Tarun Bharat

फ्रान्समध्ये कोरोना संसर्ग पुन्हा तीव्र

Advertisements

एप्रिलनंतरचे सर्वाधिक रुग्ण : ब्राझीलमध्ये बळींचा आकडा लाखासमीप : जगभरात 1.95 कोटी कोरोनाबाधित

जगात कोरोना विषाणूची बाधा आतापर्यंत 1 कोटी 95 लाख 69 हजार 801 वर पोहोचली आहे. यातील 1 कोटी 25 लाख 64 हजार 696 बाधितांना महामारीपासून मुक्ती मिळाली आहे. तर 7 लाख 24 हजार 550 रुग्ण दगावले आहेत. ब्राझीलमध्ये महामारीवर नियंत्रण मिळताना दिसून येत नाही. शनिवारी सकाळी तेथील बळींचा आकडा 99 हजार 702 वर पोहोचला आहे. तर फ्रान्समध्ये कोरोना संसर्गाने पुन्हा जोर पडकला आहे. तेथे एप्रिलनंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे.

जर्मनीतही संसर्ग वाढला

जर्मनीत सलग तिसऱया दिवशी 1 हजारपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. मागील 24 तासांमध्ये तेथे 1,122 रुग्ण सापडले असून 12 जणांचा मृत्यू ओढवला आहे. तेथे कोरोनामुळे आतापर्यंत 9,195 बाधित दगावले आहेत. जर्मनीत संसर्ग अचानक वाढल्याने नियम अधिक कठोर करण्यात आले असून चाचण्यांचा वेग वाढविण्यात आला आहे.

द. कोरिया : 43 रुग्ण

दक्षिण कोरियात 24 तासांमध्ये 43 नवे रुग्ण सापडले असून यातील 30 स्थानिक संसर्गाशी संबंधित असून 13 जण विदेशातून आलेले आहेत. तेथील गियोंगी प्रांताच्या गोइंग शहरातील एक चर्च कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले आहे. स्थानिक संसर्गाचे 16 रुग्ण तेथीलच आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्या 14 हजार 562 झाली असून 304 जणांचा मृत्यू झाला आहे.

अडचणी वाढल्या

फ्रान्समध्ये एप्रिलनंतर एका दिवसात सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. दिवसभरात तेथे 2,288 नवे बाधित सापडले आहेत. एप्रिलनंतरच्या काळात प्रतिदिन आढळणाऱया रुग्णांचे हे प्रमाण सर्वाधिक आहे. मागील आठवडय़ात एकूण 9,330 रुग्ण सापडले आहेत. याचबरोबर देशातील बाधितांचे एकूण प्रमाण आता 1 लाख 97 हजार 921 झाले आहे. सरकारनुसार देशात आता 788 क्लस्टर आहेत. त्यांच्यामुळे बाधितांची संख्या वाढत आहे. प्रवासावरील निर्बंध हटविणे देखील सरकारसाठी अडचणीचे कारण ठरले आहे.

जपान : 1601 नवे रुग्ण

जपानमध्ये मागील 24 तासांमध्ये 1,601 नवे बाधित सापडले आहेत. महामारीच्या प्रारंभापासूनच एका दिवसात आढळणाऱया रुग्णांचे हे सर्वाधिक प्रमाण आहे. सलग 4 दिवसांपासून 1 हजारपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत अशी माहिती जपानच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तेथे आतापर्यंत 46 हजार 151 रुग्ण सापडले असून 1,062 जणांचा मृत्यू झाला आहे.

  प्रवाशांमुळे संक्रमण

कोरोना संसर्गाच्या कहरमधून सावरण्याचा प्रयत्न करणाऱया इटलीला प्रवाशांमुळे नवी डोकेदुखी सहन करावी लागत आहे. इटलीत दिवसभरात 552 नवे रुग्ण सापडले आहेत. केवळ 2 आठवडय़ांपूर्वी पर्यंत तेथे एका दिवसात 200 पेक्षा अधिक रुग्ण सापडले नव्हते. अन्य देशांमधून येणारे लोक आणि देशांतर्गत प्रवाशांमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. स्थिती पुन्हा नियंत्रणाबाहेर जाऊ नये याकरता कठोर पावले उचलण्याची पुन्हा तयारी सुरू झाली आहे.

ब्राझील : बेपर्वाई अंगलट

सरकार असो सर्वसामान्यांच्या पातळीवरील बेपर्वाईच ब्राझीलमधील संसर्गामागील मोठे कारण मानले जात आहे. ब्राझीलमध्ये आताही लोकांकडून नियमांचे पालन होत नसून जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा गांभीर्याने घेतला जात नसल्याचे चित्र आहे. देशातील बळींचे प्रमाण आता 99 हजार 702 वर पोहोचले आहे. जायर बोल्सोनारो यांचे सरकार आता स्वतःला हतबल मानू लागले आहे. आम्ही प्रत्येकाला भेटून दिशानिर्देशांचे पालन करणे आवश्यक असल्याचे समजावू शकत नसल्याचे उद्गार व्यापारमंत्र्यांनी काढले आहेत.

