सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला नागरिक टाकताहेत कचरा
वार्ताहर / किणये
बेळगाव तालुक्यातील मच्छे, पिरनवाडी, हिंडलगा रोड आदी भागात नेहमी कचऱयाची समस्या दिसून येते. आता बस्तवाड परिसरातही कचऱयाची समस्या निर्माण झाली आहे. सर्व्हिस रस्त्याच्या बाजूलाच नागरिकांकडून केरकचरा टाकण्यात येत असल्याने दुर्गंधी पसरू लागली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी याची पाहणी करून तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने बस्तवाड व हलगा गावांना जाण्यासाठी सर्व्हिस रस्ता आहे. या रस्त्याच्या बाजूला केरकचरा टाकण्यात येऊ लागला आहे. उघडय़ावर कचरा टाकणाऱयांवर वेळीच निर्बंध घातला पाहिजे. अन्यथा, कचऱयाची मोठी समस्या निर्माण होण्याचा धोका स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
कुंडीतच केरकचरा टाकण्याची गरज
या ठिकाणी प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बॉटल आदी केरकचरा मोठय़ा प्रमाणात टाकण्यात येत आहे. तसेच दारूच्या बाटल्याही टाकण्यात येऊ लागल्या आहेत. या ठिकाणी कचऱयाची लहान कुंडीदेखील ठेवण्यात आलेली आहे. मात्र, काही जण कचरा कुंडीत न टाकता त्या कुंडीच्या बाजूला टाकू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांनीही स्वच्छता राखण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे. कचराकुंडी असेल तर त्या कुंडीतच केरकचरा टाकण्याची गरज आहे.