शहरातील प्रत्येक रस्त्यावर ठाण मांडल्याने संपूर्ण बाजारपेठ फेरीवाल्यांच्या विळख्यात : रस्ते, फुटपाथ, सायकल ट्रकवरील अतिक्रमणे हटविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष




प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील प्रत्येक रस्त्यावर फेरीवाल्यांनी ठाण मांडल्याने संपूर्ण बाजारपेठ फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडली आहे. वाहनधारक व फेरीवाल्यांना शिस्त लावण्याची मोहीम वाहतूक रहदारी खाते आणि महापालिकेने राबविली होती. यामुळे बाजारपेठेतील रस्त्यांवरून ये-जा करणे सोयीस्कर झाले होते. मात्र याकडे रहदारी पोलिसांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे रस्ते, फुटपाथ आणि सायकल ट्रकवरही अतिक्रमण झाल्याने पादचाऱयांना ये-जा करणे मुश्कील बनले आहे.
बाजारपेठेतील प्रत्येक रस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे. काही व्यावसायिकांची दुकाने असूनही रस्त्यावर दुकाने थाटून अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे. बाजारपेठेच्या अंतर्गत भागात असलेल्या भातकांडे गल्ली ते चावी मार्केटला जोडणाऱया संपर्क रस्त्यावर गणपत गल्ली, मारुती गल्ली, कडोलकर गल्ली, समादेवी गल्ली, रामदेव गल्ली, हुतात्मा चौक आदी ठिकाणी अतिक्रमण करण्यात आल्याने पादचाऱयांना ये-जा करणे मुश्कील बनले आहे. भातकांडे गल्ली ते चावी मार्केटला जोडणाऱया संपर्क रस्त्यावर भाजी विक्रेत्यांसह किराणा मालाची दुकाने आहेत. याठिकाणी बहुतांश व्यावसायिकांची दुकाने असूनही सर्वच व्यावसायिकांनी दोन्ही बाजूंनी तीन ते चार फूट अतिक्रमण केले आहे. यामुळे संपूर्ण रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रार करूनही महापालिका प्रशासन व वाहतूक रहदारी नियंत्रण खात्याने साफ दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
महापालिकेच्यावतीने बाजारपेठेतील भाजीविक्रेते, फळविक्रेते आणि फेरीवाल्यांकडून भूभाडे वसुलीचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र काही ठिकाणी बसण्यास परवानगी नसतानादेखील भाजी विक्रेत्यांना व फेरीवाल्यांना बसण्यास सांगून भूभाडे वसुली कंत्राटदाराने भूभाडे वसुलीचा प्रकार चालविला आहे. यामध्ये महापालिकेच्या काही अधिकाऱयांचा आणि शिपायांचा हात असल्याचा आरोप होत आहे. मारुती गल्ली परिसरात फेरीवाले फिरकत नव्हते. मात्र संपूर्ण गल्लीमध्ये अतिक्रमण करून फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. परिणामी वाहतूक कोंडी होत आहे. तसेच पादचाऱयांना चालत जाणेही मुश्कील बनल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मारुती गल्लीमध्ये फेरीवाल्यांना हातगाडय़ा लावण्यास महापालिकेने परवानगी दिली नाही. मात्र याकडे दुर्लक्ष करून फळविक्रेते, उसाचा रस आणि ज्यूस विक्रेत्यांच्या गाडय़ा लावण्यात येत आहेत. याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केल्याने याचा फटका नागरिकांना सोसावा लागत आहे.
फुटपाथवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक उभारण्याबरोबर फुटपाथ निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. तसेच काही रस्त्यांशेजारी सायकल ट्रकदेखील निर्माण करण्यात आले आहेत. मात्र सायकल ट्रकचा वापर दुचाकी वाहने पार्क करण्यासाठी होत असून फुटपाथवर फेरीवाल्यांनी व्यवसाय थाटून अतिक्रमण केले आहे. सध्या विविध रस्त्यांचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. काही रस्त्यांचे काम अर्धवट स्थितीत आहे. रस्त्यांचे काम पूर्ण करून पादचाऱयांसाठी फुटपाथ बांधण्यात आले आहेत. पण फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे फुटपाथचा दुरुपयोग होत आहे. सदर फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने यावरून पादचाऱयांनी ये-जा कशी करायची, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
महापालिका आयुक्त दखल घेणार का?
पादचाऱयांसाठी फुटपाथ निर्माण करण्यात आले आहेत. मात्र सदर फुटपाथवर फळविपेते, भाजी विपेत्यांनी तसेच विविध व्यावसायिकांनी ठाण मांडले आहे. तसेच रस्त्यांशेजारी वाहन पार्किंगची सुविधा करण्यात आली नसल्याने वाहनधारक सायकल ट्रकवर वाहने पार्क करीत आहेत. त्यामुळे निर्माण करण्यात आलेली फुटपाथ आणि सायकल ट्रकची सुविधा कोणासाठी? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. बाजारपेठ आणि उपनगरांतील रस्त्यांवर करण्यात आलेल्या अतिक्रमणांकडे महापालिकेच्या अधिकाऱयांसह वाहतूक रहदारी नियंत्रण खात्याच्या अधिकाऱयांनी साफ दुर्लक्ष केले आहे. याकडे दुर्लक्ष करण्यामागचे गौडबंगाल काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. याची दखल महापालिका आयुक्त घेणार का? अशी विचारणाही होत आहे.
हॉकर्स झोन निर्माण करून व्यवसायासाठी जागा उपलब्ध करा


फुटपाथवर अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी होत असतात. पण गेल्या वीस वर्षांपासून याठिकाणी रस्त्यावर बसून व्यवसाय करतो. आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालतो. फुटपाथवरून हटविण्यात आल्यास उदरनिर्वाह चालणे कठीण आहे. जर महानगरपालिकेने हॉकर्स झोन निर्माण करून व्यवसाय करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यास त्याठिकाणी व्यवसाय करण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया रफीक अत्तार यांनी दिली.
फक्त फेरीवाल्यांवरच कारवाई करणे चुकीचे


रस्त्यांवर अडचणी होत असल्याने फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते. केवळ फेरीवाल्यांमुळे रस्त्यांवर अडचण निर्माण होत नाही तर वाहने लावण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. फक्त फेरीवाल्यांवर कारवाई करणे चुकीचे आहे. वाहनधारकांसह फेरीवाल्यांनाही रस्ता सोडून वाहने व हातगाडय़ा लावण्याची सूचना करण्यात आल्यास अडचण निर्माण होणार नाही. तसेच फेरीवाल्यांसाठी पर्यायी व्यवस्था करून दिल्यास त्याठिकाणी व्यवसाय करू, अशी भूमिका संतोष पाटील यांनी व्यक्त केली.