Tarun Bharat

फोंडय़ात शांताराम कोलवेकरांचा भाजपला दे धक्का..!

Advertisements

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रितेश नाईकांचा पराभव : नेतृत्त्वबदल भाजपाच्या अंगलट

प्रतिनिधी / फोंडा

फोंडा पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे अधिकृत उमेदवार तथा फोंडय़ाचे आमदार रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांचा शांताराम कोलवेकर या भाजपाच्याच नगसेवकाने 8 विरुद्ध 7 मतानी पराभव केला. मगो व गोवा फोरवर्डच्या   पाठिंब्याने कोलवेकर यांनी हा विजय संपादन करीत स्वपक्षालाच जोरदार धक्का दिलेला आहे. कोलवेकर हे फोंडा भाजपा मंडळाचे अध्यक्ष असून त्यांच्या विजयामुळे आमदार रवी नाईक यांच्यासह भाजपाची नाचक्की झाली आहे.

मगो व गोवा फॉरवर्डचा पाठिंबा

मंगळवारी सकाळी झालेल्या या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. भाजपातर्फे रितेश नाईक यांनी तर त्यांच्या विरोधात शांताराम कोलवेकर यांनी अर्ज भरला होता. बॅलट पत्रिकेद्वारे गुप्त मतदान होऊन त्यात रितेश यांना 7 तर कोलवेकर यांना 8 मते मिळाली. यावेळी सर्व पंधराही नगरसेवक उपस्थित होते. कोलवेकर यांना मगोच्या 5 तर गोवा फोरवर्डच्या दोघा नगरसेवकांचा पाठिंबा लाभला. रितेश नाईक यांना नगराध्यक्षपदासाठी भाजपाने अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केल्यानंतर शांताराम कोलवेकर यांनी पक्षाच्या या निर्णयाविरोधात जाऊन  अर्ज भरला होता. मगो व गोवा फोरवर्डने भाजपाला शह देण्यासाठी आपला उमेदवार निवडणुकीत उभा न करता कोलवेकर यांना पाठिंबा दिला. परिणामी भाजपाला फोंडा पालिकेवरील आपली सत्ता गमवावी लागली आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी निलेश धायगोडकर यांनी काम पाहिले. त्यांना मुख्याधिकारी प्रदीप नाईक यांनी साहाय्य केले.

पक्षाने आपली इच्छा डावलली – कोलवेकर

गेली वीस वर्षे आपण भाजपासाठी एकनिष्ठेने कार्य करीत आहे. मागील कार्यकाळात आपण उपनगराध्यक्ष होतो. यावेळी आपल्याला नगराध्यक्षपद मिळावे अशी इच्छा आपण पक्षाच्या वरिष्ठांकडे व्यक्त केली होती. पण आपल्याला डावलण्यात आले. त्यामुळे पक्षाला पूर्वकल्पना देऊनच नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला. समविचारी नगरसेवकांनी दाखविलेला विश्वास व सर्व पक्षीय पाठिंब्यामुळे त्यात यशस्वी झालो, अशी प्रतिक्रिया आपल्या विजयानंतर शांताराम कोलवेकर यांनी व्यक्त केली. नगरपालिकांवर पक्षीय राजकारण असू नये. कारण विकासकामे करताना सर्व प्रभागांना समान न्याय देणे आवश्यक आहे. भाजपाकडून आपल्यावर अन्याय झाला तरी अजूनही आपण भाजपामध्येच आहे. भाजपाचे पदाधिकारी सुनील देसाई यांचा आपल्याला नैतिक पाठिंबा लाभला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सत्तेचा दुरुपयोग करणाऱयांना चपराक – भाटीकर

 फोंडय़ातील मगो नेते डॉ. केतन भाटीकर यांनी शांताराम कोलवेकर यांचे अभिनंदन करताना नगरसेवकांनी एकसंघ राहून हा बदल घडवून आणल्याचे सांगितले. आमचा हेतु शुद्ध होता, त्यामुळेच सत्तेचा दुरुपयोग करणाऱयांना चपराक बसली आहे. फोंडय़ात कोरोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत असताना, पालिकेवर नेतृत्त्व बदल करण्याची गरज नव्हती, असेही भाटीकर म्हणाले.

Related Stories

मडगावच्या श्री हरिमंदिर देवस्थानचा दिंडी महोत्सव 6 नोव्हेंबर रोजी

Amit Kulkarni

चॅम्पियन्स चेस अकादमीतर्फे विविध ऑनलाईन स्पर्धा

Amit Kulkarni

शिरोडा भाजपातर्फे योगदिन साजरा

Amit Kulkarni

कोरोनाचा उद्रेक, आठ जणांचा मृत्यू

Patil_p

कोरोना रुग्णांमध्ये बालक, सैनिकांचाही समावेश

Omkar B

’नॅशनल’च्या प्रश्नावर सामंजस्याने तोडगा

Amit Kulkarni
error: Content is protected !!