Tarun Bharat

बंदमुळे आघाडीत पक्षांना बुस्टर डोस

लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. शिवसेनेचा आक्रमकपणा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मवाळ आणि शांततेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनामुळे मुंबईत हा बंद कडकडीत झाला. या बंदच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांची एकी दिसताना त्यांना भाजपविरोधात बुस्टर डोस मिळाला.

उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सरकारमधील घटक पक्षांनी केंद्रातील भाजप सरकार आणि उत्तर प्रदेशमधील सरकारच्या विरोधात बंद पुकारला. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर तीन पक्षांनी पाठींबा देत केंद्र सरकारच्या विरोधात केलेला हा दुसरा बंद यापूर्वी गेल्या वर्षी 8 डिसेंबर 2020 रोजी केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात भारत बंद पुकारण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्रात आघाडी सरकारमधील तीन पक्षांनी एकत्र येत महाराष्ट्र बंद केला होता, मात्र त्यावेळी मुंबईत बेस्ट तसेच रिक्षा आणि टॅक्सी सेवा सुरू असल्याने मुंबईमध्ये बंदला अल्पप्रतिसाद मिळाला होता. मात्र सोमवारी उत्तर प्रदेश येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला मुंबई आणि ठाण्यात चांगलाच प्रतिसाद बघायला मिळाला. शिवसेनेने या बंदला समर्थन देताना पूर्ण ताकदीने उतरण्याची केलेली घोषणा त्यातच आगामी मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणूकीच्या निमित्ताने चार्ज असलेले शिवसेनेचे कार्यकर्ते आणि सैनिक यांनी थेट रस्त्यावर उतरत या बंदची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतल्याचे बघायला मिळाले. मुंबई आणि ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मुंबईत अजुनही केवळ दोन डोस घेऊन 14 दिवस झालेल्यांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा दिलेली आहे. त्यामुळे ज्यांनी डोस घेतलेलेच नाहीत किंवा दोन डोस झालेले नाहीत, त्यांना बेस्ट आणि टीमएमटीचा मोठा आधार आहे. मात्र या मुंबईत काही ठिकाणी बेस्ट बसेसची तोडफोड झाल्याने बेस्ट बसेसही रस्त्यावर जास्त प्रमाणात आलेल्या नाहीत. तर ठाणे महानगरपालिकेची टीएमटीची एकही बस रस्त्यावर उतरली नाही. याचा मोठा फटका चाकरमान्यांना बसला. त्यातच रिक्षाही 80 ते 90 टक्के बंद असल्याने ज्या रिक्षा रस्त्यावर धावत होत्या, त्या रिक्षावाल्यांनी या नामी संधीचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे मात्र पुरते हाल झाल्याचे सोमवारी बघायला मिळाले.

मुंबई बंद आणि शिवसेना हे वेगळे समीकरण असून शिवसेनेचा सहभाग असला तर मुंबईत कडकडीत बंद होतो अन्यथा संमिश्र आणि तुरळक होतो. बाळासाहेब नेहमी बोलायचे शिवसेनेचा बंद हा कडकडीतच असला पाहीजे. तुरळक, संमिश्र हा शिवसेनेचा बंद होऊच शकत नाही. एकीकडे शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत सर्व दुकाने बंद केली तर काँग्रेस-राष्ट्रवादीने शांततेच्या मार्गाने आंदोलन आणि निषेधाच्या घोषणा दिल्या. राज्यातील सध्याचे राजकारण बघता भाजप विरूध्द सरकार असा रोजच आरोप प्रत्यारोपाचा सामना बघायला मिळत आहे. भाजपने या बंदला विरोध करताना राज्य सरकारला नैतिकता असेल तर त्यांनी राज्यातील शेतकऱयांना मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. गेल्या 15 दिवसात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाने छापेमारीची जोरदार कारवाई केली आहे. अजित पवार हे जरी उपमुख्यमंत्री असले तरी राष्ट्रवादीचे ते महत्वाचे नेते असल्याने त्यांच्या नातेवाईकांवर जर कारवाई होत असेल तर पक्षाच्या इतर नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचण्यास वेळ लागणार नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर ईडी आणि आयकर विभागाची कारवाई होत आहे. भाजप नेते कीरीट सोमय्या यांची लिस्ट तर वाढतच असून सोमय्या रोज नवीन घोटाळ्य़ाचा दावा करताना इशारा देत आहे. महाविकास आघाडी सरकारवर आणि त्यांच्या नेत्यांवर वेगवेगळे आरोप होत असताना आघाडी पक्षांमधील ऐक्य वेळोवेळी पहायला मिळत आहे. सोमवारी पुकारलेल्या बंदमध्ये तीन पक्षांनी सहभागी होताना जणु भाजपला इशाराच दिला आहे. काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपचा भावी सहकारी असा उल्लेख केल्याने पुन्हा एकदा शिवसेना भाजप एकत्र येणार याचे पतंग उडवण्यात आले. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयांचा मानहानीचा दावा करताना पाटील यांची एवढीच किंमत असल्याचे सांगितले तर भाजपचे नेते मोहीत भारतीय यांनी प्रुझवरील अंमली पदार्थ सेवन प्रकरणी केलेल्या आरोपांबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर तर अनिल परब आणि हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांच्यावर मानहानीचा दावा केला आहे. ज्या कीरीट सोमय्या यांनी 2016 मध्ये मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार रुपी रावणाचे दहन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांना मारहाण केली होती. त्यावेळी शिवसेना आणि भाजप युती होती. सोमय्या यांनी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राचा संकल्प करत रावण दहन करण्याची घोषणा केली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे काय बोलणार हे आगामी महत्वाच्या महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे ठरणार आहे.

प्रवीण काळे

Related Stories

वीजटंचाईचे संकट

Patil_p

संक्रांत सणाची विविध रूपे

Patil_p

कृषी व्यवस्थेतील आधुनिक कौशल्ये

Patil_p

संत तुकाराम महाराज का अवतीर्ण झाले ?

Patil_p

चीनविरुद्ध शीतयुद्धाऐवजी उघड संघर्ष आवश्यक

Patil_p

कौटुंबिक आरोग्याची ऐशीतैशी

Patil_p