Tarun Bharat

फोंडा नगराध्यक्षपदी मगोच्या गीताली तळावलीकर

भाजपचा पराभव, भाटीकरांचे वजन वाढले

प्रतिनिधी /फोंडा

फोंडा पालिकेच्या नगराध्यक्षपदी गीताली तळावलीकर यांची निवड झाली आहे. त्या मगो पक्षाच्या समर्थक असून भाजपाचा पाठिंबा लाभलेले नगरसेवक प्रदीप उर्फ झालू नाईक यांचा त्यांनी 8 विरुद्ध 7 मतांनी पराभव केला. गीताली यांच्या विजयामुळे फोंडा पालिकेवर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ही दोन्ही पदे मगो पक्षाकडे गेली आहेत.

 काल मंगळवारी सकाळी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. गीताली तळावलीकर व प्रदीप नाईक या दोघाच उमेदवारांनी त्यासाठी अर्ज भरले होते. गुप्त मतदान होऊन गीताली यांना 8 तर प्रदीप यांना 7 मते मिळाली. यावेळी सर्व पंधराही नगरसेवक उपस्थित होते. गेल्या पावणेचार वर्षांच्या कार्यकाळात फोंडा पालिकेवर निवडून आलेल्या गीताली या पाचव्या नगराध्यक्ष आहेत. त्यांना मगोच्या 5, गोवा फॉरवॉर्डचे 2 व एका भाजप समर्थक नगरसेवकाचा पाठिंबा लाभल्याचे उघड झाले आहे.

 निर्वाचन अधिकारी म्हणून धारबांदोडा तालुक्याचे उपजिल्हाधिकारी रमेश नाईक यांनी काम पाहिले तर फोंडय़ाचे उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक यांनी त्यांना साहाय्य केले.

 डॉ. भाटीकर भाजपावर भारी

गीताली तळावलीकर या फोंडय़ातील मगो नेते डॉ. केतन भाटीकर यांच्या खंद्या समर्थक आहेत. दीड महिन्यापूर्वी मगोच्याच जया सावंत यांना उपनगराध्यक्ष बनवून डॉ. भाटीकर यांनी भाजपाला धक्का दिला होता. आता गीताली यांच्या विजयामुळे भाटीकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला आणखी एक जबर धक्का देत, फोंडा पालिकेवर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

पावणेचार वर्षांत पाच नगराध्यक्ष

फोंडा पालिकेची निवडणूक एप्रिल 2018 मध्ये झाली होती. या पावणेचार वर्षांत फोंडा पालिकेला पाच नगराध्यक्ष लाभले. सुरुवातीला एक वर्ष तीन महिने प्रदीप नाईक यांनी हे पद भूषविले. त्यानंतर व्यंकटेश उर्फ दादा नाईक हे एक वर्ष होते. पुढील नगराध्यक्ष म्हणून विश्वनाथ दळवी यांनी आठ महिने व शांताराम कोलवेकर यांनी सात महिने हे पद भूषविले. आता गीताली या पाचव्या नगराध्यक्ष बनल्या आहेत.

Related Stories

आमदार विजय सरदेसाई विरुद्ध गुन्हा नोंद

Amit Kulkarni

सगलानी गटासमोर भाजपचे नमते

Amit Kulkarni

कपिलेश्वरी जन्क्शनजवळील खडपाबांध जोडरस्ता ओलंडताना अपघाताचे सत्र

Amit Kulkarni

समाज राजकारण्याच्या दावणीला बांधू नका

Amit Kulkarni

महाराष्ट्र सरकारला आम्ही प्रत्युत्तर देणार नाही

Omkar B

निरंकाल बेतोडय़ातील बागायतदारांची मोठी हानी

Amit Kulkarni