विद्यार्थी बसपास वितरणाला प्रारंभ
प्रतिनिधी /बेळगाव
मागील आठवडय़ापासून 9 वी ते 12 वी पर्यंतच्या ऑफलाईन वर्गांना प्रारंभ झाला आहे. तसेच येत्या सोमवारपासून 6 वी ते 8 वीपर्यंतच्या वर्गांना प्रारंभ होणार आहे. यामुळे परिवहननेदेखील 1 सप्टेंबरपासून ऑनलाईन बसपास प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. दरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने दि. 15 सप्टेंबरपर्यंत जुना पास दाखवून प्रवास करण्याची मुभा दिली आहे.
गतवषीपासून परिवहनने बसपास प्रक्रिया बदलली असून चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना सेवासिंधू ऑनलाईन पोर्टलद्वारेच अर्ज करून बसपास मिळविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गतवषी ऑनलाईन बसपास मिळविताना विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे ऑनलाईन बसपास प्रक्रिया विद्यार्थ्यांना डोकेदुखीच ठरली होती. मात्र यंदा सेवासिंधूच्या माध्यमातून तातडीने बसपास उपलब्ध करून दिले जातील, अशी माहिती परिवहनच्या अधिकाऱयांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांनी असा करावा अर्ज
विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करताना शाळेची शुल्क पावती, उत्पन्नाचा दाखला व आधारकार्ड आवश्यक आहे. सदर कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत, तसेच अर्ज केलेली एक प्रत शाळा-महाविद्यालयात द्यावी, त्यानंतर शाळा-महाविद्यालयांतील शिक्षकांना ती प्रत बसस्थानकाच्या बसपास विभागात जमा करावी लागणार आहे. त्यानंतरच विद्यार्थ्यांना बसपास उपलब्ध होणार आहे.