Tarun Bharat

बनावट प्रवासी पास देणाऱया टोळीचा छडा

मुंबई क्राईम ब्रँच आणि सिंधुदुर्ग पोलिसांची यशस्वी कामगिरी : चार संशयितांना मालवण हडी येथून पकडले

मुंबईतील टॅक्सी चालकांच्या टोळीचा प्रताप : मोठय़ा प्रमाणात बनावट पास जप्त

सिंधुदुर्गातून अनेकांना बनवून दिले प्रवासी पास : मुंबईतूनही काहींना अटक होणार

मोठय़ा टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता

प्रतिनिधी / मालवण:

मुंबईकर चाकरमान्यांना गावी येण्यासाठी मुंबई पोलिसांचे बनावट प्रवासी पास बनवून देणाऱया टोळीचा मुंबई क्राईम ब्रँच आणि सिंधुदुर्ग पोलिसांनी एका संयुक्त मोहिमेत छडा लावला आहे. याप्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे. ते सर्व मालवण तालुक्यातील हडी गावातील असून मुंबईत टॅक्सीचालक म्हणून कार्यरत होते. मुंबईत टॅक्सीचालक असणाऱया युवकांच्या टोळीकडून मुंबई आणि मालवण येथून बनावट प्रवासी पास बनवून देण्याचे रॅकेट चालविल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. संशयितांची संख्या अधिक असण्याचीही शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी मालवण आणि मुंबई या ठिकाणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रँचेच पोलीस स्वत:
प्रवासी बनले होते. मुंबई पोलिसांनी मालवण-हडी येथे येत मालवण पोलिसांच्या मदतीने चारही संशयितांच्या मुसक्या आवळल्या. मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांमध्ये अब्दुल करीम मोहम्मद शेख (28), समीर समशुद्दीन शेख (36), नूर मोहम्मद शेख (30) या तिघांचा समावेश आहे. तर आणखी एक संशयित सर्फराज हसन शेख (37) मालवण पोलिसांच्या ताब्यात आहे. चौघेही मुंबईत टॅक्सी ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहेत.

गुरूवारपासून गोपनीय तपास

लोअर परेल ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाणे येथील मुंबई क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक गुरुवारी मालवणमध्ये बनावट प्रवासी पास बनविणाऱया टोळीच्या मागावर आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनित चौधरी व सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांचे पथक मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी सज्ज होते. मुंबई आणि मालवण पोलिसांनी संयुक्तरित्या गेले तीन दिवस शोध मोहीम राबवून संशयितांना ताब्यात घेतले आहे. गुरुवारपासून सिंधुदुर्ग जिल्हय़ात बनावट प्रवासी पास बनविण्याच्या टोळीचा शोध गुप्तपणे घेतला जात होता. यात बांदा पोलीस चेकनाक्यानेही महत्वपूर्ण कामगिरी बजावली.

पोलीसच बनले प्रवासी

मुंबई पोलिसांनी मुंबईत गुन्हा दाखल करून बनावट पास बनविणाऱयांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. यात त्यांना मुंबईहून थेट मालवणपर्यंतचे धागेदोरे आढळले. त्याआधारे त्यांनी संबंधिताच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून प्रवासी पास हवा असल्याचे सांगितले. त्यानंतर तपासाची सूत्रे हलवून थेट सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मालवण पोलीस निरीक्षकांना याची कल्पना दिली. त्यानंतर प्रवासी म्हणून आलेल्या मुंबई पोलिसांच्या साथीने मालवण पोलिसांचे एक पथक हडी-कोतेवाडी येथे जात पास घेण्याच्या बहाण्याने संशयित तीन युवकांना घरातून बाहेर बोलावून ताब्यात घेतले. यात अब्दुल करीम मोहम्मद शेख, समीर समशुद्दीन शेख, नूर मोहम्मद शेख यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून चौथ्या संशयिताला मालवण पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. हडी येथून ताब्यात घेतलेल्या तिन्ही युवकांना मुंबई पोलीस आपल्यासोबत घेऊन तपासासाठी रवाना झाले आहेत. या कारवाईत मालवण पोलीस ठाण्यातील हेमंत पेडणेकर, सिद्धेश चिपकर यांनीही महत्वपूर्ण कामगिरी बजावली.

चौथा संशयित जाळय़ात अडकला

चौथा संशयित सर्फराज हसन शेख हा 24 जुलैला सकाळी मालवण-सिंधुदुर्ग ते मडगाव-गोवा असे तीन प्रवाशांना वैद्यकीय कारणास्तव स्वत:च्या ताब्यातील होंडा ऍसेन्ट (एमएच-01/सीजे-4345) या गाडीचा पास बनवून गेल्याची माहिती मिळताच मालवण पोलिसांनी बांदा व वेंगुर्ले पोलिसांना गाडी नंबरची माहिती दिली. बांदा पोलीस चेकपोस्टवर सर्फराज शेख याची गाडी आली असताना पोलिसांनी चालकासह ती ताब्यात घेऊन मालवण पोलिसांच्या स्वाधीन केली.

