Tarun Bharat

फोंडा शहरातील सार्वजनिक गणपतींचे दीड दिवसांत विसर्जन

Advertisements

प्रतिनिधी/ फोंडा

कोरोना महामारीच्या संक्रमाणामुळे सलग दुसऱया वर्षीही सार्वजनिक गणेशोत्सवांचा उत्साह भक्तगणांना आवरता घ्यावा लागला आहे. सात, नऊ किंवा अकरा दिवस मोठय़ा धुमधडाक्यात चालणाऱया या उत्सवावर मर्यादा आल्याने फोंडा शहरातील सर्व प्रमुख गणपतींनी दीड दिवसांतच निरोप घेतला आहे. तालुक्यातील अन्य काही सार्वजनिक गणपती पाच, सात व अकरा दिवस मुक्काम करतील. मात्र केवळ धार्मिक विधी सोडल्यास इतर सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. भक्तांचे नवस फेडायचे असल्याने काही मंडळानी पाच व सात दिवस गणपती ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

 सार्वजनिक गणपतींचा विसर्जन सोहळा म्हणजे मोठा थाटमाट असतो. फुलांनी सजवलेल्या वाहनांत विराजमान गणराय आणि सोबत भक्तगणांची भव्य दिंडी मिरवणूक. बाप्पाला निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची प्रचंड गर्दी. ध्वनिपेक्षकावर ‘बाप्पा मोरयाचा’ आसमंतात घुमणार अखंड गजर आणि दारुकामाची नेत्रदीपक आतषबाजी. तब्बल चार पाच तास चालणारा हा जल्लोष या वर्षीही दिसला नाही. फोंडा शहरातील क्रांती मैदानावरील सदर सार्वजनिक गणपती, जुन्या बसस्थानकावरील झरेश्वर गणपती व वरजा बाजार येथील बुधवारपेठ या तिनही प्रमुख गणपतींनी दीड दिवसांतच निरोप घेतला. सदर व झरेश्वर गणपतींचे शनिवारी सायंकाळी कपिलेश्वरी तलावात तर बुधवारपेठ गणपतीचे कुर्टी येथे विसर्जन करण्यात आले.

 कुठलाच जल्लोष नाही की, गर्दी नाही. अगदी शांत वातावरणात मंडळातील अवघ्याच सदस्यांच्या उपस्थितीत श्री गणरायाला निरोप देण्यात आला. कोरोना महामारीचे संक्रमण कायम असल्याने फोंडय़ातील बहुतेक मंडळांनी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मर्यादित स्वरुपात उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. क्रांती मैदानावरील सदर हा सर्वांत जुना सार्वजनिक गणपती. यंदा त्याला पन्नास वर्षे होत असल्याने मोठय़ा धुमधडाक्यात सुवर्ण महोत्सव वर्ष साजरे करण्याचा मंडळाचा विचार होता. त्यासाठी मार्च महिन्यापासूनच त्यांनी तयारीही सुरु केली होती. मात्र कोरोनाच्या दुसऱया लाटेने कहर केल्याने त्यांना सुवर्ण महोत्सवी वर्षांचे सर्व नियोजन रद्द करावे लागले. गेल्या वर्षीप्रमाणे क्रांती मैदानऐवजी तिस्क फोंडा येथील मंडळाच्या सभागृहात गणपतीचे पुजन करावे लागले. जुन्या बसस्थानकावरील श्री झरेश्वर आणि वरजा बाजार येथील बुधवारपेठ मंडळानेही भाविकांची गर्दी टाळण्यासाठी दीड दिवसांतच उत्सव आटोपता घेतला.

 फोंडा तालुक्यात छोटी मोठी मिळून साधारण 15 ते 20 गणेशोत्सव मंडळे आहेत. बाजार शिरोडा येथील सार्वजनिक गणपती सात दिवस, भाटी शिरोडा येथील ओंकार गणपती पाच दिवस, बोरी येथील साखळय़ो सार्वजनिक गणपती व ढवळी येथील सार्वजनिक गणपती सात दिवस आहेत. तिस्क उसगाव येथील सार्वजनिक मंडळाचा गणपती पाच दिवस पूजला जाणार आहे. कुंडई येथील सार्वजनिक गणपती अनंत चतुर्दशीपर्यंत मुक्काम करणार आहे. केरी येथील गणपती अकरा तर प्रियोळ सार्वजनिक गणपती चौदा दिवस राहणार आहे. मात्र या सर्व गणेशोत्सव मंडळांनी उत्सवाचे स्वरुप नित्यपूजा व धार्मिक कार्यक्रमांपुरते मर्यादित ठेवले आहे. एकदोन मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. म्हार्दोळ व रथामळ कपिलेश्वरी येथील गणपतींचे दीड दिवसांच्या सेवेनंतर विसर्जन करण्यात आले.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती एरवी आकाराने भव्य म्हणजे किमान 9 ते 10 फुट उंचीच्या असतात. यंदा हे सर्व गणपती 3 ते 4 फुट उंचीचे होते. मंडपाचा आकार छोटा, मोजकीच सजावट व कुठलाच जल्लोष किंवा गाजावाजा न करता बहुतेक मंडळांनी गणरायाला पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी निरोप दिला.

Related Stories

रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण राज्यासाठी गरजेचे

Omkar B

मंत्री मायकल लोबो यांना काँग्रेसची तिकीट दिल्यास आम्ही त्यांच्याबरोबर राहणार नाही

Amit Kulkarni

मनपाच्या 75 स्वीपर्सना कायमस्वरुपी सेवेत रुजू करून घेणार

Amit Kulkarni

अर्थसंकल्पाचा गोव्याला मोठा लाभ

Amit Kulkarni

सहकार क्षेत्रात कौशल्य विकसित मनुष्यबळाची आवश्यकता

Amit Kulkarni

सांखळी इस्पितळातील 9 जण क्वारंटाईनमध्ये

Patil_p
error: Content is protected !!