Tarun Bharat

बांगलादेशला नमवित भारत उपांत्य फेरीत

सामनावीर रवी कुमारचा भेदक मारा, रघुवंशी, यश, रशीद यांचे उपयुक्त योगदान

वृत्तसंस्था/ कूलिज, अँटिग्वा

डावखुरा वेगवान गोलंदाज रवी कुमारची भेदक गोलंदाजी, अंगकृश रघुवंशीची उपयुक्त फलंदाजी यांच्या बळावर भारताच्या युवा संघाने यू-19 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविताना विद्यमान विजेत्या बांगलादेशचा 5 गडय़ांनी पराभव केला. मागील स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला बांगलादेशकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्याची परतफेडही भारताने या सामन्यात केली. 14 धावांत 3 बळी टिपणाऱया रवी कुमारला सामनावीराचा बहुमान मिळाला.

चार वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या भारताची उपांत्य लढत ऑस्ट्रेलियाशी 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. ऑस्ट्रेलियाने पाकचा पराभव करून शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले आहे. भारताने आतापर्यंतच्या नऊपैकी सातवेळा यू-19 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळविले आहेत.

रवी कुमारने प्रारंभीच्या भेदक माऱयावर बांगलादेशची आघाडी फळी कापून काढल्यामुळे त्यांची 7 बाद 56 अशी स्थिती झाली होती. एसएम मेहराब (30) व अशिकुर झमान (16) यांनी आठव्या गडय़ासाठी 50 धावांची भागीदारी केल्यामुळे त्यांना शंभरी पार करता आली. ही जोडी फुटल्यानंतर त्यांचा डाव 37.1 षटकांत 111 धावांत आटोपला. त्यानंतर भारताने 30.5 षटकांत 5 बाद 117 धावा जमवित विजयासह उपांत्य फेरीतील स्थानही निश्चित केले. सलामीवीर अंगकृश रघुवंशीने सर्वाधिक 44 धावा केल्या. कर्णधार यश धुलने नाबाद 20 धावा केल्या तर उपकर्णधार शैक रशीदने 26 धावांचे योगदान दिले. विजयी षटकार मारणारा कौशल तांबेही 11 धावांवर नाबाद राहिला. बांगलादेशच्या रिपॉन मोंडलने 31 धावांत 4 बळी मिळविले.

भारतीय संघातील सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे आयर्लंड व युगांडाविरुद्ध उर्वरित 11 खेळाडू खेळले होते. त्यातून सावरल्यानंतर कोणताही सराव न करता हे खेळाडू या सामन्यासाठी थेट मैदानात उतरले होते. तरीही त्यांनी बांगलादेशचा धुव्वा उडवित आगेकूच केली. या विजयाला भारतासाठी विशेष महत्त्व आहे. कारण गेल्या वर्षी कोलकात्यात झालेल्या चौरंगी स्पर्धेत याच बांगलादेश संघाकडून भारताला दोनदा पराभव स्वीकारावा लागला होता.

प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर रवी कुमारने आर्द्र खेळपट्टीचा पुरेपूर उपयोग करीत भेदक इनस्विंगर टाकले आणि आठव्या षटकातच त्यांची स्थिती 3 बाद 14 अशी झाली. या स्थितीतून त्यांना लवकर सावरता आले नाही. मात्र आठव्या गडय़ासाठी मेहराब व झमान यांनी अर्धशतकी भागीदारी केल्याने बांगलादेशला शतकी मजल मारता आली. विकी ओस्तवालच्या डावखुऱया फिरकीसमोरही त्यांची धांदल उडाल्याचे दिसून आले. त्याने 25 धावांत 2 बळी मिळविले. कौशल तांबे, राजवर्धन हंगरगेकर, रघुवंशी यांनी एकेक बळी टिपले.

संक्षिप्त धावफलक ः यू-19 बांगलादेश 37.1 षटकांत सर्व बाद 111 ः ऐच मुल्लाह 17, एसएम मेहराब 30, अशिकुर झमान 16, अरिफुल इस्लाम 9, अवांतर 18. गोलंदाजी ः रवी कुमार 3-14, ओस्तवाल 2-25, हंगरगेकर 1-19, कौशल तांबे 1-27, रघुवंशी 1-4. यू-19 भारत 30.5 षटकांत 5 बाद 117 ः रघुवंशी 7 चौकारांसह 44, हरनूर सिंग 0, रशीद 3 चौकारांसह 26, यश धुल 26 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 20, सिद्धार्थ यादव 6, राज बावा 0, तांबे 1 षटकारांसह नाबाद 11, अवांतर 10. गोलंदाजी ः रिपॉन मोंडल 4-31, तान्झिम हसन शकीब 1-34, रकिबुल हसन 0-30, अशिकुर झमान 0-22.

Related Stories

इंग्लंड महिला संघाची विंडीजवर मात

Patil_p

कुसल परेराला कोरोनाची बाधा

Patil_p

ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये लिसा स्थळेकरचा समावेश

Patil_p

द.आफ्रिकेचा इंग्लंडवर डावाने विजय

Patil_p

सामना हरला, पण मने जिंकली!

Patil_p

बेंगळूर एफसी संघाशी जमैकाचा ब्राऊन करारबद्ध

Patil_p