Tarun Bharat

बांगलादेशी घुसखोरांना गोव्यात थारा नाही

Advertisements

विशेष प्रतिनिधी / पणजी

गोव्यात बांगलादेशी घुसखोरांना मुळीच थारा मिळणार नाही, असा इशारा देऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपण सारी गुप्तचर यंत्रणा कामाला लावली असून मोठय़ा प्रमाणात बांगलादेशी नागरिक गोव्यात असल्याचा सुगावा लागत आहे. या सर्वांना हुडकून काढून त्यांना मायदेशी तातडीने रवाना करणार असल्याची घोषणा केली.

गेले दोन-तीन दिवस बांगलादेशी नागरिक सांखळी, डिचोली, वाळपईपासून वास्कोपर्यंतच्या अनेक भागात सापडल्याच्या बातम्यांनी संपूर्ण गोव्यात खळबळ माजली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी उशिरा गुप्तचर यंत्रणेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी वरील घोषणा केली.

घुसखोर सापडावेत हाच गंभीर प्रकार

गोव्यात बांगलादेशी घुसखोर सापडावेत हा प्रकारच मुळी गंभीर आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था आपल्याला बिघडू द्यायची नाही. जी माणसे परदेशातून येऊन इथे स्थायिक झालीत ती पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे सारी पोलीस गुप्तचर यंत्रणा कामाला लावलेली आहे. एटीएसची मोलाची मदत याकामी लाभलेली आहे आणि या सर्व घुसखोरांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. एक-दोन आठवडय़ात हे सारे काम होऊन जाईल. जी माणसे ताब्यात येतील त्या सर्वांना अत्यंत तातडीने त्यांच्या देशात परत पाठविले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गेले चार दिवस राज्यातील गुप्तचर यंत्रणा या कामी लक्ष घालून आहे. आजही मोठय़ा प्रमाणात झडती सुरू होईल. ताब्यात घेतल्यानंतर त्वरितच त्यांची थेट बांगलादेशात परत पाठवणी होईल. इतर देशांतील नागरिकांना परत पाठविण्यात अनेक अडचणी असतात. परंतु बांगलादेशात ही प्रक्रिया सोपी आहे. मुख्यमंत्र्यांनी या बाबतीत केंद्राशीही संपर्क साधला आहे.

वाळपई, भिरोंडा भागात सरकारी जमिनी बळकावल्या

मिळालेल्या माहितीनुसार, वाळपई मतदारसंघात बांगलादेशी नागरिकांचे अड्डे आहेत. भिरोंडा येथे सरकारी जमिनी हडप केल्याचे वृत्त हाती आले आहे. वाळपई पालिका क्षेत्रातदेखील सरकारी जमिनी हडप केलेल्या असून या जमिनी कोणा राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने हडप केल्या हे समजत नाही. मात्र सरकारपर्यंत सत्तरीतील नागरिकांनी याची सविस्तर माहिती दिलेली असल्याने सरकारी जमिनी हडप केलेल्यांवर कारवाई होईल. हे नागरिक परप्रांतीय तर आहेतच शिवाय ते नेमके कुठले हे समजत नसल्याने पोलीस यंत्रणेची पावले तसेच महसूल अधिकाऱयांची पावले आता सत्तरीतील बेकायदा जमिनी हडप करणाऱयांपर्यंत पोहोचली आहेत व पुढील काही दिवसांत धडक कारवाई शक्य आहे.

Related Stories

वाळपई-ठाणे येथे अपघातात हिवरे येथील युवकाचा मृत्यू

Amit Kulkarni

काँग्रेस आमदार भाजपमध्ये जाणार ही अफवाच

Amit Kulkarni

श्री गावशीकान्न नवदुर्गा देवीचा वर्धापनदिन पारपळीत साजरा

Amit Kulkarni

शांतादुर्गा बेती संघाचा एमवायएसवर विजय

Amit Kulkarni

कोरागाव पंचायतीच्या सरपंच स्वाती गवंडी यांच्यावर दाखल केलेला ठराव आठ विरुद्ध शून्य मतांनी संमत

Amit Kulkarni

टॉपकोल बोरी रस्त्याचे डॉ.मंजुनाथ देसाई नामकरण

Amit Kulkarni
error: Content is protected !!