Tarun Bharat

बसथांब्यामध्ये वाहने; प्रवासी रस्त्यावर

शहरातील बसथांब्यांचा वापर होतोय चक्क कार पार्किंगसाठी

प्रतिनिधी /बेळगाव

शहर आणि उपनगरांत महापालिकेकडून ठिकठिकाणी बसथांबे उभारण्यात आले आहेत. मात्र बसथांब्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सातत्याने होत आहे. अशातच आता बसथांबा निवारा शेडखाली कार पार्किंग करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. अग्निशमन दलाच्या कार्यालयाशेजारी असलेल्या बस निवारा शेडखाली प्रवाशांऐवजी कार थांबल्याचे निदर्शनास आले आहे.

बसथांब्यांचा वापर कोणत्या कारणासाठी केला जाईल, हे सांगता येत नाही. देखभालीकडे महापालिकेने दुर्लक्ष केले असल्याने बसथांब्यांचा वापर पार्किंगसाठी होत आहे. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी असलेल्या बसथांबा निवाराशेडमध्ये निराश्रितांनी आश्रय घेतला आहे. तसेच काही ठिकाणी भटकी कुत्री आणि जनावरे बसत असल्याचे निदर्शनास येते. परिणामी बसथांब्यांची दुरवस्था झाली आहे. बसथांब्यांची स्वच्छता वेळेवर केली जात नाही. दुर्गंधीयुक्त बसथांब्यांवर कसे थांबायचे? असा प्रश्न प्रवाशांसमोर निर्माण होत आहे.

अत्याधुनिक आणि स्मार्ट बसथांबे उभारण्यात आले. पण याचा उपयोग प्रवाशांना होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. बहुतांश बसचालक बसथांब्यावर थांबविण्याऐवजी मागे किंवा पुढे थांबवितात. त्यामुळे प्रवाशांना धावपळ करावी लागते. परिणामी प्रवासी बस थांबण्याच्या ठिकाणी थांबतात.

ऊन-पावसापासून वाहने सुरक्षित ठेवण्यासाठी काही वाहनधारक चक्क बसथांब्यांमध्येच वाहने पार्क करीत आहेत. वडगाव, अनगोळ नाका तसेच खानापूर रोडवरील अग्निशमन दलाच्या कार्यालयाशेजारी मोठय़ा आकाराच्या निवाराशेडची उभारणी केली आहे. त्यामुळे काही चारचाकी वाहनधारक या ठिकाणी दररोज वाहने पार्क करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. उन्हापासून वाहन सुरक्षित ठेवण्यासाठी निवाराशेडचा वापर केल्याचे आढळून आले आहे. पण यामुळे प्रवाशांना रस्त्यावर थांबावे लागत आहे.

प्रशासनाने उपाययोजना राबविण्याची मागणी…

बसथांब्यापासून 100 मीटरच्या परिसरात खासगी वाहने पार्क करण्यास नियमानुसार बंदी आहे. पण या नियमावलीची अंमलबजावणी केली जात नसल्याने बसथांबे आता खासगी वडाप वाहनांचे स्थानक आणि पार्किंगतळ बनले आहे. यामुळे बसप्रवाशांची गैरसोय होत आहे. बसथांब्यांवर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी महापालिका, परिवहन मंडळ आणि रहदारी पोलीस प्रशासनाने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.

Related Stories

‘त्या’ महिलेच्या संपर्कातील 27 जण क्वारंटाईनमध्ये

Patil_p

साखर उत्पादनात बेळगाव जिल्हा आघाडीवर

Amit Kulkarni

भात पीक पोसवणीच्या मार्गावर असतानाच करप्या रोगाने ग्रासले

Patil_p

भाजपतर्फे प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

Patil_p

अधिवेशन सरकारचे; धरणे, सत्याग्रह संघटनांचे!

Amit Kulkarni

पुन्हा एकदा सेवा देण्यास अंजुमन सज्ज

Amit Kulkarni