Tarun Bharat

फोंडा नगराध्यक्षपदावरुन भाजपामध्ये बंडाचे संकेत

Advertisements

प्रतिनिधी / फोंडा

फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी यांनी पदाचा राजीनामा दिल्याने पुढील नगराध्यक्ष म्हणून फोंडय़ाचे आमदार रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांचे नाव चर्चेत आहे. भाजपाच्या वरिष्ठांकडून रितेश यांचा नगराध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला असला, तरी त्यांच्याच पक्षातील एक दोन नगरसेवक त्यांच्या विरोधात जाण्याची भाषा बोलू लागले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक झाल्यास त्यांना मोठा धोका पत्करावा लागणार आहे.

फोंडा पालिका मंडळ 15 सदस्यांचे असून सध्या सत्ताधारी भाजपाकडे 8 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. मगो पक्षाकडे 5 तर गोवा फॉरवर्डचे 2 नगरसेवक आहेत. नगराध्यक्षपदासाठी निवडणूक झाल्यास भाजपातील सर्व आठही नगरसेवकांची मते निर्णायक ठरणार आहेत. भाजपाच्या वरिष्ठांकडून रितेश नाईक यांचे नाव निश्चित करण्यात आले, असले तरी त्याच पक्षातील एक ज्येष्ठ नगरसेवक आपल्याला हे पद मिळावे यासाठी हट्ट धरुन बसलेला आहे. वेळप्रसंगी तो विरोधात जाण्याची शक्यता असून रितेश नाईक यांचे मनसुबे उधळण्यासाठी विरोधी पक्षातील नगरसेवक त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रितेश नाईक यांनी ज्या अटींवर आठ महिन्यांपूर्वी आपल्या दोन सहकारी नगरसेवकांसह काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला होता, त्यामध्ये नगराध्यक्षपदाची अट होती. भाजपा प्रवेशानंतर लगेच त्यांच्या गळय़ात नगराध्यक्षपदाची माळ पडणार होती. मात्र त्यावेळी काही राजकीय समझौते होऊन सर्वांत तरुण नगरसेवक व भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते असलेल्या विश्वनाथ दळवी यांची वर्णी लागली. अवघ्या आठच महिन्यात भाजपाच्या वरिष्ठांकडून दळवी यांना राजीनामा द्यायला सांगण्यात आल्याने, पुन्हा एकदा फोंडा पालिकेवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

दळवी यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे मगो पक्षाचे फोंडय़ातील नेते डॉ. केतन भाटीकर यांनी ही घटना अत्यंत दुर्देवी असल्याची जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे सध्याच्या आणीबाणीच्या काळात परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपालीका स्थीर हवी. पालिकेवर खुर्चीचे राजकारण खेळण्याची व सत्ता बदलाची ही वेळ नव्हे, असे त्यांनी सांगितले. भाजपामधील काही स्थानिक नेत्यांनाही वरिष्ठांनी घेतलेला सत्ताबदलाचा हा निर्णय रुचलेला नाही. हल्लीच भाजपामध्ये प्रवेश केलेले एक दोन नगरसेवकही सध्या या सत्ताबदलास राजी दिसत नाहीत.

Related Stories

कोरोनाचे 3 बळी, 117 नवे रुग्ण

Omkar B

त्रैवार्षिक ठाणे घोडेमोडणी सोहळा सात गावांसाठी भूषणावह

Amit Kulkarni

अतुलनीय कारागिरीच्या ज्वेलरीचे पणजीत प्रदर्शन

Amit Kulkarni

पाणी दरवाढीला अखेर मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती

Omkar B

उदय मडकईकर यांचा 4 रोजी काँग्रेस प्रवेश

Amit Kulkarni

’अर्ध्या राज्याचे मुख्यमंत्री’ तरीही केजरीवाल श्रेष्ठच

Amit Kulkarni
error: Content is protected !!