प्रतिनिधी/ बेळगाव
परिवहन कर्मचाऱयांनी अखेर संप मागे घेतल्यामुळे सोमवारपासून बस सुरू झाल्या होत्या. परंतु सोमवारी काही प्रमाणातच बस धावल्याने प्रवाशांमध्ये नाराजी होती. मंगळवारी सकाळपासूनच बेळगावच्या मध्यवर्ती बसस्थानकातून लांब पल्ल्याच्या गाडय़ांसोबतच शहर व ग्रामीण भागातही बससेवा पूर्ववत झाली. यामुळे मागील चार दिवसांपासून खेळंबलेल्या प्रवाशांना बसचा प्रवास करता आला.
सरकारी कर्मचाऱयांचा दर्जा मिळावा यासाठी राज्यातील परिवहन कर्मचारी संपावर होते. शुक्रवारपासून सुरू झालेला हा संप सोमवारी सकाळी सरकारच्या आश्वासनानंतर माघारी घेण्यात आला. परंतु सोमवारी काही मोजक्मयाच मार्गांवर बस धावल्या. ग्रामीण भागातही बस न धावल्याने नागरिकांनी शहरात येणे टाळले. चार दिवस बस बंद असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात होता. बस सुरू नसल्याने मिळेल त्या खासगी वाहनाने नागरिकांना प्रवास करावा लागला. मंगळवारी लांब पल्ल्याच्या गाडय़ा धावल्या. बेंगळूर, पुणे, मुंबई, तिरुपती, नाशिक यासह इतर मार्गांवर बस पूर्ववत सुरू करण्यात आल्या. याच सोबत बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून शहर व ग्रामीण भागात सुरळीत बस धावत होत्या. यामुळे महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, कामावर जाणारे कर्मचारी यांची बसना गर्दी दिसून आली.