Tarun Bharat

फोंडय़ातील कचरा व्यवस्थापनासाठी ‘हिलदारी इनिशिएटीव्ह’

प्रकल्पाच्या कामाला सुरुवात : फोंडा हे राज्यातील पहिले शहर

प्रतिनिधी / फोंडा

 नेस्ले इंडिया कंपनीच्या सहकार्याने फोंडा शहरात राबविण्यात येणाऱया हिलदारी इनिशिएटीव्ह प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली असून लोकजागृतीचा भाग म्हणून फोंडा पालिकेची कचरा वाहने व सार्वजनिक ठिकाणी भव्य पेंटिंग्स रेखाटण्यात आली आहेत. फोंडा शहर घन कचरा व्यवस्थापनात उत्कृष्ट मॉडल बनावे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रकल्पाचे समन्वयक तुषार टोणगावकर यांनी सांगितले. स्त्रीमुक्ती संघटना मुंबई ही संस्था या प्रकल्पावर काम करीत असून रिसिटी नेटवर्क प्रा. लिमिटेड यांचे त्याला तांत्रिक साहाय्य लाभत आहे.

 शहरातून गोळा होणाऱया कचऱयाचे चार विभागात वर्गिकरण करुन त्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया केली जाणार आहे. कचरा व्यवस्थापनाविषयी लोकजागृतीचा भाग म्हणून खडपाबांध फोंडा येथे व मार्केट प्रकल्पाच्या इमारतीवर भव्य पेंटिंग्स साकारण्यात आली आहेत. शिवाय स्वच्छतेचा संदेश देणारी पेंटिंग्सही फोंडा पालिकेच्या कचरावाहू वाहनांवर झळकत आहेत. फोंडा तालुक्यातील काही स्वयंसेवकांच्या मदतीने ही पेंटिंग्स रेखाटण्यात आली आहेत.

 विविध टप्प्यात या प्रकल्पाचे काम चालणार आहे. घरातील घनकचऱयाचे योग्य पद्धतीने वर्गीकरण कसे करावे, यासंबंधी घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये जागृती केली जाणार आहे. त्यासाठी स्थानिक स्वयंसाहाय्य गट, महिला मंडळे यांच्या मदतीने रहिवासी कॉलनीमधील नागरिकांच्या बैठका घेऊन ही जागृती मोहीम राबविली जाणार आहे.

क्युआर कोडचा वापर होणार

 या प्रकल्पाचा तांत्रिक भाग म्हणजे, शहरातील कचरा गोळा करण्याच्या प्रक्रियेत  मोबाईल ऍपच्या माध्यमातून क्युआर कोडचा वापर होणार आहे. या क्युआर कोडच्या माध्यमातून फोंडा शहरात दर दिवशी गोळा होणाऱया कचऱयाची माहिती मिळेल, शिवाय त्याचा पाठपुरावा करणे सोपे होणार आहे. शहरातील प्रत्येक फ्लॅट, दुकाने, हॉटेल्स यासह इतर आस्थापनांना या क्युआर कोडने जोडले जाणार आहे. ज्याचे मॉनिटरिंग पालिकेच्या कचरा व्यवस्थापन कक्षातून होणार आहे.

या प्रकल्पातंर्गत शहरातील कचरा गोळा करणाऱया सर्व कामगारांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना आवश्यक सुरक्षा उपकरणेही पुरविण्यात आली आहेत. सर्व कामगारांच्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी करतानाच, या स्वच्छता दुतांना समाजात स्वतंत्र ओळख देण्याचा प्रयत्न आहे.

ओल्या व सुक्या कचऱयाची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट

 घनकचरा व्यवस्थापनाबरोबरच ओल्या कचऱयाची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावून त्यापासून खत निर्मितीचा प्रयोगही सध्या पालिका क्षेत्रात सुरु आहे. प्रभाग क्र. 5 मध्ये यासाठी कंपोस्टींग युनिट कार्यान्वित केलेले आहे. सुक्या कचऱयाच्या विल्हेवाटीसाठी शहरा लगतच्या विविध भंगार व्यावसायिकांकडे संपर्क साधून विघटीत केलेल्या विविध प्रकारच्या कचऱयावर पुर्नप्रक्रिया करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले जाणार आहे. फेंडा पालिकेच्या सहकार्याने पुढील तीन वर्षे प्रायोगिक तत्त्वावर घनकचरा व्यवस्थापन केले जाणार असल्याची माहिती तुषार टोणगावकर यांनी दिली. गोवा राज्यात हिलदारी प्रकल्प पहिल्यांदाच फोंडा शहरात राबविण्यात येत असून मसुरी, नैनिताल, दलहौसी, महाबळेश्वर या प्रसिद्ध पर्यटन स्थळांबरोबरच कोणार्क, पोंडीचेरी सारख्या अकरा शहरांमध्ये या प्रकल्पाचे काम यशस्वीरित्या काम सुरु आहे.

जास्तीत जास्त कचऱयाचे विघटन करून त्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करणे, त्यासाठी कामगारांमध्ये कौशल्य विकसित करणे कचरा व्यवस्थापनातून महसुल निर्मिती ही या प्रकल्पाची मुख्य उद्दिष्टय़े आहेत. शहरातील कचऱयाचे नियोजन, कचरा पुरवठा, साखळी व्यवस्थापन, तंत्रज्ञानाची अंमलबजावणी आणि भागधारकांची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने धोरण राबविल्यामुळे या प्रकल्पांतून गोलाकार अर्थव्यवस्था सक्षम होण्यास मदत होईल व कचरा हे एक संसाधन म्हणून वापर होतानाच, हवेतील कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल, असे टोणगावकर सांगतात.

प्रकल्पाला सहकार्य करा – नगराध्यक्ष

नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी यांनी फोंडा शहरातील कचऱयाचे योग्यप्रकारे व्यवस्थापन होण्यासाठी नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. फोंडा शहर स्वच्छ व कचरामुक्त राहिल्यास प्रत्येक नागरिकाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. या प्रकल्पासाठी कार्य करणारे स्वयंसेवक तसेच फोंडा पालिकेसाठी काम करणाऱया कचरादुतांना प्रोत्साहन मिळावे यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

सौ.विजयाताईवर आज अंत्यसंस्कार

Patil_p

गो रक्षणार्थ समाजात सर्वतोपरी प्रयत्न व्हावेत : सद्गुरु ब्रह्मशानंदाचार्य

Amit Kulkarni

मडगावातील घाऊक मासळी बाजार बंद

Omkar B

गोमेकॉत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राखीव जागा ठरल्याप्रमाणे भराव्यात

Amit Kulkarni

शेतकऱयांनी जमिनी पडिक सोडू नये

Amit Kulkarni

कोकण रेल्वेच्या प्रवासी गाडय़ा 20 पासून विजेवर चालणार

Amit Kulkarni