Tarun Bharat

बहुचर्चित गोध्रा मतदारसंघ

एमआयएम अन् ‘आप’मुळे वाढली भाजप-काँग्रेसची चिंता

गुजरातच्या पंचमहल जिल्हय़ात विधानसभेचे 5 मतदारसंघ आहे. या जिल्हय़ातील एका मतदारसंघावर मात्र पूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहिलेले असते. 2002 च्या दंगलीनंतर चर्चेत आलेला गोध्रा मतदारसंघ राज्यातील सर्वात चर्चेत राहणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघावर सध्या भाजप उमेदवाराचे बिलकिस बानोंच्या गुन्हेगारांना संस्कारी ठरविणारे वक्तव्य निवडणुकीचा मुद्दा ठरले आहे. तर काँग्रेसचे कार्यकर्ते स्वपक्षीय उमेदवाराच्या विजयासाठी मातब्बर नेते अहमद पटेल यावेळी उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त करत आहेत. या मतदारसंघात काँग्रेसच्या विजयाची रणनीती अहमद पटेल हेच तयार करायचे असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष एआयएमआयएम आणि आम आदमी पक्षानेही स्वतःच्या उमेदवारांना मैदानात उतरविले आहे. यामुळे भाजप अन् काँग्रेसची चिंता वाढली आहे.

पंचमहल जिल्हय़ात गोध्रा, शेहरा, कलोल, हलोल आणि मोरवा हे विधानसभा मतदारसंघ येतात. तर गोध्रा हा मतदारसंघ मुस्लीमबहुल आहे. याचबरोबर येथे आदिवासींचे प्रमाणही लक्षणीय आहे. 2017 पूर्वी गोध्रा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. परंतु 2017 च्या निवडणुकीत भाजपने हा मतदारसंघ काँग्रेसकडून हिरावून घेतला होता. 2022 च्या निवडणुकीत भाजपने पुन्हा सी.के. राउल यांना मैदानात उतरविले आहे. कधीकाळी काँग्रेसमध्ये राहिलेले सी.के. राउल यांनी 2017 च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

भाजपच्या उमेदवारी विजय मिळविण्यासाठी त्यांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली होती. तरीही भाजपने पुन्हा राउल यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यांचा या मतदारसंघात चांगला प्रभाव असल्याचे मानले जाते. यापूर्वी काँग्रेसमध्ये असताना 2007 आणि 2012 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला होता.

तर गोध्रातील भाजप उमेदवार राउल यांनी बिलकिस बानो प्रकरणातील काही गुन्हेगार हे चांगले संस्कार प्राप्त असलेले व्यक्ती असल्याचे विधान केले होते. या विधानामुळे त्यांची कोंडी झाल्याचे मानले जात आहे.

गोध्रा मतदारसंघात राउल यांच्या उमेदवारीला विरोध करणारा भाजपचा एक गट असल्याची चर्चा आहे. राउल हे मागील 15 वर्षांपासून आमदार आहेत. यातील दोनवेळा ते काँग्रेसच्या वतीने तर एकदा भाजपचे आमदार राहिले आहेत. 2017 च्या निवडणुकीत राउल यांनी काँग्रेस उमेदवार परमार राजेंद्र सिंह बलवंत सिंह यांना निवडणुकीत अत्यंत कमी मतांच्या फरकांनी पराभूत केले होते. राउल यांना 42 टक्के तर परमार यांना 41 टक्के मते मिळाली होती. राउल हे केवळ 258 मतांनी विजयी झाले होते.

काँग्रेसने पूर्वीच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यात रश्चिम चौहान यांना उमेदवारी दिली आहे. काँगेस उमेदवाराची आदिवासी पट्टय़ासह ग्रामीण भागात चांगली पकड आहे. आमदाराबद्दलच्या नाराजीचा लाभही त्यांना मिळू शकतो. काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे निधन झाल्याने पक्षाला त्यांची कमतरता भासत आहे. अहमद पटेल यांना येथील पूर्ण माहिती होती. याचमुळे ते पक्षाच्या विजयाची रणनीति तेच आखत होते. 2002 च्या दंगलीनतर या मतदारसंघात भाजपचे हरेश भट्ट विजयी झाले होते. परंतु 2007 आणि 2012 मध्ये काँग्रेसने येथे विजय मिळविला होता.

आप अन् ओवैसी यांची एंट्री

गोध्रा मतदारसंघात मुस्लीम लोकसंख्या सर्वाधिक आहे. या मतदारसंघात सुमारे 2.5 लाख मतदार आहेत. यातील सुमारे 70 हजारांहून अधिक मुस्लीम मतदार आहेत. त्यानंतर आदिवासी मतदारांची संख्या आहे. परंतु या निवडणुकीत भाजपला काँग्रेससह ओवैसी अन् आम आदमी पक्षाकडून मोठे आव्हान मिळत आहे. दोन्ही पक्षांनी येथील स्थानिक निवडणूक लढविली होती. दोन्ही पक्षांनी आता विधानसभा निवडणुकीत स्वतःचा उमेदवार उतरविला आहे. ओवैसी यांनी स्वतःच्या पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचारसभाही घेतली आहे.

Related Stories

378 दिवसांनंतर शेतकरी आंदोलन स्थगितीची घोषणा

Amit Kulkarni

स्वपन दासगुप्ता, महेश जेठमलानी राज्यसभेवर नियुक्त

Amit Kulkarni

तबलिगी जमातमुळे कोरोना संसर्ग वाढला

Patil_p

भिंडमध्ये वायुदलाचे लढाऊ विमान कोसळले

Amit Kulkarni

गोहत्या बंदी विधेयक संमत

Omkar B

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Patil_p