आज कांस्यपदकासाठी लढणार, कमकुवत लेग डिफेन्सचा बजरंगला आणखी एकदा फटका
चिबा (जपान) / वृत्तसंस्था
बजरंग पुनियाला कमकुवत लेग डिफेन्सचा ऑलिम्पिकच्या सर्वोच्च व्यासपीठावर उपांत्य फेरीत फटका बसला. तीन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन हाजी अलिव्हने पुरुषांच्या फ्री स्टाईल 65 किलोग्रॅम वजनगटातील या इव्हेंटमध्ये पुनियाला एकतर्फी फरकाने चीत केले. आज (शनिवार, दि. 7) बजरंग कांस्यपदकासाठी लढेल.
अझरबैजानच्या रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यजेता हाजीने सातत्याने बजरंगच्या पायाला लक्ष्य केले आणि दोनवेळा तो बजरंगला पाय भक्कम पकडून रोल करत दोन गुण मिळवण्यात यशस्वी ठरला.
पहिल्या सत्रात 1-4 अशा फरकाने पिछाडीवर राहिलेल्या बजरंगने दुसऱया सत्रात मोठय़ा आक्रमणाचे इरादे दाखवून दिले. पण, हाजीने अतिशय शिताफीने त्यातून सुटका करवून घेतली आणि पुन्हा एकदा बजरंगच्या कमकुवत लेग डिफेन्सवर सारा फोकस ठेवला. अपवाद म्हणून बजरंगने दोनवेळा टेकडाऊनवर जरुर गुण वसूल केले. मात्र, जो मोठा डाव रचणे आवश्यक होते, तो आलाच नाही. शेवटचे 30 सेकंद बाकी असताना बजरंगने प्रयत्न जरुर केले. पण, हाजीने त्याला यात अजिबात मोकळीक दिली नाही. अंतिमतः हतबल, निराश बजरंग मॅटवर पडून राहिला. आपण आपल्यापेक्षा सरस मल्लाविरुद्ध हरलो आहोत, याची जाणीव त्याला त्यावेळी झाली होती.
बजरंग पुनिया आता कांस्यपदकासाठी लढणार असून तो यात जिंकू शकला तर ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरीशी भारत बरोबरी साधेल. यापूर्वी, 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये सुशील कुमार व योगेश्वर दत्त यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले होते. यंदा टोकियोत रवि दहियाने 57 किलोग्रॅम वजनगटात रौप्य जिंकले आहे. शुक्रवारी बजरंगने किर्गिस्तानच्या एर्नझर ऍकमतलिएव्हविरुद्ध आणि त्यानंतर इराणच्या मोर्तेझा चेका घियासी यांना लागोपाठ पराभूत करत उपांत्य फेरीत धडक मारली होती. मात्र, हा धडाका त्याला उपांत्य फेरीत कायम राखता आला नाही.
तत्पूर्वी, उपांत्यपूर्व फेरीत घियासीविरुद्ध जवळपास प्रत्येक टप्प्यात बजरंग हा प्रतिस्पर्ध्यापेक्षा पिछाडीवर होता. मात्र, या प्रतिकूल स्थितीनंतर देखील त्याने विजयश्री खेचून आणली. दुसऱया सत्रात शेवटचे मिनिट बाकी असताना बजरंगने घियासीच्या गळय़ाभोवती डाव टाकला आणि त्याला मॅटवर लोळवत महत्त्वपूर्ण गुण संपादन केले. बजरंगने अधिक हाय स्कोअरिंग मूव्ह केले आणि दोन गुणांचे टेकडाऊन घेतले. त्यामुळे, त्याला या निकषावर विजयी घोषित केले गेले.
एरवी, बजरंग एकतर्फी विजय संपादन करण्यासाठी ओळखला जातो. मात्र, येथे उपांत्य फेरीत तो धडाका बजरंगाला दाखवता आला नाही. रशियातील स्थानिक स्पर्धेत खेळताना झालेली गुडघ्याची दुखापत त्याच्यासाठी बरीच त्रासदायक ठरली.
सीमा बिस्ला पराभूत (6 एसपीओ 05-सीमा बिस्ला)
महिला गटात सीमा बिस्ला 50 किलोग्रॅम वजनगटात पहिल्याच फेरीत पराभूत झाली. तिला टय़ुनिशियाच्या सारा हमदीविरुद्ध 1-3 अशा फरकाने अपयश सोसावे लागले. सारा नंतर आपल्या पुढील लढतीत पराभूत झाल्याने सीमाची रेपेचेज फेरीची आशाही संपुष्टात आली. रोहतकची सीमा 2017 पर्यंत राष्ट्रीय स्पर्धाही जिंकू शकली नव्हती. पण, मे महिन्यात सोफियामध्ये आयोजित वर्ल्ड ऑलिम्पिक क्वॉलिफायरमध्ये विजय संपादन करत ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली होती.