हाँगकाँगमध्ये : 69 बाधित

हाँगकॉगमध्ये शनिवारी 69 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. यातील 67 रुग्ण स्थानिकांच्या संपर्कात येऊन बाधित झाले आहेत. जानेवारीच्या अखेरपासून आतापर्यंत हाँगकाँगमध्ये 4 हजारपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. प्रशासनाने हाँगकाँगच्या रहिवाशांना मोफत कोरोना चाचणीची सुविधा देण्याचा निर्णय घेतल्याने हे रुग्ण सापडत असल्याचे मानले जात आहे. हाँगकाँगने आतापर्यंत महामारीवर बऱयापैकी नियंत्रण मिळविले आहे.

टी-पेशींमुळेच काही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे

विषाणू ओळखून प्रतिकारकशक्तीची स्मृती जागविण्याचे कार्य

शरीरात होणारे सर्दीचे संक्रमण कोरोना विषाणू ओळखण्यास मदत करू शकतो. शरीरात आढळून येणाऱया टी-पेशी प्रतिकारकशक्तीची स्मरणशक्ती वाढवत असतात. यातून सर्दीच्या विषाणूप्रमाणेच कोरोनालाही ओळखून त्याच्या विरोधात लढण्यात टी-पेशी महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. कोरोनाच्या काही रुग्णांमध्ये संसर्गाची सौम्य लक्षणे दिसून येत असून यामागे टी-पेशीच कारणीभूत आहेत.

जर्नल सायन्समध्ये प्रकाशित संशोधनानुसार संसर्ग रोखण्यात शरीरातील टी-पेशी महत्त्वाची भूमिका पार पाडतात. टी-पेशी सर्वसाधारणपणे होणाऱया कोल्ड व्हायरसशी लढतात. याच पेशींमुळे काही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत असल्याचे संशोधनात दिसून आले आहे.

सक्रीयता अशी ओळखली!

कोरोनाचा संसर्ग कधीच न झालेले परंतु टी-पेशी मोठय़ा संख्येत निर्माण झालेले काही लोक संशोधनात सामील होते. या पेशी कोरोना विषाणूसह 4 अन्य प्रकारचे कोल्ड कोरोना विषाणूही ओळखण्यास सक्षम आहेत. शरीरात विषाणू शिरल्यावर या पेशी त्याचा माग काढत तो नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.

सौम्य लक्षणे

काही लोकांमध्ये पूर्वीपासूनच अस्तित्वात असलेल्या टी-पेशी कोरोनाच्या विरोधात लढण्यास मदत करत असल्याचे आम्ही सिद्ध केल्याचा दावा अमेरिकेच्या ला जोला इन्स्टीटय़ूट ऑफ इम्युनोलॉजीचे संशोधक डेनिएला विसकॉप यांनी केला आहे. काही लोकांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे का दिसून येतात हे सिद्ध करण्यास हे संशोधन सहाय्यभूत आहे. अशा लोकांमध्ये टी-पेशी कोरोनाच्या विरोधत लढत राहतात आणि विषाणूला यामुळे स्वतःचा प्रभाव पाडता येत नाही. याच कारणामुळे सौम्य लक्षणे दिसून येत असल्याचे ते म्हणाले.

40-60 टक्के रुग्णांमध्ये टी-पेशी

ज्या लोकांमध्ये कोरोना विषाणूचा कधीच संसर्ग झालेला नाही अशा 40 ते 60 टक्के लोकांमध्ये टी-पेशी अधिक संख्येत आढळून आल्याचे अन्य एका संशोधनातून समोर आले आहे. अशा लोकांमध्ये या पेशींनी प्रतिकारकशक्तीला पूर्णपणे प्रशिक्षित केले आहे. अशा लोकांची प्रतिकारकशक्ती कोरोना विषाणूला ओळखू शकते. नेदरलँड, जर्मनी, सिंगापूर आणि ब्रिटनमध्येही याच विषयावर झालेल्या विविध संशोधनांमध्ये अशाचप्रकारची बाब निदर्शनास आली आहे.

Related Stories

मंगळ ग्रहावर पोहोचणार ‘युएई’

Patil_p

सीएएमध्ये नागरिकत्व प्रदान करण्याची तरतूद

Patil_p

पाऊस अन् हिमवृष्टीवर नियंत्रण मिळविणार चीन

Patil_p

अमेरिकेत मोठा सायबर हल्ला; आणीबाणी लागू

datta jadhav

शरीरावर केवळ किटकांचे टॅटू

Amit Kulkarni

रशियाच्या सैन्याला देशातून पूर्णपणे हाकलू!

Patil_p
error: Content is protected !!