कला व संस्कृती ,आदिवासी मंत्रालयातर्फे आयोजन : राज्यातील लोककलाकारांच्या मानधनात दुपट्टीने वाढ – मंत्री गोविंद गावडे


प्रतिनिधी /फोंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या यांच्या स्वप्नातील एक भारत श्रेष्ठ भारत साकार करण्याचे ध्येय सर्वानी बाळगावे. डिजीटल महोत्सवाच्या माध्यमातून इतर राज्यातील कला व संस्कृतीची देवाणघेवाण करण्याची सुवर्णसंधी गोव्यातील लोककलाकारांना लाभणार आहे. राज्य सरकाराकडून लोककलाकारांना मिळणाऱया मानधनात दुपट्टीने वाढ करण्यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केले.
राजीव कला मंदिर येथे काल शुक्रवारी झालेल्या ‘ डीजीटल राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव’ उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारत स्वतंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप, उपसंचालक व कला मंदिरच्या सदस्य सचिव स्वाती दळवी तसेच पाच राज्यातील आदिवासी बांधवाचे प्रतिनिधी उपस्थित होते. दोन दिवशीय या महोत्सवात ओरीसा, झारखंड, छत्तीसगड येथील कष्टकरी समाजाने आजही शाबूत ठेवलेल्या लोककलेचे महत्व लोकनृत्य लोकगीतांच्या सादरीकरणातून करण्यात आले.
पाच राज्यातील लोककलाकारांचे नृत्य सादरीकरण
सांस्कृतिक राजधानी असलेल्या अंत्रुज महालातील राजीव कला मंदिरात ‘राष्ट्रीय डीजीटल आदिवासी नृत्य महोत्सव’ थाटात सुरवात झाली. करमळी गोवा येथील आदिवासी बांधवातर्फे मुसळ नृत्य व घोडेमोडणी नृत्य, केपे येथील कुणबी नृत्य, छत्तीसगडतर्फे कससार नृत्य, ओरीसा येथील दलकई नृत्य, झारखंडातील पैका नृत्य, ओरीसा येथील चुटक चुटक न्त्य, झारखंड येथील स्वर्ग चाव, छत्तीसगड येथील आदिवासी बांधवांतर्फे हुल्की नृत्य प्रकाराचे सादरीकरण केले. दोन राज्यातील संस्कृतीचे आदान प्रदान व्हावे या एकमेव उद्देशाने गोव्यातील महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सव कला व संस्कृती खाते गोवा राज्य व आदिवासी मंत्रालय दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. आज सायंकाळी नृत्य महोत्सवाची सांगता होणार आहे.