Tarun Bharat

फ्रिट्झ, जोकोविच, सित्सिपस, क्विटोव्हा यांची आगेकूच

Advertisements

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : कॅस्पर रूड, मुगुरुझा, रॅडुकानू, अँडी मरे, ओपेल्का पराभूत, प्लिस्कोव्हा, पेगुला, इस्नेर, हम्बर्ट विजयी

वृत्तसंस्था /लंडन

सहा वेळचा चॅम्पियन सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची दुसरी फेरी गाठताना कोकिनाकिसचा पराभव केला. त्याचप्रमाणे पाचवा मानांकित कार्लोस अल्कारेझ, टेलर फ्रिट्झ, सित्सिपस, जॉन इस्नेर, युगो हम्बर्ट, महिलांमध्ये कॅरोलिना प्लिस्कोव्हा, जेसिका पेगुला, पेत्र क्विटोव्हा, पॉला बेडोसा, अँजेलिक केर्बर, एलेना ओस्टापेन्को यांनीही विजय मिळवित पुढील फेरी गाठली. पराभूत होणाऱया महत्त्वाच्या खेळाडूंत अँडी मरे, कॅस्पर रुड, एम्मा रॅडुकानू, गार्बिन मुगुरुझा यांचे आव्हान संपुष्टात आले.

जोकोविचने थानासी कोकिनाकिसचा 6-1, 6-4, 6-2 असा सहज पराभव केला. ब्रिटनच्या अँडी मरेचे आगेकूच करण्याचे स्वप्न मात्र दुसऱया फेरीतच उधळले. अमेरिकेच्या 20 व्या मानांकित जॉन इस्नेरने त्याचा 6-4, 7-6 (7-4), 6-7 (3-7), 6-4 असा पराभव करीत तिसरी फेरी गाठली. तीन तास ही लढत चालली होती. यापूर्वी 2013 व 2016 मध्ये मरेने ही स्पर्धा जिंकली होती. इस्नेरची पुढील लढत यानिक सिनरशी होईल. पाचव्या मानांकित अल्कारेझने हॉलंडच्या टॅलन ग्रीकस्पूरवर 6-4, 7-6 (7-0), 6-3 अशी मात करून तिसऱया फेरीत स्थान मिळविले. 19 वर्षीय अल्कारेझची पुढील लढत 32 व्या मानांकित ऑस्कर ओटेशी होईल. अमेरिकेच्या ख्रिश्चन हॅरिसनने माघार घेतल्याने ओटेला पुढील फेरीत स्थान मिळाले.

अमेरिकेच्या 11 व्या मानांकित टेलर फ्रिट्झने ब्रिटनच्या ऍलेस्टर ग्रे विरुद्ध दुसऱया सेटच्या टायब्रेकरमधील सेटपॉईंटवर सुपरमॅन स्टाईल परतीचा फटका मारत सेट जिंकला आणि नंतर तिसरा सेटही जिंकत हा सामना 6-3, 7-6 (7-3), 6-4 असा घेत तिसरी फेरी गाठली. चौथ्या मानांकित ग्रीसच्या स्टेफानोस सित्सिपसनेही आगेकूच करताना ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉम्पसनचा 6-2, 6-3, 7-5 असा पराभव केला.

कॅस्पर रूड, ओपेल्का स्पर्धेबाहेर

तिसऱया मानांकित नॉर्वेच्या कॅस्पर रूडचे आव्हानही अनपेक्षितपणे संपुष्टात आले. युगो हम्बर्टने त्याला 3-6, 6-2, 7-5, 6-4 असे नमवित तिसरी फेरी गाठली. यापूर्वी सहा ग्रँडस्लॅम स्पर्धांत हम्बर्टला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावे लागले होते. त्याची पुढील लढत डेव्हिड गॉफिनशी होईल. 15 व्या मानांकित रीली ओपेल्कालाही टिम व्हान रिथोव्हेनकडून 6-4, 6-7 (8-10), 7-6 (9-7), 7-6 (7-4) असा संघर्षपूर्ण लढतीत पराभव स्वीकारावा लागला.

सॅकेरी, बेडोसा, क्विटोव्हा विजयी

महिलांमध्ये पाचव्या मानांकित मारिया सॅकेरीने तिसरी फेरी गाठताना बल्गेरियाच्या क्हिक्टोरिया टोमोव्हाचा 6-4, 6-3 असा पराभव केला. तिसऱया फेरीत तिची लढत जर्मनीच्या ताताना मारियाशी होईल. मारियाने 26 व्या मानांकित सोराना सिर्स्टियाला पराभवाचा धक्का दिला. युक्रेनच्या लेसिया त्सुरेन्कोने आपल्याच देशाच्या ऍनहेलिना कॅलिनिनावर 3-6, 6-4, 6-3 अशी मात केली. तिची लढत नीमीयरशी होईल. स्पेनच्या चौथ्या मानांकित पॉला बेडोसाने रोमानियाच्या इरिना बाराचा 6-3, 6-2 असा पराभव केला तर 25 व्या मानांकित पेत्र क्विटोव्हाने रोमानियाच्या ऍना बॉग्डनवर 6-1, 7-6 (7-5) अशी मात केली. तिसऱया फेरीत बेडोसा व क्विटोव्हा यांच्यात लढत होईल.

रॅडुकानू, मुगुरुझा पराभूत

महिलांमध्ये ब्रिटनच्या दहाव्या मानांकित एम्मा रॅडुकानूलाही पराभवाचा धक्का बसला. तिला फ्रान्सच्या कॅरोलिना गार्सियाने 6-3, 6-3 असे हरविले. 2017 मध्ये ही स्पर्धा जिंकलेल्या स्पेनच्या दहाव्या मानांकित गार्बिन मुगुरुझालाही पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर पडावे लागले. बेल्जियमच्या ग्रीट मिनेनने तिला 6-4, 6-0 असे हरविले.

रॉबर्टो ऍगटची कोरोनामुळे माघार

स्पेनच्या रॉबर्टो बॉटिस्टा ऍगट विम्बल्डनमधून कोरोनाच्या कारणास्तव बाहेर पडणारा तिसरा टेनिसपटू बनला आहे. कोव्हिड चाचणीत पॉझिटिव्ह आल्याचे त्याने ट्विटवरून सांगितले. 17 व्या मानांकित ऍगटने 2019 मध्ये या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. याआधी मागील वर्षीचा उपविजेता मॅटेव बेरेटिनी व 2017 चा उपविजेता मारिन सिलिक यांना याच कारणामुळे या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.

Related Stories

भारत-इंग्लंड महिला संघात आज लढत

Patil_p

लंका संघाची घोषणा, शनाकाकडे नेतृत्व

Patil_p

सरावाच्या क्रिकेट सामन्यात इंग्लंडची बांगलादेशवर मात

Patil_p

चेन्नईविरुद्ध दिल्ली ठरले ‘सुपरकिंग्स’!

Patil_p

विंडीज कसोटी संघात होपचे पुनरागमन

Patil_p

मेगास्टार मुंबई इंडियन्सचा ब्लॉकबस्टर विजय!

Patil_p
error: Content is protected !!