दीपकचे विदेशी प्रशिक्षक निलंबित
रेफ्रींशी हुज्जत घातल्यामुळे दीपक पुनियाचे विदेशी प्रशिक्षक मुराद गैदारोव्ह यांना टोकियो ऑलिम्पिकमधून निलंबित केले गेले आहे. कांस्यपदकाच्या प्ले-ऑफ लढतीत दीपकला सॅन मॅरिनोच्या माईल्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला, त्यानंतर रेफ्रींशी मुराद यांनी हुज्जत घातली होती, असे ट्वीट आयवोए महासचिव राजीव मेहता यांनी केले.
नीरज चोप्रा 100 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणणार का? आज फैसला


टोकियो ः ऍथलेटिक्समध्ये मागील 100 वर्षांपासून राहत आलेली पदकाची प्रतीक्षा आज संपुष्टात येणार का, याचा आज फैसला होईल. आज पुरुषांच्या गटातील भालाफेकीची फायनल होत असून त्यात सर्व नजरा नीरज चोप्राच्या कामगिरीवर असणार आहेत. 23 वर्षीय चोप्राने क्वॉलिफिकेशन राऊंडमध्ये 86.59 मीटर्सचा सुपर थ्रो करत अव्वलस्थान संपादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे, आजच्या फायनलचे विशेष औत्सुक्य असणार आहे.
1920 ऍन्टवर्प, बेल्जियम ऑलिम्पिकमध्ये भारताच्या 5 सदस्यीय संघात 3 ट्रक व फिल्ड ऍथलिट्स होते. त्या पथकातील आणखी दोघे मल्ल होते. त्या ऑलिम्पिकनंतर भारताला ऍथलेटिक्समध्ये आजवर एकही पदक जिंकता आलेले नाही.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी 1900 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नॉर्मन प्रिचर्डने 200 मीटर्स व 200 मीटर्स अडथळय़ाच्या शर्यतीत रौप्य जिंकली होती, ती भारताच्या नावेच नोंद केली आहेत. आयएएएफच्या (आता वर्ल्ड ऍथलेटिक्स फेडरेशन) नोंदीनुसार मात्र प्रिचर्डने ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधीत्व केल्याची नोंद आहे.
हरियाणातील पानिपतनजीक खांद्रा खेडय़ातील, शेतकऱयाचा मुलगा असलेल्या नीरजने ऍथलेटिक्समध्ये कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला. आता ऑलिम्पिकच्या सर्वोच्च व्यासपीठावर दिवंगत मिल्खा सिंग व पीटी उषा यांच्या हातातून निसटलेले पदक चोप्रा जिंकू शकणार का, हे आज स्पष्ट होईल.
बॉक्स (6 एसपीओ 02-अदिती अशोक)
अदिती अशोकसाठी रौप्यपदकाच्या आशा पल्लवित!
भारतीय गोल्फपटू अदिती अशोक तिसऱया फेरीअखेर दुसऱया पोझिशनवर कायम असून या खेळात देशाला पहिले पदक मिळवून देण्याच्या आशा यामुळे पल्लवित आहेत. अमेरिकेची नेली कोर्डा अव्वलस्थानी असून अदिती अशोक दुसऱया स्थानी आहे. न्यूझीलंडची लिडिया को, ऑस्ट्रेलियाची हन्नाह ग्रीन, डेन्मार्कची ख्रिस्तिन पेडर्सन व जपानची मोने इनामी संयुक्त तिसऱया स्थानी आहेत. अदितीसाठी ही दुसरी ऑलिम्पिक असून मे-जूनमध्ये तिने अगदी मोजक्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. यादरम्यान तिला कोरोनाचा संसर्गही झाला होता.
‘भारतात गोल्फला फारसे फॉलोअर्स नाहीत. त्यांना गोल्फ पूर्ण माहीत आहे आणि ते फॉलो करत नाहीत, असे अजिबात नाही. मुळात, भारतात गोल्फबाबत फारशी माहितीच नाही. फक्त ऑलिम्पिकवेळी गोल्फची थोडीअधिक चर्चा होते’, असे अदिती अशोक याप्रसंगी म्हणाली.
जपानमधील वादळ पथ्यावर पडणार?
गोल्फ इव्हेंटमधील सध्या 3 फेऱया संपन्न झाल्या असून शेवटची फेरी आज (शनिवार दि. 7) होत आहे. मात्र, स्पर्धेच्या ठिकाणी वादळी वारे अपेक्षित असून त्याचा व्यत्यय आला व उर्वरित टप्पा रद्द करावा लागला तर ही बाब अदितीच्या पथ्यावर पडू शकते. आयोजकांनी तूर्तास रविवारचा दिवस देखील राखीव ठेवला आहे. 72 होल्स पूर्ण होतील, अशी सध्या त्यांना अपेक्षा आहे. मात्र, ते होऊ न शकल्यास 72 होल्सऐवजी 54 होल्सचा इव्हेंट गृहित धरुन त्यानुसार निकाल जाहीर केले जातील आणि त्यात अदितीला रौप्य मिळण्याची शक्यता असणार आहे.