मालवण पोलिसातही गुन्हा दाखल

मालवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सोनाप्पा चव्हाण यांनी याप्रकरणी तक्रार दिल्याने चारही संशयितांविरोधात भादंवि कलम 420, 465, 468, 471, 34, आय. टी. ऍक्ट 66 (सी) 66 (डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यात बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक करण्यात आल्याचे म्हटले आहे. यातील तिघांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. तर सर्फराज याला मालवण पोलिसांनी अटक केली आहे. त्याला मालवण न्यायालयासमोर हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

या कारणास्तव गुन्हा दाखल

‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाकडून जिल्हा बंदीचा आदेश देण्यात आला आहे. या कालावधीत एका जिह्यातून दुसऱया जिह्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही वाहनास जाण्यासाठी शासनाकडून प्राधिकृत करण्यात आलेल्या आस्थापनाकडून वाहतुकीचा पास असल्याशिवाय प्रवासास मनाई आहे. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य व पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील प्राधिकृत केलेले अधिकारी व जिल्हास्तरीय भागातून प्राधिकृत करण्यात आलेले अधिकारी यांच्या व्यतिरिक्त कोणाकडूनही पास देण्याची परवानगी नाही. तसेच ज्या भागातून जी व्यक्ती प्रवास करणार आहे, त्या भागातील शासनाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱयांकडूनच पास घेऊन प्रवासाला परवानगी आहे. असे असताना चौघाही संशयितांनी इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून खोटे पास बनाविले. बनविलेला पास हा खोटा आहे हे माहिती असूनही तो खरा असल्याचे भासवून वापरत फसवणूक केली. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई पोलीस अधिकाऱयांच्या सही-शिक्क्याचा पास

 मालवण-सिंधुदुर्ग ते मडगाव-गोवा या प्रवासासाठी सर्फराज हसन शेख याने नूर मोहम्मद शेख (हडी-मालवण) याच्याकडून पास बनवुन घेतला असून सदरचा पास हा समीर समशुद्दीन शेख (हडी, ता.मालवण) याच्या मोबाईलमधील व्हॉट्सऍपवरून स्वत:च्या मोबाईल जिओ सीमकार्ड नंबरवर (8850147874) घेतला. सर्फराज हसन शेख याने मालवण-सिंधुदुर्ग ते मडगाव-गोवा हा 24 जुलै ते परतीचा प्रवासाचा 25 जुलैचा पास विशाल ठाकुर, कमिशनर ऑफ पोलीस कोविड कंट्रोल रुम, फॉर कमिशनर ऑफ पोलीस, मुंबई व 0.W.No.  45780125778557/DCP/OPS/2020 दि. 23/07/2020 तसेच ग्रेटर मुंबई पोलीस नावाचा लोगो व डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस (ऑपरेशन) या नावाचा गोल शिक्क्याचा वापर करून बनविला. त्यावर विशाल ठाकुर यांची स्वाक्षरी केलेली आहे. महाराष्ट्र पोलीस अंतर्गत ग्रेटर मुंबई पोलीस यांच्या लोगोचा व डेप्युटी कमिशनर पोलीस (ऑपरेशन) यांच्या गोल शिक्क्याचा व सहीचा गैरवापर करून फसवणूक केल्याची तक्रार मालवण पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

फसवणुकीपासून दूर राहा!

मुंबई अगर इतर ठिकाणाहून प्रवास करण्यासाठी बनावट पास बनवून देणाऱया टोळीकडून अनेकांची फसवणूक झाल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या पासमध्ये मुंबई पोलिसांच्या सही आणि शिक्क्याचा वापर करून इतर राज्यात आणि जिल्हय़ात प्रवासी नेण्यासाठी आणि आणण्यासाठी संशयित व्यक्तींनी बनावट पास बनविल्याचे दिसून आले आहे. यात संशयित व्यक्तींनी आपल्या गाडीवरही अनेक पास बनविले आहेत. पुढील तपासात संशयितांकडून इतर सहभागी युवकांची नावे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले. अशाप्रकारे फसवणुकीचे प्रकार होत असल्याने चाकरमानी इतर नागरिकांनी अशा व्यक्तींपासून सावध राहावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक चौधरी यांनी केले आहे.

Related Stories

रत्नागिरी : हातखंबा येथे भीषण अपघात, ट्रकची ४ वाहनांना धडक

Archana Banage

सरपंचपदासाठी 11 रोजी होणार निवडणुका

NIKHIL_N

रत्नागिरी : हायटेक बसस्थानकाचे काम गेल्या दहा महिन्यापासून पेंडींग!

Archana Banage

मोपा विमानतळाला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नाव द्यावे : नंदकुमार नाईक

Anuja Kudatarkar

श्री पेढेश्वर देवस्थानच्या पितळीच्या घंटा चोरट्यांनी लांबविल्या

Anuja Kudatarkar

भंडारी मंडळातर्फे 21 ऑगस्टला विद्यार्थ्यांचा गुणवंत सोहळा

Anuja Kudatarkar