Tarun Bharat

बहरातील लाबुशानेचे चौथे शतक

सिडनी / वृत्तसंस्था

न्यूझीलंडविरुद्ध तिसरी व शेवटची कसोटी : पहिल्या दिवसअखेर 130 धावांवर नाबाद, ऑस्ट्रेलिया 3 बाद 283

मार्नस लाबुशानेने केवळ 14 कसोटी सामन्यात पाचवे शतक झळकावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने येथील न्यूझीलंडविरुद्ध तिसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यातील  पहिल्या दिवसअखेर 3 बाद 283 धावांपर्यंत मजल मारली. किवीज संघ अनेक मुख्य खेळाडूंच्या दुखापतीने त्रस्त असून मालिकाही यापूर्वीच गमावली असल्याने त्यांच्यासाठी ही केवळ उरलीसुरली पत राखण्यासाठीचीच लढत आहे.

तिसऱया स्थानी फलंदाजीला उतरणारा लाबुशाने मागील वर्षात सर्वाधिक कसोटी धावा (64.94 च्या सरासरीने 1104 धावा) जमवणारा अव्वल फलंदाज असून येथे त्याने मालिकेतील दुसरे शतक झळकावले. शुक्रवारी पहिल्या दिवसअखेर तो 130 तर मॅथ्यू वेड 22 धावांवर नाबाद राहिला.

दक्षिण आफ्रिकेतील जन्म असलेल्या लाबुशानेने मागील 7 डावात 4 कसोटी शतके झळकावली असून यापूर्वी पाकिस्तान व न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतही त्याने धावा जमवण्यात कमालीचे सातत्य दाखवले आहे.

निलंबनानंतर दमदार पुनरागमन नोंदवणाऱया स्टीव्ह स्मिथला या लढतीत खाते उघडण्यासाठी चक्क 39 चेंडू खेळावे लागले. पण, एकदा जम बसल्यानंतर त्याने 63 धावांपर्यंत मजल मारली. त्याच्या 182 चेंडूतील खेळीत 4 चौकारांचा समावेश राहिला. स्मिथ व लाबुशाने या जोडीने 156 धावांची शानदार भागीदारीही साकारली. नंतर स्मिथ कॉलिन डे ग्रँडहोमच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये झेल देत तंबूत परतला.

वॉर्नर पुन्हा अर्धशतकापासून दूर

डावखुरा डेव्हिड वॉर्नर 45 धावांवर नील वॅग्नरच्या गोलंदाजीवर लेग गलीवर तैनात ग्रँडहोमकडे झेल देत बाद झाला. डावखुऱया वॅग्नरने वॉर्नरला बाद करण्याची ही या मालिकेतील चौथी वेळ ठरली. मागील नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध नाबाद 335 व 154 धावा करणाऱया वॉर्नरला या हंगामात न्यूझीलंडविरुद्ध अगदी एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही.

शुक्रवारी पहिल्या दिवशी सलामीवीर जो बर्न्स 15 व्या षटकात बाद झाला. त्याला ग्रँडहोमने पहिल्या स्लीपमध्ये टेलरकरवी झेलबाद केले. ग्रँडहोमने येथे मॅट हेन्रीसह गोलंदाजीला सुरुवात केली. टीम साऊदीला या लढतीतून आश्चर्यकारकरित्या वगळले गेले. ऑस्ट्रेलियाने येथे नाणेफेक जिंकली आणि पाहुण्या संघाविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीत 247 धावांनी पराभव पत्करावा लागलेल्या संघात किवीज व्यवस्थापनाने चक्क 5 बदल केले.

ग्लेन फिलीप्सचे पदार्पण

न्यूझीलंडने तातडीने पाचारण केलेल्या ग्लेन फिलीप्सला येथे कसोटी पदार्पणाची संधी दिली तर सॉमरव्हिले, मॅट हेन्री, जीत रावल यांनाही संघात स्थान दिले गेले. या हंगामात अद्याप अपराजित असलेल्या ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात एकही बदल केला नाही. या हंगामात घरच्या मैदानावर चारही कसोटी सामने त्यांनी जिंकले आहेत. शिवाय, त्यापूर्वी इंग्लंडमध्ये ऍशेसही कायम राखला आहे. उभय संघातील ही कसोटी ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक भडकलेल्या वणव्याच्या पार्श्वभूमीवरही चर्चेत आहे. वणव्याच्या धुराचे लोट सिडनीत पोहोचल्यास सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता कायम आहे.

धावफलक

ऑस्ट्रेलिया पहिला डाव : 90 षटकात 3 बाद 283 (लाबुशाने 210 चेंडूत 12 चौकार, 1 षटकारासह नाबाद 130, स्टीव्ह स्मिथ 182 चेंडूत 4 चौकारांसह 63, डेव्हिड वॉर्नर 80 चेंडूत 3 चौकारांसह 45, मॅथ्यू वेड 30 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह नाबाद 22. अवांतर 5. कॉलिन डे ग्रँडहोम 18 षटकात 2-63, नील वॅग्नर 21 षटकात 1-48).

कोट्स

या हंगामात माझी कामगिरी कशी झाली, याचे अवलोकन करणे मला अद्याप शक्य झालेले नाही. मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करत शक्य तितक्या धावांची लयलूट करणे, हे माझे लक्ष्य आहे.

-शतकवीर मार्नस लाबुशाने

Related Stories

माद्रीद स्पर्धेत ओसाकाची विजयी सलामी

Patil_p

द. आफ्रिका-विंडीज वनडे मालिका बरोबरीत

Patil_p

नौकानयनपटू नेत्राला कांस्यपदक

Patil_p

सिंधूचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त

Patil_p

वंदना कटारिया कुटुंबीय प्रकरणाचा कर्णधार राणी रामपालकडून निषेध

Patil_p

गेव्हिन बॅझूनू साऊदम्पटनशी करारबद्ध

Patil_p