ऑनलाईन टीम / पॅरिस :
मोहम्मद पैगंबरांच्या कार्टूनवरून सुरू झालेल्या वादातून फ्रान्सच्या नीस शहरातील एका चर्चच्या बाहेर एक हल्ला झाला आहे. या हल्ल्यात तीन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यासाठी हल्लेखोराने चाकूचा वापर केला आहे. नीसच्या महापौरांच्या मते हा दहशतवादी हल्ला आहे. हल्लेखोराला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरु आहे. 16 ऑक्टोबरला अशाच प्रकारच्या हल्ल्यात एका शिक्षिकेचा गळा कापण्यात आला होता.


हातात चाकू घेतलेल्या हल्लेखोराने ‘अल्ला हू अकबरचा’ नारा देत नीस शहरातील चर्चसमोरच्या एका महिलेचा गळा कापला आणि इतर दोन व्यक्तींनाही ठार मारले. पोलीसांनी आणि नीस शहराच्या महापौरानी हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले आहे. या हल्ल्यामागचा हल्लेखोराचा उद्देश काय होता ते अजून स्पष्ट झालेले नाही.
घटनास्थळी उपस्थित साक्षीदारांनी सांगितले की हल्लेखोर हा ‘अल्ला हू अकबरचा’ नारा देत होता. पोलीसांनी हल्लेखोराला पकडण्यासाठी त्याच्यावर गोळ्या चालवल्या. त्यात तो हल्लेखोर जखमी झाला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.नीसचे महापौर एस्ट्रोसी यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले आणि ते म्हणाले की, आता खूप झाले, फ्रान्समधून इस्लामच्या अशा फॅसिस्ट वृत्तीला बाहेर काढण्यासाठी कायद्यात बदल केला पाहिजे.
दरम्यान, यावेळी पोलीसांनी तीन लोकांच्या मृत्यूची खात्री केली आहे आणि अनेकजण जखमी झाल्याचे सांगितले आहे. फ्रान्सचा दहशतवादी विरोधी पथक या हल्ल्याचा अधिक तपास करत आहे. या हल्ल्यानंतर फ्रान्सच्या सरकारने एक तातडीची बैठक बोलवली आहे.