Tarun Bharat

फ्रेंच स्पर्धेत नदालचे 13 वे जेतेपद

फेडररच्या विक्रमाशी बरोबरी, टोटल ग्रँडस्लॅमचे जोकोविचचे स्वप्न उद्ध्वस्त

वृत्तसंस्था/ पॅरिस

स्पेनच्या राफेल नदालने जागतिक अग्रमानांकित सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचचा धुव्वा उडवित फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेचे पुन्हा एकदा जेतेपद पटकावून क्लेकोर्टचे आपणच राजे असल्याचे सिद्ध केले. ही स्पर्धा जिंकण्याची त्याची ही 13 वी वेळ असून या जेतेपदाने त्याने रॉजर फेडररच्या 20 ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्याच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

जागतिक द्वितीय मानांकित नदालने जोकोविचचा 6-0, 6-2, 7-5 असा फडशा पाडला. पहिल्या सेटमध्ये नदालने पूर्ण वर्चस्व राखत जोकोविचला संधीच दिली नाही. त्याने हा सेट एकतर्फी जिंकताना केवळ दोन चुका केल्या. दुसऱया सेटमध्येही नदालने आपली पकड ढिली होऊ दिली नाही. मात्र तिसऱया सेटमध्ये जोकोविचने थोडाफार प्रतिकार केला. 3-3 अशा बरोबरीनंतर अकराव्या गेममध्ये जोकोविचने दुहेरी चूक केल्यानंतर नदालने बिनतोड सर्व्हिस करीत या मैदानावरील शंभराव्या विजयासह जेतेपदही निश्चित केले.

2016 मधील ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत जोकोविचला स्टॅन वावरिंकाकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर त्याने सलग पाच ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या होत्या. दुसऱयांदा टोटल ग्रँडस्लॅम साधण्यासाठी येथे त्याला जेतेपद मिळविण्याची गरज होती. पण नदालने स्टेडियमचे नवे डिझाईन, छताची सुविधा आणि प्रेक्षकांचा अभाव याचा आपल्या खेळावर काहीही परिणाम होऊ न देता जोकोविचचे स्वप्न धुळीस मिळविले. ‘या मैदानावरील जेतेपद हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे. फेडररच्या विक्रमाशी बरोबरी साधणे याचा मी विचारही करीत नव्हतो. या शहराचे आणि या कोर्टवरील माझे प्रेम अविस्मरणीय आहे,’ अशा भावना नदालने व्यक्त केल्या.

Related Stories

विल्यम्सन, चॅपमन यांची सराव सामन्यांतून माघार

Patil_p

लंका-बांगलादेश कसोटी मालिका

Patil_p

महिला वर्ल्ड कपसाठी आयर्लंड संघ जाहीर

Patil_p

सेनादल-सौराष्ट्र यांची उपांत्य फेरीत धडक

Patil_p

आयपीएल फायनल दोन दिवसांनी लांबणीवर?

Patil_p

रुबलेव्हलाही कोरोनाची बाधा

Patil_p