Tarun Bharat

बसवेश्वर चौक अडकला समस्यांच्या विळख्यात

बसवेश्वर चौक-डाक बंगला रस्ता 6 महिन्यांपासून दुर्लक्षित : कामांमध्ये सातत्य नसल्याने शहरवासियांना करावा लागतोय अडचणींचा सामना

प्रतिनिधी / बेळगाव

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राबविण्यात येणारी कामे सुरळीतपणे सुरू नसल्याने ठिकठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. गोवावेस येथील बसवेश्वर चौक ते डाक बंगला परिसरातील रस्ता मागील 6 महिन्यांपासून समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. अलीकडे येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले, पण चौकातील रस्त्याचे काँक्रिटीकरण अर्धवट ठेवण्यात आल्याने वाहनधारकांच्या समस्येत आणखीनच भर पडली आहे.

शहरातील विविध चौक आणि रस्त्यांचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. मात्र, सदर कामांमध्ये सातत्य नसल्याने शहरवासियांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बसवेश्वर चौक ते डाक बंगल्यापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू करून सहा महिने होत आले, पण आतापर्यंत एका बाजूचा रस्तादेखील पूर्ण झाला नाही. महापालिका व्यापारी संकुलासमोरील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र, रस्त्याच्या साईडपट्टय़ांचे व गटारीचे काम अद्यापही अपूर्ण आहे. सदर काम मागील 3 महिन्यांपासून करण्यात येत आहे. तरीदेखील हे काम पूर्ण करून या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यास स्मार्ट सिटी कंपनीला यश आले नाही. दुसऱया बाजूचे काम अपूर्ण असल्याने एकाच बाजूच्या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. परिणामी वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण होत आहेत. एका बाजूचा रस्ता पूर्णपणे बंदच ठेवण्यात आल्याने हा रस्ता आता पार्किंग तळ बनला आहे. अपूर्ण असलेल्या रस्त्यावरून दोन्ही बाजूने वाहतूक सुरू असल्याने अपघाताचे प्रसंग घडत आहेत.

बसवेश्वर चौकाला जोडणाऱया अनेक रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. पण एकाही रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले नाही. बसवेश्वर चौकात वाहने वळतील इतकाच रस्ता शिल्लक सोडून काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र, यामुळे चौकात वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण होत आहेत. हा रस्ता रहदारीचा असल्याने खानापूर रोड, महात्मा फुले रोड, शुक्रवार पेठ आणि वडगावकडून येणाऱया रस्त्यांवरून वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. त्यामुळे चौकात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. बस आणि अवजड वाहनांची वर्दळही मोठय़ा प्रमाणात असल्याने हा रस्ता अडचणीचा ठरत आहे. येथील अर्धवट कामामुळे वाहनधारकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशातच चौकातील अडचणींमुळे वाहनधारकांच्या अडचणींमध्ये आणखीनच भर पडली आहे. स्मार्ट सिटी कंपनी अधिकाऱयांच्या आणि कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळेच रस्त्याचे काम अपूर्ण असल्याची टीका नागरिक करीत आहेत.

भेडसावणाऱया समस्यांचे निवारण करा वाहनधारकांना ये-जा करण्यासाठी किमान एका बाजूचा रस्ता तरी व्यवस्थित करण्याची गरज आहे. पण स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांच्या मनमानीमुळे कोणतेच काम व्यवस्थित होत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. नागरिक आणि वाहनधारकांना भेडसावणाऱया समस्यांचे निवारण करण्यासाठी अर्धवट कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे. 

Related Stories

जि. पं. सर्वसाधारण सभेत अधिकाऱयांविरोधात गंभीर आरोप

Patil_p

कांदा दरात 300 रुपयांची घसरण : आवकही वाढली

Amit Kulkarni

कथाकथनातून झाली ‘सिंगापूरची वारी’

Amit Kulkarni

लोकमान्य सोसायटी शिक्षण क्षेत्रात विविध योजना राबविणार

Amit Kulkarni

गायकवाडी येथे अपघातात शिरगुप्पीचा युवक ठार

Patil_p

ड्रेनेजचे पाणी शिरून एटीएम मशीनचे नुकसान

Amit Kulkarni