Tarun Bharat

फोंडय़ात 14 पासून सुरश्री केसरबाई केरकर संगीत समारोह

प्रतिनिधी /पणजी

देशातील नामांकित अशा संगीत समारोहामध्ये गणना होणारा व मागच्या 40 वर्षांपासून आयोजित होत असलेला कला अकादमीचा प्रतिष्ठेचा 41 वा सुरश्री केसरबाई केरकर संगीत समारोह यंदा 14, 15, व 16 जानेवारी 2022 या कालावधीत राजीव गांधी कला मंदिर, फोंडा येथे संपन्न होणार आहे. सदर महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार 14 जानेवारी रोजी सायं. 5 वा. गोवा राज्याचे कला व संस्कृती मंत्री तसेच कला अकादमीचे मान. अध्यक्ष गोविंद गावडे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

शुक्रवार 14 जानेवारी रोजी उद्घाटन समारंभानंतर साय. 5.15 वा. स्थानिक युवा कलाकार रितिष्का वेर्णेकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. त्यानंतर सायं. 6.15 वा. बरोडा स्थित पं. दीपक क्षीरसागर यांच्या शास्त्रीय स्लाइड गिटाराची मैफल होणार आहे. सायं. 7.45 वा. पहिल्या दिवशीच्या सत्राची सांगता पुणे येथील प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफलीने होणार आहे.

शनिवार 15 जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात 10.30 वा. मुंबई येथील युवा गायक कलाकार धनंजय हेगडे यांचे शास्त्रीय गायन होईल व तद्नंतर कोलकाता येथेली प्रसिद्ध शास्त्रीय गायक अर्षद अली खान व पुणे येथील युवा प्रतिभावंत सितारवादक शाकिर खान यांच्या शास्त्रीय गायन-सितार जुगलबंदिची मैफल होणार आहे.

शनिवार 15 जानेवारी रोजी सायंकाळच्या सत्रात 4 वा. प्रारंभ होईल. यात गोमंतकीय युवा कलाकार सोनिक वेलिंगकर यांचे सोलो बासरी वादन होईल व त्यानंतर नवी दिल्ली स्थित प्रशांत मल्लीक व निशांत मल्लीक यांची धृपद गायनाची मैफल संपन्न होणार आहे. धृपद गायनाला जोडून बंगळूर येथील संगीता कट्टी कुलकर्णी यांचे शास्त्रीय गायन होईल. सायंकाळच्या सत्राची सांगता मुंबई येथील ख्यातनाम तबलावादक विद्वान योगेश साम्सी व त्यांचे प्रज्ञावंत शिष्य स्वप्नील भिसे व चंद्रशेखर गांधी यांच्या तबला त्रिकुटीजुगलबंदी (तबला ट्रीवो) मैफलीने होणार आहे.

रविवार 16 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वा. गोमंतकीय युवा प्रतिभेचे गायक  कलाकार नितेश सावंत यांच्या शास्त्रीय गायनाने सत्रास प्रारंभ होईल. त्यानंतर सकाळच्या सत्राची सांगता कोलकाता येथील प्रख्यात सरोदवादक पं. देबासिश भट्टाचार्या यांच्या सरोदवादनाच्या मैफलीने होणार आहे.

संगीत महोत्सवाच्या समारोप सत्रात सायंकाळी 4 वा. पुणे येथील प्रसिद्ध गायिका श्रीमती मंजिरी असानारे केळकर यांचे शास्त्रीय गायन होईल. त्यानंतर सायंकाळी 5.15 वा. नाशिक येथील प्रसिद्ध गायक प्रसाद खापर्डे यांची शास्त्रीय गायनाची मैफल संपन्न होणार आहे. या मैफलीला जोडूनच धारवाड येथील ज्योती हेगडे यांची रूद्रवीणा वादनाची मैफल होणार आहे. केसरबाई केरकर संगीत समारोहाची सांगता कोलकाता येथील अंतरराष्ट्रीय ख्यातीचे ख्यातनाम शास्त्रीय गायक पं. अजोय चक्रवर्ती यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफलीने होणार आहे.

या संगीत महोत्सवात पं. योगेश साम्सी, ओजस अधिया, दयानिधेश कोसंबे, उदय कुलकर्णी, मयांक बेडेकर, अमर मोपकर, स्वप्निल मांद्रेकर, ऋषिकेश फडके, महेश वजे हे कलाकार तबल्यावर साथसंगीत करतील तर पं. अजय जोगळेकर, राया कोरगांवकर, सुभाष फातर्फेकर, गुरूप्रसाद गांधी, दत्तराज सुर्लकर, प्रसाद गावस, दत्तराज म्हाळशी यांची संवादिनी साथसंगत लाभणार आहे. तसेच मृणाल मोहन उपाध्याय, पं. ज्ञानेश्वर देशमुख हे कलाकार पखवाजावर साथसंगत करणार आहेत. यंदाच्या या महोत्सवासाठी राजीव गांधी कला मंदिर, फोंडा यांचे आयोजनासाठी सहकार्य लाभले आहे.

महोत्सवातील कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुले असून काही आसन व्यवस्था निमंत्रितासाठी राखून ठेवण्यात आली आहे. याची सर्व रसिकांनी नोंद घ्यावी व यंदाचा हा संगीत समारोह सर्वांर्थाने यशस्वी करावा असे आवाहन कला अकादमीने केले आहे. कोविड -19 ची सर्व मार्गदर्शक तत्त्वे पाळून या समारोहास प्रवेश दिला जाणार आहे.

Related Stories

सुदिन ढवळीकर पुन्हा इस्पितळात

Omkar B

मांद्रे मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी तत्पर

Omkar B

सरकारचे संवेदनशील विषयांकडे दुर्लक्ष

Patil_p

गोवा डेअरी निवडणूक निवाडा आज होणार

Amit Kulkarni

आगीशिवाय धूर येत नाही

Amit Kulkarni

पटवर्धन यांचा बळी घेतलेला झारखंडचा आरोपी जामीनमुक्त

Omkar B
error: Content is protected !!