आमदार अनिल बाबर यांनी दिली माहिती : खानापूरला उपकेंद्रासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार
वार्ताहर/खानापूर
तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उपकेंद्र होण्यासाठी कोणत्याही प्रकारची मंजुरी देण्यात आली नसून तशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही. अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फोनवरून दिली आहे. खानापूर येथे उपकेंद्र व्हावे यासाठी अनेक जुने प्रस्ताव दिलेले असताना याची शहानिशा न करता जुने प्रस्ताव रखडवून ठेवून बस्तवडेला तात्विक मंजुरी का देण्यात आली याची माहिती घेवू. तसेच उपकेंद्र खानापूर येथे व्हावे यासाठी मतदारसंघातील जनतेच्या सोबत आहे, अशी माहिती आमदार अनिल बाबर यांनी दिली.
खानापूर घाटमाथ्यावरील जनतेच्यावतीने आमदार बाबर यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी माहिती देताना आमदार बाबर बोलत होते. माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे, राजाभाऊ शिंदे, बाळासाहेब जाधव, किसान सभेचे जिल्हा संघटक गोपीनाथ सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष सुनील हसबे, नगरसेवक हर्षल तोडकर, चेअरमन महेश माने, अक्षय भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपकेंद्रासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना भेटून खानापूरच्या जागे संदर्भात मागील झालेले ठराव व सर्व कागदपत्रे याचे अवलोकन करून निर्णय घेण्याची मागणी करणार आहे. तसेच याबाबतची भूमिका व्यवस्थित मांडून हे उपकेंद्र खानापूर येथेच व्हावे अशी मागणी करणार आहे. उपकेंद्रांची मंजुरी मिळेपर्यंत तुमचा लोकप्रतिनिधी या नात्याने तुमच्या बरोबर आहे. असेही आमदार बाबर म्हणाले.


previous post