तरुण भारत

बांदोडकर सुवर्ण चषकावरील सोनं गायब झाल्याचा जीएफएचे अध्यक्ष चर्चिल आलेमाव यांचा आरोप

सोक्षमोक्ष लावण्यासाठी न्यायालयात जाण्याचा चर्चिलचा इशारा; चषकाचा सध्याचा भाव आहे 45 कोटी, चषक सध्या जीएफएच्या गोडाऊनमध्ये

क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

Advertisements

गोवा फुटबॉल संघटनेच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या निवडणूका आता जवळ आल्याने ‘बांदोडकर सुवर्ण चषक’च्या घोळाचा विषय आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यातील फुटबॉलप्रेमींच्या गळय़ातील ताईत असलेल्या या सुवर्णचषकाचे कथित सोने गेले कुठे, असा खळबळजनक आरोप गोवा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

चषकावरील सोन्याचा पाठपुरावा करण्यासाठी आपण स्वखर्चाने न्यायालयात जाणार असल्याचे चर्चिल आलेमाव यावेळी म्हणाले. सध्या हा चषक जीएफएच्या पणजीतील गोडाऊनमध्ये धूळ खात असल्याचेही यावेळी ते म्हणाले. 52 वर्षांपूर्वी जेव्हा बांदोडकर सुवर्णचषक फुटबॉल स्पर्धा सुरू झाली त्यावेळी या चषकावरील सोन्याची किंमत सुमारे 20 लाख होती. यामुळे सोन्याचा तेव्हाचा दर बघता चषकाचे वजन किमान 10 किलो असायला हवे. त्यामुळे सध्या सोन्याच्या बाजारभावात या चषकावर असलेले सोने सुमारे 45 कोटी असायला हवे, असे यावेळी चर्चिल आलेमांव म्हणाले.

आता या चषकात सध्या सोने कमी असून फक्त दोन किलो आहे, असे सांगण्यात येत आहे. मी याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे आलेमांव यावेळी म्हणाले. या संबंधी आपण या सुवर्णचषकाच्या संदर्भात काही दस्तऐवज किंवा फाईल्स मिळतात का, हे सुद्धा पाहिले, मात्र दस्तऐवज आणि फाईल्ससुद्धा गहाळ झाल्याचा आरोप यावेळी आलेमाव यांनी केला.

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद बांदोडकर यांनी हा सुवर्णचषक गोवा फुटबॉल संघटनेला दिला होता. 1970 मध्ये जीएफएच्या बांदोडकर सुवर्णचषक फुटबॉल स्पर्धेला सुरूवात झाली. या स्पर्धेत देशातील नामवंत संघांनी भाग घेतला. देशातील एक उत्कृष्ट स्पर्धा म्हणून बांदोडकर सुवर्णचषक स्पर्धेचा नावलौकीक होता. कालांतराने ही स्पर्धा बंद पडली. त्यानंतर या सुवर्ण करंडकाने बँकेच्या लोकरमध्ये विसावा घेतला.

2016 मध्ये बांदोडकर चषक स्पर्धा परत एकदा सुरू झाली आणि कित्येक वर्षांनी हा चषक फुटबॉलप्रेमींनी पाहिला. स्पर्धा संपल्यानंतर चषक परत एकदा लॉकरमध्ये जायला हवा होता. मात्र, काही काळ गोवा फुटबॉल विकास मंडळाच्या कार्यालयात व आता तो जीएफएच्या गोडाऊनमध्ये पडून आहे, असा आरोप चर्चिल आलेमांव यांनी केला. गोडाऊनमध्ये हा सुवर्णचषक ठेवताना कोणतीही प्रक्रियाही पूर्ण केली नसल्याचेही ते म्हणाले. आपण आमदार असताना हा विषय विधानसभेत मांडला होता आणि त्यावेळी तत्कालीन क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी चौकशी करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र त्यानंतर काहीच झाले नसल्याचे आलेमाव शेवटी म्हणाले.

Related Stories

सांगे व्यापारी संघटनेचा बाजार बंद यशस्वी

Amit Kulkarni

सांगोल्डात ट्रक मोटरसायकल अपघातात गिरीतील तरुणाचा मृत्यू

Amit Kulkarni

‘स्वयंपूर्ण गाव, संपन्न गोंय’ नवी योजना

Omkar B

प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आणि गुंतागुंतीचा : दिग्दर्शक रामन रसौली

Abhijeet Shinde

येणाऱया निवडणूकांमध्ये भाजपला बहुमताने विजयी करणे हेच ध्येय

Patil_p

कारापूर तिस्क येथे दुकानावर वीज कोसळली

Amit Kulkarni
error: Content is protected !!