झिझेन, अँड्रेस्क्यू यांचे आव्हान समाप्त

वृत्तसंस्था/ विम्बल्डन

स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर, रशियाचा डॅनील मेदवेदेव्ह, जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह, जर्मनीचीच अँजेलिक केर्बर यांनी विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची दुसरी फेरी गाठली तर अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला दुखापतीमुळे पहिल्या फेरीतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे आलियाक्सांड्रा सॅस्नोविचला पुढे चाल मिळाली. विम्बल्डनसाठी पात्र ठरलेला चीनचा पहिला खेळाडू झँग झिझेनला मात्र झुंजार लढत दिल्यानंतरही पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. महिलांमध्ये ऍलिझ कॉर्नेटने पाचव्या मानांकित अँड्रेस्क्यूचे आव्हान संपुष्टात आणले.

रॉजर फेडररला दुसरी फेरी गाठण्यासाठी संघर्ष करावा लागला. पण सुदैवाने त्याचा प्रतिस्पर्धी फ्रान्सच्या ऍड्रियन मॅनारिनाने पाचव्या सेटच्या सुरुवातीस दुखापतीमुळे माघार घेतल्याने फेडररला दुसरी फेरी गाठता आली. फेडररने 6-4, 6-7 (3-7), 3-6, 6-2 अशी बरोबरी साधली होती. निर्णायक सेटमधील फक्त एक गुण झाल्यानंतर मॅनारिनोने माघारीचा निर्णय घेतला. चौथ्या सेटच्या सातव्या गेमवेळी सेंटर कोर्ट ग्रासवर तो घसरून पडला. त्यावर ट्रेनरकडून त्याने उपचारही करून घेतले. पण त्याला हालचाल करणे कठीण जात होते आणि वेदनाही होऊ लागल्याने त्याने सामना सोडण्याचा निर्णय घेतला. फेडररने या सामन्यात 16 बिनतोड सर्व्हिस केल्या. फेडररची पुढील लढत फ्रान्सच्याच रिचर्ड गॅस्केटशी होणार आहे. गॅस्केटने जपानच्या युइची सुगिताचा 7-6 (7-4), 4-6, 6-2, 6-1 असा पराभव केला.

मागील आठवडय़ात मॅलोर्कामधील स्पर्धेचे जेतेपद मिळविलेल्या द्वितीय मानांकित मेदवेदेव्हने जर्मनीच्या जॅन लेनार्ड स्ट्रफचा 6-4, 6-1, 4-6, 7-6 (7-3) असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली. जर्मनीच्या चौथ्या मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हने पात्रता फेरीतून आलेल्या हॉलंडच्या टॅलन ग्रीकस्पूरचा 6-3, 6-4, 6-1 असा पराभव केला. ग्रीसस्पूरने पहिल्यांदाच प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविले होते. व्हेरेव्हने या सामन्यात 20 बिनतोड सर्व्हिस केल्या. त्याची पुढील लढत अमेरिकेच्या टेनीस सँडग्रेनशी होईल. सँडग्रेनने स्लोव्हाकियाच्या नॉर्बर्ट गोम्बोसचा पराभव केला.

चीनच्या झँगची झुंजार लढत

विम्बल्डनसाठी पात्रता मिळवित नवा इतिहास निर्माण करणारा चीनच्Rा झँग झिझेनने सर्वांच; लक्ष वेधून घेतले होते. त्याने फ्रान्सच्या अँटोइन होआंगविरुद्ध जोरदार संघर्ष केला. पण पाच सेट्सच्या रोमांचक लढतीत त्याला 4-6, 7-6 (7-5), 6-7 (5-7), 6-3, 6-2 असा पराभव स्वीकारावा लागला. 24 वर्षीय झँगने दोनदा आघाडी घेतली होती. पण दोन्ही वेळेस त्याला ती टिकविता आली नाही.

जर्मनीच्या केर्बरची आगेकूच, अँड्रेस्क्यूला धक्का

महिलांमध्ये माजी अग्रमानांकित जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने दुसरी फेरी गाठताना विम्बल्डनमध्ये पदार्पण करणाऱया सर्बियाच्या निना स्टोजानोविचवर 6-4, 6-3 अशी मात केली. चौथ्या मॅचपॉईंटवर तिने हा सामना संपवला. केर्बरने गेल्या आठवडय़ात पहिल्या बॅड हॅम्बुर्ग ग्रास कोर्ट टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळविले असल्याने ती या स्पर्धेत आत्मविश्वासाने उतरली आहे. गेल्या तीन वर्षात तिने मिळवलेले हे पहिलेच अजिंक्यपद आहे. तिची पुढील लढत स्पेनची सारा टोर्मा किंवा क्रोएशियाची ऍना कोन्जुह यापैकी एकीशी होईल. पहिल्या फेरीत विजयी ठरलेल्या अन्य खेळाडूंत ऍनास्तेशिया पावल्युचेन्कोव्हा, मॅग्डा लिनेट, कॅमिला जॉर्जी,  मुचोव्हा, एलेना व्हेस्निना, कोको गॉफ, एलिस मर्टेस, पेटकोव्हिक, शेल्बी रॉजर्स यांचा समावेश आहे. पाचव्या मानांकित बियान्का अँडेस्क्यूला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला असून तिला ऍलिझ कॉर्नेटने 6-2, 6-1 असे नमवित स्पर्धेबाहेर घालविले. 2019 मध्ये यूएस ओपन स्पर्धा अँड्रस्क्यूने जिंकली होती. तिला विम्बल्डनच्या प्रमुख फेरीत अजून एकही सामना जिंकता आलेला नाही. 2017 मध्येही ती पहिल्या फेरीत पराभूत झाली होती.

दुखापतीमुळे माघार घेतल्याने सेरेनाचा पुन्हा एकदा स्वप्नभंग

सात वेळा विम्बल्डन स्पर्धेचे जेतेपद मिळविणारी अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीत कारकिर्दीतील 24 वे ग्रँडस्लॅम जिंकून विक्रमाशी बरोबरी साधण्याची नामी संधी मिळाली होती. पण दुखापतीमुळे तिला माघार घ्यावी लागल्याने तिचा पुन्हा एकदा स्वप्नभंग झाला. पहिल्या फेरीत सॅस्नोविचविरुद्ध खेळताना पाचव्या गेममध्ये ती सर्व्हिस करीत होती. पण बेसलाईनजवळ तिचा पायाला दुखापत झाली. त्यानंतरही तिने खेळ चालू ठेवला होता. हा गेम गमवल्यानंतर तिने मेडिकल टाईमआऊट घेतले आणि खेळ पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांनीही तिला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. पण वेदना असहय़ झाल्याने तिने माघारीचा निर्णय घेतला. त्यावेळी मैदानाबाहेर जाताना प्रेक्षकांनी तिला उभे राहून मानवंदना दिली. सेरेना आजवर केवळ दुसऱयांदा या स्पर्धेच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडली आहे.

Related Stories

मा लाँगने जिंकले दुसरे ऑलिम्पिक सुवर्ण

Patil_p

रणजी सामन्यात बंगालची स्थिती मजबूत

Patil_p

ऑक्टोबरमध्ये टी-20 विश्वचषक भरवणे अव्यवहार्य

Patil_p

माजी ऑलिंपिक धावपटू बॉबी मॉरो कालवश

Patil_p

गुणवान खेळाडूंचा शोध घेण्यावर निवड समितीचे लक्ष : नीतू डेव्हिड

Patil_p

भारतीय क्रिकेट संघाच्या सरावाला प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!